…गुंफू ‘आद्या’च्या माळा!

514

>>ज्योत्स्ना गाडगीळ

चांगल्या पगाराची नोकरी, देशोदेशीचा प्रवास, उत्तम सहकारी आणि बढतीची संधी असे सहसा जुळून न येणारे योग एखाद्याच्या वाटय़ाला यावे आणि त्या व्यक्तीने नोकरी सोडून व्यवसायाला सुरुवात करावी आणि तो व्यवसायही उत्तम चालावा, याला आपण त्या व्यक्तीचे ‘नशीब बलवत्तर’ असेच म्हणू! पण नाही, अशा बाबतीत केवळ नशिबावर अवलंबून चालत नाही, तिथे कर्तृत्वाची जोड ही लागतेच. हेच सिद्ध करून दाखवले आहे हरहुन्नरी ज्वेलरी डिझाइनर सायली मराठे हिने!

मूळची पुण्याची असलेली सायली व्यवसायाने इंजिनिअर आहे. पुण्यातील एका नामांकित कंपनीत साडे नऊ वर्षे तिने नोकरी केली. सगळे काही उत्तम, सुरळीत चालू असताना एक दिवस अचानक नोकरी सोडून पूर्णवेळ व्यवसाय करण्याचा तिने निर्णय घेतला. तिचा हा निर्णय गरजेतून नाही, तर आवडीतून, छंदातून घेतला गेला होता आणि ह्या निर्णयाला तिच्या नवऱयाचा भक्कम पाठिंबा होता. उलट त्यानेच सायलीला पूर्णवेळ व्यवसायात उतरण्याचे सुचवले होते. एव्हाना पगारातून पुरेसा धनसंचय झाल्याने तिनेही स्वतःला व्यवसायात झोकून दिले. त्यानिमित्ताने उद्योग जगताला सायलीच्या रूपाने एका महत्वाकांक्षी उद्योजिकेची ओळख झाली.

दागिने घालण्याची आवड नसलेली सायली बालपणापासून दागिने जमवायची. तिच्यातला हा विरोधाभास पाहून तिच्या घरच्यांना ती हा काय ‘उद्योग’ करतेय असा नेहेमी प्रश्न पडायचा, परंतु ह्या ‘उद्योगाचे’ भविष्यात ‘महाउद्योगात’ पर्यवसान होणार आहे, असे तिच्या घरच्यांनाच काय तर खुद्द सायलीलाही कधी वाटले नव्हते.

बालपणी कोणी भेटवस्तू म्हणून दिलेले कानातले, गळ्यातले सायली जमवत असे. पुढे कमवती झाल्यावर हा छंद जोपासण्यासाठी ती आर्थिकदृष्टया सक्षम झाली. तिच्या खजिन्यात शेकडो दागिन्यांची भर पडली. त्यातले काही दागिने ती भेट म्हणून मैत्रिणींना द्यायची, तर बाकीचे दागिने स्वतः न्याहाळायची. नोकरीनिमित्त परदेश प्रवास करताना तिथल्या दागिन्यांनीही तिला भुरळ घातली.

फावल्या वेळात दागिन्यांचे साचे विकत आणून तिने हौस म्हणून दागिने बनवण्यास सुरुवात केली. तिच्याकडचे अनोखे आणि वैशिष्टयपूर्ण दागिने पाहून तिच्या मैत्रिणींनी तिला तिच्या संग्रही असलेल्या शेकडो दागिन्यांचे प्रदर्शन भरविण्यास सांगितले. तिने प्रदर्शन भरवले, पण फेसबुकवर! ही तिच्या व्यवसायाची सुरुवात होती, म्हणून तिने आपल्या फेसबुक पेजचे नाव ‘आद्य’ ठेवले. आद्य म्हणजे सुरुवात, ज्याला अंत नाही. इंग्रजी उच्चारानुसार त्याचे उच्चारण ‘आद्या’ झाले आणि तेच पाळण्यातले नाव भविष्यात तिच्या व्यवसायाची ओळख झाली.

सायलीच्या ‘आद्या’ ह्या फेसबुकवरील प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या दोन आठवडय़ात तिचे सगळे दागिने विकले गेले आणि नव्या दागिन्यांसाठी विचारणा होऊ लागली. नोकरी सांभाळून ऑर्डर पूर्ण करणे तिला शक्य नव्हते. फेसबुक पेजवरील तिच्या दागिन्यांची मागणी पाहता तिने शितावरून भाताची परीक्षा केली आणि आत्मविश्वासाने उद्योग जगात पाऊल ठेवले. २०१३ मध्ये तिने स्वतःची वेबसाईट सुरू केली. त्यावर निवडक ५० प्रकारचे दागिने विक्रीसाठी ठेवले. फेसबुकच्या माध्यमातून तिच्या संकेतस्थळाचीही मोठया प्रमाणात जाहिरात होऊ लागली. आद्याच्या चाहत्यांची संख्या अडीच लाखांचा आकडा पार करू लागली. फेसबुकच्या नियमानुसार अडीच लाखांच्यावर चाहत्यांची संख्या गेली असता, त्या पेजच्या धारकाला शुल्क भरून मगच जाहिरात करता येते. त्यानुसार सायलीने फेसबुकची सशुल्क सेवा सुरू केली.

सद्यस्थितीत बहुसंख्य लोक छोटय़ा-मोठय़ा वस्तूंची बेधडक ऑनलाईन शॉपिंग करतात. याच आधुनिक प्रणालीचा वापर करून सायलीने ऑनलाईन व्यवसाय सुरू केला. कोणत्याही विक्रेत्याला बाजारात आपल्या वस्तूची जशी जाहिरात करावी लागते, तशीच जाहिरात ऑनलाईन उद्योजकांनाही करावी लागते. ह्या बाबतीत सायलीचा अनुभव विचारला असता ती सांगते, ‘आद्याची जाहिरात करण्यासाठी मी फेसबुकचा पुरेपूर वापर केला. सोशल मीडियाचा वापर करणाऱयांचा फेसबुकवर जास्त वावर असतो. तिथे तुम्हाला दरदिवशी आपल्या उत्पादनाबद्दल काही ना काही बोलून जाहिरात करायची असते. तसे केल्याने तुम्ही लोकांच्या नजरेसमोर राहता. सगळे जण आपल्या पोस्टवर प्रतिक्रिया देत नसले, तरी लोक तुमची दखल घेत असतात. मी ही तेच केले. आद्याचे नवनवे कलेक्शन फेसबुकवर दाखवले. दागिन्यांची किंमत आणि सखोल माहिती घेण्यासाठी लोक संकेतस्थळाला भेट देऊ लागले. दागिने वाजवी दरात उपलब्ध असल्याने आणि शॉपिंग प्रक्रिया सोपी ठेवल्याने लोक वरचेवर खरेदी करू लागले. दागिने बनवणे, ऑनलाईन ऑर्डर घेणे, ब्लॉगवर दागिन्यांची सविस्तर माहिती देणे, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम ह्यासारख्या सोशल साईटवर आद्याची जाहिरात करणे, इ. कामासाठी मी सक्षम माणसे नियुक्त केली आणि स्वतःला निर्मिती प्रक्रियेत बुडवून घेतले. सुरुवातीपासूनच नवऱ्याने व्यवसायाची आर्थिक बाजू संभाळल्याने मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करता आले.’

दागिन्यांच्या व्यवसायात उतरत असताना, सायलीने ह्या व्यवसायाचा सखोल अभ्यास केला. तिला हस्तनिर्मित दागिनेच करून विकायचे होते. त्यासाठी बाजारात कोणकोणत्या प्रकारचे हस्तनिर्मित दागिने बनवले जातात, हे तिने धुंडाळून पाहिले. जयपूर, जोधपूर, दिल्ली, हैदराबाद ही मुख्य बाजारपेठ तिने स्वतः जाऊन पाहिली. तिथल्या दुकानदारांशी, कारागिरांशी बोलून व्यवसायाचा अंदाज घेतला. देशाच्या कानाकोपऱयातून कच्चा माल मागवला, साधारण ५०,००० रुपयांची गुंतवणूक केली. चांदी आणि सोन्याचा मुलामा दिलेले दागिने, कांस्य, तांबे, मणी, मूल्यवान रत्न, ऑक्सिडाईडचे दागिने तिला बनवायचे होते. पारंपरिक दागिन्यांना आधुनिकतेच ‘टच’ देऊन तिने दागिन्यांचे रुपडेच पालटून टाकले. त्यामुळे सर्व वयोगटातील स्त्रीया तिच्या दागिन्यांकडे आकर्षित होऊ लागल्या. तसेच सर्व प्रकारच्या कपडयांवर साजेसे दागिने तयार केल्याने तिच्या दागिन्यांची मागणी वाढू लागली. उदा. पूर्वी आजीबाईंच्या कानात असलेली सोन्याची किंवा मोत्याची कुडी चांदीचे आवरण करून नव्या रूपात आणल्याने ती जीन्स घातलेल्या मुलींच्याही कानात दिसू लागली. तसेच, सर्वात जास्त लोकप्रिय असलेली आद्या कलेक्शनची नथ केवळ नऊवारीवर न घालता पाचवारी साडी किंवा कोणत्याही आधुनिक पेहरावावर मुली वापरू लागल्या. असे दागिन्यांचे सर्व प्रकार आद्याच्या तिजोरीत आहेत.

सायलीच्या दागिन्यांनी केवळ मराठी मनालाच नाही, तर परभाषिकांना, परप्रांतीयांनाही मोहिनी घातली आहे. देश-विदेशातून तिच्या दागिन्यांना मागणी आहे. ‘टाईमपास-२’ मध्ये प्रिया बापटसाठी तर ‘पोश्टर गर्ल’ चित्रपटात सोनाली कुलकर्णीसाठी सायलीने दागिने डिझाईन केले आहेत. गिरिजा ओक, पर्ण पेठे, स्पृहा जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रिया बापट अशा मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक तारका आद्याचे दागिने वापरतात. पैकी अनेक जणी सायलीच्या जुन्या मैत्रिणी आहेत. त्यांच्या मैत्रीची गोष्ट सायली सांगते, ‘शाळा, कॉलेजमध्ये असल्यापासून मी प्रायोगिक नाटकांत काम करायचे. आज पुण्यातून मुंबईत आलेले अनेक कलाकार नाटयक्षेत्रामुळेच माझ्या परिचयाचे आहेत. कधी काळी मलाही पूर्णवेळ नाट्यक्षेत्रात उतरायचे होते. पण अभ्यासातही चांगली गती असल्याने अभियांत्रिकीचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्या क्षेत्रातही मनापासून रमले. काही वर्षांनी नियतीने माझ्यातल्या उद्योजिकेला जागविले. हो! हे एवढयासाठी म्हणते, कारण बालपणी सगळ्या मुली भातुकली खेळायच्या तेव्हा मी दुकान, दुकान खेळायचे. साखर म्हणून वाळू, गूळ म्हणून दगड विकायचे. थोडक्यात गल्लापेटीवर बसण्याची तेव्हाची सुप्त इच्छा दागिने व्यवसायातून पूर्ण झाली. त्यामुळे ह्या क्षेत्रातही मी रमले. हे सर्व काही छान सुरू असले, तरी भविष्यात पुन्हा एकदा नाट्यक्षेत्रात उतरण्याचा माझा मानस आहे आणि तोही मी नक्की पूर्ण करेन.’

सायलीच्या याच गुणांमुळे सुरुवातीला तिचा उल्लेख हरहुन्नरी असा केला. तिच्यातल्या कलागुणांचे श्रेय ती आपल्या घरच्या मंडळींना देते. आई-वडील आणि आजी हे तिघेही नोकरी करणारे असले तरी ते काव्य-शास्त्र-विनोदात रमणारे होते. त्यांनीच सायलीला अभ्यासाबरोबर इतर ललित कलांची गोडी लावली. सर्वप्रकारच्या वाचनामुळे सायली बहुश्रुत झाली आणि याचे फलित तिला आपल्या कलाकारीत उतरवता आले. तिने लाँच केलेले आणि तिचे सगळ्यात आवडते असलेले ‘इतिहास’ कलेक्शन हे त्यापैकीच एक! पारंपरिक दागिन्यांवर बारकाईने काम करून नवा साज देण्याचा तिचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरला. दागिन्यांमध्ये आवश्यक बदल घडवण्यासाठी तिने ऐतिहासिक पुस्तकांचा आधार घेतला. जुन्या प्रकारच्या दागिन्यांची पाहणी केली आणि त्यातून नवीन कलेक्शन साकार केले.

व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलेले नसताना सायली दागिने बनवण्याच्या क्षेत्रात उतरली आणि केवळ अनुभव आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी झाली. या यशाचा मार्ग नक्कीच खडतर होता, पण त्यातूनही मार्ग काढत ती आज यशस्वी उद्योजिका झाली. ह्या प्रवासाबद्दल विचारले असता ती सांगते, ‘तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा, मेहनतीला पर्याय नाही. व्यवसायात उतरायचे तर तुम्हाला स्वतःला झोकून द्यावे लागते. मराठी उद्योजकांच्या बाबतीत नेमक्या ह्याच गोष्टीचा अभाव दिसतो. तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे पैसे असले, तर ते गुंतवून भविष्यात वैध मार्गाने दुप्पट कसे होतील याचा विचार सातत्याने उद्योजकाच्या डोक्यात असावा लागतो. इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करण्याची सवय लावून घ्यायला हवी. प्रतिस्पर्धी असतील, तरच स्पर्धेला जास्त मजा आहे. त्यांच्याकडे लक्ष ठेवा, परंतु त्यांच्यावर पाळत ठेवण्यात वेळ वाया घालवू नका. लोक तुमची नक्कल करतील, करू द्या. पण त्यांनी नक्कल करण्याआधी तुमच्या ग्राहकाने अस्सल काय आणि नक्कल काय हे ओळखण्या इतपत तुमची ब्रँड व्हॅल्यू तयार करा. अपयशाने खचून न जाता, आव्हाने स्वीकारून कठीण परिस्थितीतून मार्ग काढत पुढे चला. या सगळ्या अनुभवातून गेल्यामुळे आणि तरीही तटस्थपणे कामात सातत्य ठेवल्यामुळे मी या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू शकले आहे. आजवर अनेक मोठया कंपन्यांकडून, ज्वेलर्सकडून मला त्यांच्यासाठी काम करण्यासाठी विचारणा झाली. मात्र मला माझी स्वतंत्र ओळख टिकवायची होती, म्हणून त्या प्रलोभनांना मी वेळोवेळी नम्रपणे नकार दिला. रतीब टाकण्यात मला रस नाही, प्रत्येक वस्तू दर्जेदार असली पाहिजे. ३०० रुपयांपासून ३६००० रुपयांपर्यंतच्या ग्राहकाला समान वागणूक दिली पाहिजे. फुकट द्यायचे नाही आणि फुकट घ्यायचेही नाही. फुकट मिळालेल्या गोष्टींना किंमत उरत नाही. असे काही नियम मी स्वतः साठी आखून घेतले आहेत आणि ते पाळल्यामुळेच बहुतेक मी स्वतःला सिद्ध करू शकले, असे वाटते.’

येत्या पंधरा वर्षांत सायलीला ‘ऑनलाईन ज्वेलरी मार्केट’ मध्ये जगभरातील नामांकित उद्योजकांमध्ये स्थान मिळवायचे आहे. त्यादृष्टीने तिने प्रवासही सुरू केला आहे. तिच्या ह्या जिद्दीला भरभरून शुभेच्छा!

आपली प्रतिक्रिया द्या