व्यसनमुक्तीचा दीप!

119

>> ज्योत्स्ना गाडगीळ

श्रावण मासारंभीची पूर्वसंध्या ही खरी तर दीप अमावस्या, जी दुर्दैवाने आज `गटारी’ म्हणून ओळखली जाते. व्यसनाच्या विळख्यात अडकलेली अनेक मंडळी स्वत:ला व्यसनमुक्त करू पाहत आहेत, परंतु पुन: पुन्हा व्यसनाला बळी पडून आयुष्याची गटारी करून घेत आहेत. अशा लोकांना गरज आहे, तुमच्या आमच्या सहकार्याची आणि मुक्तांगण सारख्या व्यसनमुक्ती केंद्राची. ज्याचे जनक आहेत डॉ. अनिल अवचट आणि डॉ. अनिता अवचट. साहित्यिक म्हणून परिचित असलेले अनिल अवचट असंख्य व्यसनी लोकांना नवजीवन देणारे `बाबा’ म्हणूनही परिचित आहेत. तीस वर्षांपूर्वी त्यांनी लावलेला मुक्तांगणचा वटवृक्ष चांगलाच बहरला आहे. त्याचा डोलारा आता अवचट ह्यांची कन्या मुक्ता पुणतांबेकर सांभाळत आहे. व्यसनमुक्तीचा दीप गरजवंताच्या हाती लागावा आणि त्याचे आयुष्य तेजोमय व्हावे म्हणून हा लेखनप्रपंच!

गरज ही शोधाची जननी असते, असे म्हणतात. मात्र डॉ. अनिल अवचट ह्यांना ना व्यसनमुक्ती केंद्राची गरज होती, ना त्याचा शोध लावण्याची उत्सुकता! मात्र, त्यांच्या मार्मिक लिखाणातून समाजाला गरज वाटू लागली, व्यसनमुक्ती केंद्राची आणि गरजवंतांना शोध लागला अवचट ह्यांच्या मुक्तांगणाचा!

डॉ. अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार आहेत, हे आपण सगळेच जाणतो. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे. मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या ह्यांच्या प्रश्नांविषयी त्यांनी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणाऱया कार्यकर्त्यांविषयीही `कार्यरत’ सारख्या पुस्तकातून त्यांनी लिखाण केले आहे. त्यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढय़ांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या आहेत. त्यांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे.

अवचट ह्यांच्या पत्नी डॉ. अनिता अवचट ह्या मानसोपचार तज्ञ होत्या. १९९७ मध्ये त्यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांनी व्यसनमुक्ती विषयावर काम केले होते. त्यांच्याकडे येणाऱया रुग्णांच्या समस्या जाणून घेत अवचट ह्यांनी व्यसनाला बळी पडलेल्या रुग्णांच्या कथा आणि व्यथा वृत्तपत्रात लेखमालिकेतून मांडायला सुरुवात केली.

एकदा त्यांची मैत्रीण, ड्रग्जच्या आहारी गेलेल्या आपल्या मुलाला घेऊन त्यांच्याकडे आली. त्याला बोलते केल्यावर कळले, की `टेन्शन आल्यावर बाबा दारू पितात, तर आपल्याला टेन्शन आल्यावर ड्रग घेण्यात गैर काय?’ अशी त्याची मानसिकता होती. योग्य अयोग्यची सीमारेषा ओलांडलेल्या त्या मुलाशी दीर्घ चर्चा करून अवचट दाम्पत्याने त्याला पूर्वपदावर आणले. अवचट ह्यांनी आपल्या लेखातून हा अनुभव मांडल्यावर अनेक रुग्णांच्या पालकांकडून समुपदेशन मिळवण्यासाठी फोन येऊ लागले.

ह्या लेखमालिकेत आणखी भर घालून अवचट ह्यांनी `गर्द’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. ते पुस्तक वाचून अस्वस्थ झालेले पु.ल. देशपांडे ह्यांनी अवचट दांपत्याला आपल्या घरी बोलावून घेतले. त्यांच्या हातावर लाखभर रुपये ठेवून अशा रुग्णांसाठी काहीतरी विधायक काम करा, असा विनंतीवजा आदेश दिला. व्यसनी रुग्णांना नियमित उपचार मिळावेत आणि ते व्यसनमुक्त व्हावेत, यादृष्टीने डॉ. अनिता अवचट ह्यांनी व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याची कल्पना मांडली. पुलंनी तत्काळ त्यांच्या निर्णयाला दुजोरा दिला.

मुंबईत केईएम रुग्णालयात डॉ. आनंद नाडकर्णी अशा प्रकारचा प्रयोग करत होते, आणखी एक दोन हॉस्पिटलमध्ये व्यसनमुक्ती केंद्र सुरु होती, मात्र केईएम वगळता बाकीची केंद्रे बंद पडली होती. मित्रवर्य डॉ. आनंद नाडकर्णी ह्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्या कामाचे प्रत्यक्ष स्वरूप बघून अवचट दाम्पत्याने २९ ऑगस्ट १९८६ रोजी सर्व तयारीनिशी मुक्तांगणची स्थापना केली.

डॉ. नाडकर्णी ह्यांचे `स्थूलता निवारण केंद्र’, `ड्रग्ज मुक्ती केंद्र’ एवढेच काय तर `जुगार मुक्ती’ केंद्रही होते. त्यांच्या केंद्रामध्ये व्यसनमुक्तीसाठी ज्या उपचार पद्धती वापरल्या जात होत्या त्याचा अभ्यास करून अवचट दाम्पत्याने आपल्या कल्पकतेने नवीन साचा तयार केला. रुग्णाला `दारू सोड’ हे त्याने हजारदा ऐकलेले वाक्य न ऐकवता त्याच्यात दडलेल्या चांगल्या माणसाचे त्याला दर्शन घडवून द्यायचे, हा नियम त्यांनी आयुष्यभर पाळला. त्यामुळे त्यांच्या सहवासात अनेक रुग्णांनी सर्वप्रथम गमावलेला आत्मविश्वास कमावला आणि हळू हळू निग्रहाने स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणले. त्यापैकी काही जण पुन्हा व्यसनाकडे वळले, पण त्यांनी पुन्हा मुक्तांगणाची पायरी चढून कायमस्वरूपी व्यसनमुक्ती करून घेतली.

deepमुक्तांगणात समाजातील सर्व स्तरातील, तसेच गुन्हेगारी क्षेत्रातलेसुद्धा रुग्ण असतात. त्या सर्वांना एकसमान वागणूक दिली जाते. स्वावलंबित्व शिकवले जाते. त्यांच्याकडून सर्व प्रकारची कामे करून घेतली जातात. आयता कर्मचारी मिळतोय म्हणून नाही, तर व्यसनी रुग्णाला कामात सतत गुंतवून ठेवणे, हा त्यामागील हेतू असतो. रिकाम्या डोक्याने वावरणाऱया व्यसनी माणसाला वारंवार व्यसन करण्याची तलफ येऊ शकते, म्हणून त्याच्या हाताला आणि मेंदूला काम देणे इष्ट ठरते. सुरुवातीचे ४ दिवस रुग्णाची खूप चिडचिड होते, पण ते नंतर एवढे सरावतात, की आपणहून प्रत्येक कामासाठी पुढाकार घेतात. एक श्रीमंत घरातला मुलगा अवचट ह्यांना सांगतो, `बाबा, मला तलफ आली ना, की मी चार पाच संडास धुवून काढतो, हाताला मिळेल ते काम करतो, मग `तो’ विचारही मनाला शिवत नाही.’ असे सांगणाऱया अनेक व्यक्ती आणि वल्ली अवचट ह्यांना मुक्तांगणच्या प्रवासात भेटल्या. त्याबद्दल त्यांनी `मुक्तांगणची गोष्ट’ ह्या पुस्तकात सविस्तर वर्णन केले आहे. ते लिहितात, `आजवर मुलाखतीला जाताना किंवा परीक्षेला जाताना खिशात अंगाऱयाच्या पुडय़ा ठेवणारे भाविक पाहिले होते, मात्र दिलासा म्हणून ड्रग्जच्या पुडय़ा खिशात बाळगणारे महाभाग मुक्तांगणात बघायला मिळाले.’

मुक्तांगणात आलेल्या रुग्णांना दारू न पिताही एकत्र `बसता’ येते, याची जाणीव झाली. ह्याचे कारण म्हणजे तेथील घरगुती वातावरण. कुटुंबातील सदस्यांमध्ये जसे खेळीमेळीचे वातावरण असते, तसेच मुक्तांगणातही असते. इथे येणारे रुग्ण वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात, कोणी कलाकार तर कोणी कवी, कोणी गायक तर कोणी वकील. फक्त परिस्थितीने वाट चुकलेले पांथिक. जे त्यांच्या व्यसनापायी घरच्यांच्या आणि समाजाच्या नजरेतून उतरलेले असतात. मुक्तांगणमध्ये मात्र त्यांना त्यांचा मान परत मिळवून दिला जातो. जगण्याची उम्मेद जागवली जाते. कलागुणांना वाव दिला जातो. त्यामुळे इथून व्यसनमुक्त झालेले रुग्ण नवीन आयुष्याचा श्रीगणेशा करतात. काही जण बरे झाल्यावरही इतर पीडित रुग्णांना त्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मित्रत्वाने मदत करतात. तिथे आलेल्या प्रत्येक रुग्णाला भूतकाळ विसरून वर्तमानकाळात जगण्याचे प्रशिक्षण दिले जाते, नव्हे तशी सवयच लावली जाते.

vyasanव्यसनांपायी उद्ध्वस्त झालेल्या संसाराची घडी बसावी म्हणून `सहजीवन’ सभा भरवल्या जातात. बायकांना त्यांच्या अडचणी मोकळेपणाने सांगता याव्यात म्हणून `सहचारी’ गट चालवला जातो. नवऱयाच्या जाचाला कंटाळलेल्या बायकांमध्ये परिस्थितीला योग्य पद्धतीने हाताळण्याची शिकवण दिली जाते. `अंकुर’ सारख्या उपक्रमातून व्यसनी बापाच्या वागणुकीने त्रस्त झालेल्या बाळगोपाळांना जमवून मनोरंजनातून सुखाचे क्षण मिळवून दिले जातात.

मुक्तांगणाने केवळ रुग्णाचा आणि त्याच्या कुटुंबीयांचाच नाही, तर पोलीस, न्यायव्यवस्था ह्यांचाही दृष्टिकोन बदलला आहे. व्यसनी गुन्हेगाराकडे सुधारणेच्या दृष्टीने पाहावे, त्याची शिक्षा सौम्य असावी, त्याला चांगले जगण्यास उत्तेजन द्यावे, यासारख्या गोष्टी कायदेतज्ञांच्या मदतीने त्यांनी कायद्यात आणल्या.

मुक्तांगणातून रुग्ण डिश्चार्ज होताना अंतर्दीप प्रज्वलन विधी केला जातो. रुग्णाने व्यसनमुक्त राहावे म्हणून एक शुभेच्छा पत्र दिले जाते. बरेच जण ते पत्र कायम खिशात बाळगतात. ते पत्र आपल्याला व्यसनांपासून, एकटेपणापासून, रागापासून परावृत्त करते,असा अनुभव अनेकांनी अवचट ह्यांना सांगितला.

मुक्तांगणाच्या यशाचे सर्व श्रेय आपल्या पत्नीला देताना अवचट सांगतात, `डॉ. अनिता मानसोपचार तज्ञ असल्याने औषधाबरोबरच प्रेमळ वागणुकीने रुग्णात परिवर्तन घडवून आणण्यावर तिने भर दिला. तिची शिस्त कडक होती, पण रुग्णांवर अपत्याप्रमाणे मायाही होती. स्वत: कॅन्सर पेशन्ट असूनही शेवटपर्यंत तिने रुग्णसेवा केली. आता तिची गादी आमची मुलगी मुक्ता चालवत आहे. मी मात्र सुरुवातीपासून सहाय्यकच्या भूमिकेतच आहे आणि पुढेही राहीन. ह्या प्रवासात अनेक मंडळींकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. डॉ. आनंद नाडकर्णींसारख्या मित्र आणि मार्गदर्शकाची साथ लाभली, पुलंना दिलेला शब्द पाळता आला आणि मुख्य म्हणजे एवढय़ा लोकांना नरकात जाण्यापासून रोखता आले, याचे मानसिक समाधान मिळाले.’

जाता जाता गटारीचा विषय काढला असता अवचट सांगतात, `गटारीच्या दिवसाशी काही लोकांचे पिण्याचे असोसिएशन असते, ३१ डिसेंबरलाही असते. ही असोसिएशन मोडायची हे त्या व्यक्तीने ठरवले पाहिजे. ते शक्य झाले, तर इतरांच्या सहाकार्याने हळू हळू प्रतिवर्षीची गटारी मोडून काढता येते. अशा दोन-चार गटारी गेल्या, की असोसिएशन तुटते, नंतर गटारी आली काय आणि गेली काय, फरक पडत नाही. कोणतेही व्यसन करताना प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे, की ते अन्न नाही, त्याशिवायही आपल्याला छान जगता येणार आहे. उलट त्याच्या सवयीने आपले, आपल्या शरीराचे, संसाराचे आणि आयुष्याचे नुकसान होणार आहे. व्यसनाची वाट निसरडी आहे, त्यावरून चालणारा हमखास पडणारच, मग ती वाट कशाला निवडा? आनंद मिळवण्याचे अनेक रस्ते आहेत, ते शोधून काढा. निसर्गात, संगीतात, वाचनात, कामात स्वत:ला अडकवून घ्या, म्हणजे व्यसनाची गरज लागणार नाही. कृत्रिम आनंदाची वाट सोडून नैसर्गिक आनंदाची वाट धरा. आपल्या आयुष्याच्या मुक्तांगणात स्वच्छंद बागडून घ्या आणि ते शक्य झाले नाही, तर आमच्या मुक्तांगणाला जरूर भेट द्या. कारण…
स्वप्ने विरली, दिशा हरवली, रडलो ओक्साबक्शी,
आयुष्याला ग्रहण लागले, व्यसने केवळ साक्षी
व्यसनमुक्तीच्या उपचारांची मनी उमलता नक्षी,
उपचारांनी मार्गी लागे `मुंक्तांगणचा पक्षी’

आपली प्रतिक्रिया द्या