‘खोटे’ बहीण-भाऊ!

174

>> ज्योत्स्ना गाडगीळ

आडनाव ‘खोटे’ असले, तरी वास्तवात `खरे’ भाऊ-बहीण असलेली, हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध जोेडी म्हणजे शुभा खोटे आणि विजू खोटे! शुभा ताई ८१ वर्षांच्या, तर विजू खोटे ७६ वर्षांचे, तरीदेखील दोघांचे नाते आजही अल्लड, खोडकर, प्रेमळ, समंजस आणि परस्परपूरक आहे. आपल्या विनोदी शैलीने चित्रपटसृष्टीवर छाप उमटवणाऱ्या ह्या भावंडांनी रक्षाबंधन’च्या निमित्ताने काही गोड आठवणींना उजाळा दिला.

 

शुभा आणि विजू खोटे ह्यांना अभिनय आणि क्रीडा ह्या दोन्ही क्षेत्रांचा वारसा, त्यांचे वडील सुप्रसिद्ध अभिनेते नंदू खोटे ह्यांच्याकडून मिळाला. बालपणापासून दोघांना क्रीडाक्षेत्राची आवड होती. वडिलांनी दोघांना प्रोत्साहन दिले. शुभा तार्इंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर सायकलस्वारीच्या स्पर्धेत बक्षिसे पटकावली आहेत आणि पोहोण्याच्या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व केले आहे. तर, विजू खोटे ह्यांनी महाविद्यालयीन काळापर्यंत बॉक्सिंगमध्ये प्रावीण्य मिळवले आहे. तसे असले, तरी क्रीडाक्षेत्रात एका वेळेनंतर निवृत्ती घ्यावी लागते, या गोष्टीचे भान ठेवून दोघांनी योग्य वेळी क्रीडा क्षेत्रातून काढता पाय घेत अभिनय क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवले.

पाच दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम करणारे हे दोघे विनोदी कलाकार आजही विविध भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. शुभा तार्इंनी वयाच्या चौथ्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केले, तर विजू खोटेंनी महाविद्यालयीन काळात! शालेय वयात शुभा तार्इंनी नाटकांतून, चित्रपटातून काम केले. मात्र त्यांना मुख्य भूमिका मिळाली ती `सीमा’ ह्या चित्रपटातून! तोपर्यंत त्या क्रीडापटू म्हणून नाव कमावत होत्या. त्यांचे फोटोही वृत्तपत्रात झळकत होते.

shubha

असाच एक सायकलस्वारीचा फोटो बघून दिग्दर्शक अमेय चक्रवर्ती ह्यांनी त्यांचे सहकारी एन.डी. कामत ह्यांना शुभा खोटेंचा शोध घेण्यास पाठवले. कामत ह्यांनी शुभा तार्इंना एका नाटकात रंगभूमीवर पाहिले होते, शिवाय त्या नंदू खोटे ह्यांच्या कन्या म्हणूनही परिचित होत्या. त्यांचा शोध घेत कामत शुभा तार्इंच्या घरी पोहोचले, तेव्हा नेमके काही कारणांवरून शुभा आणि विजू ह्यांचे भांडण सुरू होते. एकमेकांना उशीने मारहाण सुरू होती. अशातच कामत ह्यांचा गृहप्रवेश झाला आणि त्यांनी शुभातार्इंबद्दल विचारणा केली. शर्ट-पँट घातलेल्या शुभा ताई पुढे सरसावत म्हणाल्या, `मीच शुभा!’ त्यांचा एकूण अवतार पाहून कामत ह्यांनी शुभा तार्इंना वडिलांना घेऊन ठराविक दिवशी बोलावून घेतले. तिथे गेल्यावर शुभा तार्इंना कळले, की कामत आपल्याला चित्रपटासाठी बोलवायला आले होते. अभिनयाचे अंग असल्यामुळे त्यांनी ऑडिशन सहज पास केली. सदर भूमिकेसाठी शुभातार्इंची निवड झाली आणि अभिनेत्री म्हणून त्यांचा प्रवासही सुरू झाला. मात्र, ह्या प्रवासाची ही गमतीदार आठवण सांगताना ते दोघेही मनापासून हसतात.

विजू खोटे ह्यांना अभिनयाची जाण आणि आवड असूनही त्यांनी शालेय वयात कधीच नाटकातून भाग घेतला नाही. महाविद्यालयात एका शिक्षकांच्या आग्रहाखातर एका नाटकात भूमिका केली. मग भीड चेपली, ती कायमची! त्यानंतर अनेक नाटकांतून त्यांनी कामे केली. शुभातार्इंबरोबर त्यांच्या मुलीला सांभाळायला सेटवर जात असताना दिग्दर्शकांच्या भेटीगाठीतून विजू खोटेंना एक-दोन चित्रपटात खलनायकाच्या भूमिका मिळाल्या. भारदस्त शरीरयष्टी असल्याने ते खलनायकाच्या भूमिकेत शोभून दिसत असत. पुढे पुढे त्यांना एकातून एक चित्रपट मिळत गेले, परंतु खलनायकाची भूमिका वठवण्यासाठी लागणारे कष्ट पाहता, त्यांनी विनोदी भूमिकांकडे मोर्चा वळवला.

12viju-khote2

ते सांगतात, `मुख्य खलनायकाची भूमिका असेल, तर ती  प्रेक्षकांच्या स्मरणात राहाते आणि इतर सहकारी खलनायक हे कायमस्वरूपी `इतर’ कलाकारच बनून राहतात. ‘शोले’मधील `कालिया’ मात्र अपवाद होता. त्या चित्रपटातल्या सगळ्याच व्यक्तिरेखा लोकांच्या स्मरणात राहिल्या. कारण ते एक वेगळेच रसायन जुळून आले होते. मात्र, इतर भूमिकांमध्ये बऱ्याचदा मारामारी करताना दुखापत होत असे. अगदी कालियाची भूमिका करतानाही माझ्या नशिबी आलेल्या घोडीने मला पाच-सात वेळा धारातीर्थी पाडले होते. मोठ्या कष्टाने मुंबईत येऊन घोडेस्वारी शिकलो आणि परत ‘शोले’च्या शूटिंगसाठी गेलो, तेव्हा कळले, की पुढचे सीन घोडीशिवाय करायचे आहेत. एवढ्या खस्ता खाण्यापेक्षा मला विनोदी भूमिका सोप्या वाटल्या. मुळात खोडकर, विनोदी स्वभाव असल्याने त्यासाठी फार कष्टही घ्यावे लागले नाहीत. मात्र, वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका जीव ओतून सादर केली.’

शुभातार्इंनी नायिका, सहनायिका, चरित्र अभिनेत्री ते विनोदी कलाकार असा अभिनयाचा प्रवास केला. सुरुवातीच्या काळात त्यांची आणि मेहमूद ह्यांची जोडी अतिशय लोकप्रिय होती. अनेक चित्रपटांतून ही जोडी झळकली. चित्रीकरणाच्या दरम्यान त्यांच्याही वाट्याला अनेकदा अपघाताचे प्रसंग आले, त्यावर मात करून त्यांनी आपली कारकीर्द सुरू ठेवली. त्यांची खलनायिकाही लोकांना आवडली. मात्र त्यांची विनोदी शैली पाहता लोकांनी त्यांच्या विनोदी भूमिकांना जास्त पसंती दिली.

हे दोघेही एकाच क्षेत्रात काम करत असूनही पडद्यावर विंâवा रंगमंचावर क्वचितच एकत्र आले. त्यापैकी संस्मरणीय भूमिका म्हणजे टीव्ही मालिका `जबान संभालके’मधील शुभातार्इंची मुख्याध्यापिकेची आणि विजू खोटेंची विद्याथ्र्याची भूमिका! संपूर्ण मालिका विनोदवीरांनी भरलेली असली, तरी ह्या भावंडांनी आपल्या भूमिकेचा विशेष ठसा उमटवला.

शुभा आणि विजू ह्यांच्या वयात साडेपाच वर्षांचा फरक असला, तरी ह्या दोघांच्या दिसण्यामध्ये बरेच साम्य आहे. तरुणपणीही दोघांची शरीरयष्टी जवळपास एकसारखी होती. ह्याबाबत एक मजेदार किस्सा शुभाताई सांगतात, ‘`चंपाकली चित्रपट करत असताना सेटवर सोबत आलेल्या विजूला पाहून दिग्दर्शक नंदलाल जयस्वाल मला म्हणाले, `तुला दुसरीकडे शूटिंगला जायचे असेल तर जा. मी ह्याला तुझा रोल देईन.’ एवढे आमच्यात साम्य होते.’’

दोन बहिणी, दोन भाऊ जसे एकमेकांचे कपडे वापरतात, तसे शुभाताई तरुणपणी विजू खोटेंचे कपडे वापरत असत. तेही मोठ्या मनाने आपले नवीन शिवलेले कपडे ताईला घालून दाखवायला सांगत असत. दोघांचे स्वभाव मिस्किल असल्याने त्यांच्यात भांडणाचे प्रसंग फारसे आले नाहीत आणि आलेच तर फार वेळ अबोला राहिला नाही, असे ते सांगतात. मोठी बहीण असूनही शुभातार्इंनी आपल्यावर कधी `ताईगिरी’ बजावली नाही, तर आपल्याला नेहमीच मित्रत्वाने वागवले, असे विजू खोटे सांगतात. उलट ती नेहमी माझ्या कामाचे कौतुक करते आणि मी नेहमी तिला तिच्या कामातल्या उणिवा दाखवून देतो, हेही ते गमतीने सांगतात.

दोघांच्या खाण्याच्या आवडी सारख्या आहेत. दोघांना साधे राहणीमान आवडते. दोघांना इंग्रजी चित्रपट बघायला आवडतात. गिरगावात बालपण गेले असल्याने रिगल, इरॉस, मेट्रो ह्या चित्रपटगृहात जाऊन दोघांनी अनेक इंग्रजी चित्रपट एकत्र पाहिले आहेत. गिरगावच्या सेंट तेरेसा शाळेत इंग्रजी माध्यमातून दोघांचे शिक्षण झालेले असल्यामुळे सुरुवातीला मराठीकडे त्यांचा विशेष कल नव्हता. तरीदेखील मराठी रंगभूमीवर, टीव्ही मालिकांमधून, चित्रपटांतून त्यांनी मऱ्हाटमोळ्या भूमिका सादर केल्या. अजूनही आपल्याला मराठी मालिकांमध्ये काम करायला आवडेल, असे ते सांगतात.

शेकडो चित्रपट, नाटके, मालिका ह्यांत काम केलेल्या ह्या दोन्ही भावंडांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. शुभातार्इंची मुलगी भावना बलसावर हीदेखील `देख भाई देख’, `जबान संभाल के’, `फिर भी दिल है हिंदुस्थानी’सारख्या मालिकांमध्ये विनोदी भूमिकांमध्ये दिसली. विजू खोटे ह्यांची मुले खाजगी व्यवसायात स्थिरस्थावर आहेत. हे दोन्ही कलाकार आज समाधानी आयुष्य जगत आहेत.

`रक्षाबंधन’विषयीची एखादी आठवण विचारली असता, दोघेही एकमुखाने सांगतात, `आमच्या नात्याच्या दृष्टीने रक्षाबंधन सण महत्त्वाचा असला, तरी जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो, तो दिवस आमच्यासाठी विशेषच असतो. अजूनही आमच्यात पूर्वीइतकेच `शेअरिंग’ चालते. वयोपरत्वे प्रत्यक्ष भेटीगाठी कमी होत असल्या, तरी फोनवर एकमेकांची चौकशी सुरू असते. आजही मला त्याच्या आवडीचे पदार्थ करून खिलवण्यात आणि त्याला खाण्यात आनंद वाटतो. भेटवस्तूंची देवाण-घेवाण विशेष होत नाही, पण विचारांची देवाण-घेवाण आजही सुरू असते.’

चित्रपटसृष्टीत ह्यांच्यासारखी बहीण-भावाची जोडी सापडणे कठीण! रुपेरी दुनियेत राहूनही ह्या दोन्ही कलाकारांनी आपल्या नात्यात दुरावा येऊ दिला नाही. यापुढेही त्यांचे बंधन असेच अतूट राहो, ही सदिच्छा!

खोटे’ ह्या आडनावाबद्दल विजू खोटे सांगतात, ‘ह्या आडनावाचे आम्ही एकमेव आहोत. खोटे आडनाव कोणाचे असलेच, तर ते आमच्या नातेवाईकांपैकीच एक असतील. अन्यथा आमचे कोणीही आडनावबंधू नाहीत.’ काही का असेना, ह्या आडनावाने चित्रपटसृष्टीला चार उत्तम कलाकार मिळवून दिले- नंदू खोटे, शुभा खोटे, विजू खोटे आणि ह्या दोघांच्या काकू दुर्गा खोटे!

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या