पुणे: बाणेर अपघातात लेकी पाठोपाठ आईचा मृत्यू

31

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यातील बाणेर येथे सोमवारी भरधाव कारच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेल्या इशिका अजयकुमार विश्वकर्मा या चिमुरडीची आई पूजा विश्वकर्मा (२४) हिचा आज, मंगळवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. खरेदीसाठी घरातून बाहेर पडलेल्या या मायलेकींचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या अपघाताप्रकरणी कारचालक सुजाता श्रॉफ (५०) या महिलेला अटक करण्यात आली आहे.

पूजा विश्वकर्मा, निशा शेख या दोघी त्यांच्या मुलांना घेऊन साजिद शेख यांच्यासोबत बाणेर येथे रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या छोट्या दुभाजकावर त्या थांबल्या होत्या. वाहनांचा वेग जास्त असल्याने आई इशिकाला कडेवर घेऊन दुभाजकावर उभी होती. त्याच वेळी पुण्याकडून बालेवाडीच्या दिशेने जाणारी सुसाट वेगातील आय टेन ही कार दुभाजकाला धडकून उडाली आणि थेट या पाचजणांच्या अंगावर गेली. ते सर्वजण सुमारे १० ते १५ फूट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जोरात फेकले गेले तर कार दुभाजकावर अडकून पडली. नागरिकांनी या सर्वांना त्वरित रुग्णालयात दाखल केले परंतु इशिकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये अपघाताचे दृश्य कैद झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या