फाल्गुनीचा ‘संकल्प’

>> ज्योत्स्ना गाडगीळ

प्रसिद्धीचा राजमार्ग असलेल्या बॉलीवूडमध्ये नशीब न आजमावता आपण निवडलेल्या मार्गावर बॉलीवूडकरांना थिरकायला भाग पाडणारी सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक! तिच्या नावापुढे ‘दांडिया क्वीन’ ही बिरुदावली चिकटवली, तिच्या चाहत्यांनी! तीस वर्षांत तिने निर्माण केलेले महागरब्याचे प्रस्थ पाहता तिचा प्रवास थक्क करायला लावतो.

इंडस्ट्रीत कोणीही गॉडफादर नसताना, नामांकित ब्रँडचे पाठबळ नसताना ‘फाल्गुनी’ हे नाव स्वत:च एक ब्रँडनेम झाले. ती आता नवरात्रीचा मुख्य धागा झाली आहे. `संकल्प’ ह्या तिच्या संगीत वाद्यवृंदाने आजवर लाखो लोकांना नाचवले आहे. ज्यात ३ वर्षांपासून ते ६०-७० वयोगटांतील लोकांचा, तसेच अमिताभ बच्चनपासून समस्त बॉलीवूड नटनट्यांचाही सहभाग असतो.

गोड गळा, लाघवी स्वभाव आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व ह्या तिन्ही गोष्टी फाल्गुनीला दैवी देणगी म्हणून मिळाल्या आहेत. १२ मार्च १९६९ चा तिचा जन्म आहे. मूळची अहमदाबादची असलेली फाल्गुनी जन्माने मुंबईकर आहे. तिची आई गायिका आणि बहिणी संगीत विशारद आहेत. फाल्गुनीने एका जागी बसून संगीताचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नसले, तरी तिच्यावर आई आणि बहिणींमुळे आपसुकच संगीताचे संस्कार झाले. घरात २४ तास रेडियो सुरू असल्याने लता-आशा-रफी-किशोर हे तिचे बालपणापासून गुरू होते. त्यांच्याबरोबर ती गाण्याचा सराव करीत असे.

वयाच्या नवव्या वर्षी तिने पहिल्यांदा व्यासपीठावर `लैला मै लैला’ हे गाणे सादर केले होते. त्यानंतर तिला नवरात्रीत गायिका म्हणून ब्रेक मिळू लागला. समूह गायक ते मुख्य गायक हा प्रवास पूर्ण करण्यास तिला १९८९ पर्यंत वाट बघावी लागली. तिचा आत्मविश्वास वाढला. १९९४ मध्ये तिने `ता थैया’ नावाचा संगीत वाद्यवृंद सुरू केला. सोसायटीत, घरगुती समारंभात कार्यक्रम करून ती दिवसाला २०-२५ रुपये कमवत असे. हळूहळू गरब्यासाठी तिची लोकप्रियता वाढू लागली, तस तसे तिचे मानधनही वाढू लागले. आजच्या घडीला तिच फाल्गुनी दिवसाला २०-२५ लाख रुपये कमाई करत आहे. मात्र, ह्या यशासाठी तिला बरीच स्थित्यंतरे बघावी लागली, अपार मेहनत घ्यावी लागली, तेव्हा कुठे ती प्रसिद्धीच्या शिखरावर स्थिरावली.

navratri-venues

गरबा म्हणजे फाल्गुनी असे समीकरण तयार होऊ लागले. वर्षभरात कोकिळेसारखी लुप्त होणारी फाल्गुनी नवरात्रीच्या दिवसांत प्रगट होत असे. अजूनही तिचा तोच नेम असतो. वर्षभरात तिचे देश-विदेशांत कार्यक्रम सुरू असतात आणि नवरात्रीच्या सुमारास मुंबई-गुजरातमध्ये तिचा मंजूळ सूर कानी पडतो.

गरब्याची लोकप्रियता पाहता चाहत्यांच्या मागणीनुसार फाल्गुनीने १९९८ मध्ये `नॉनस्टाप गरबा’ची सीडी रेकॉर्ड करायचे ठरवले. त्यावर रेकॉर्ड कंपनीच्या मालकांनी तिला तिने अभ्यासलेल्या राजस्थानी, गुजराती पारंपरिक लोकगीतांना नव्याने चाली बांधून ती गाणी रेकॉर्ड करण्याचा सल्ला दिला. तिने तसे केलेही! एका राजस्थानी लोकगीताच्या आधारावर `चुडी जो खनके हाथों में’ हे गाणे गायले आणि हलक्या फुलक्या लव्हस्टोरीवर चित्रित करून प्रकाशित केले. तो काळ होता डीजेचा, रिमेक्सचा! जुन्या गाण्यांचे विद्रुपीकरण ऐकून लोक कंटाळले होते, अशातच फाल्गुनीचे हे नवे कोरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले, पसंतीस उतरले आणि गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर फाल्गुनीने दहा-बारा गाण्यांचा धडाकाच लावला. गाण्याचे सुश्राव्य संगीत, त्यात गुंफलेली प्रेमकथा आणि आकर्षक चित्रण ह्यामुळे तिच्या अलबमची सगळी गाणी हीट झाली. पुढे पुढे तिथेही स्पर्धा होऊ लागली, श्रेय लाटण्याची कामे होऊ लागली. ह्या बॉलीवूडच्या वाळवीला कंटाळून फाल्गुनीने अलबमचे काम थांबवले आणि आपल्या सांगीतिक कार्यक्रमांना प्राधान्य दिले.

फाल्गुनीच्या कार्यक्रमांना तिचे चाहते भरजरी पेहराव करून येतात. मात्र फाल्गुनीने कधीच तसा पोशाख केला नाही. ती तिच्या पुरुषी पेहरावामुळे आणि केशरचनेमुळे लोकांच्या स्मरणात राहिली. त्याबद्दल विचारले असता फाल्गुनी सांगते, `आम्हा बहिणींमध्ये मी सगळ्यांत धाकटी. भाऊ होईल ह्या आशेवर असलेल्या माझ्या बहिणींनी मला बालपणापासून मुलासारखेच वागवले. शाळेतल्या एक-दोन स्पर्धा वगळता मी मुलींसारखा पेहराव कधीच केला नाही. माझा वेश मला आवडतो. मुलींसारखा पेहराव नाही, त्यामुळे मुलींसारखा नट्टा-पट्टाही मला जमत नाही आणि आवडतही नाही. स्टेजवर कॅमेऱ्यासमोर नीट दिसावे, म्हणून माझी आर्टिस्ट मला तयार करून देते, तेवढाच काय तो मेक-अप! बाकी माझे सगळे सौंदर्य मी गाण्यातच ओतते!’

आजमितीस फाल्गुनी पाठक ही उत्तम गायिका तर आहेच, शिवाय उत्तम संगीत संयोजकही आहे. गेली अनेक वर्षे तिचा वाद्यवृंद लोकांचे मनोरंजन करत आहे. ती सांगते, `गायिका म्हणून मी जेव्हा इतरांच्या कार्यक्रमात गायचे, तेव्हा मानधन मिळाल्यावर माझा आणि कार्यक्रमाचा संबंध संपुष्टात येत असे. मात्र, कार्यक्रमाची संयोजक मीच आहे म्हटल्यावर माझ्यावर असंख्य जबाबदाऱ्या  असतात. गाण्यांची, गायकांची, वादकांची, वाद्यांची निवड करण्यापासून ते थेट तालिम घेणे, कार्यक्रमाआधी माईक तपासणे इथपर्यंत सर्व कामांवर मला देखरेख ठेवावी लागते. कार्यक्रम वेळेत सुरू करण्यावर माझा नेहमीच भर असतो. आपल्यासाठी पैसे खर्चून आलेल्या आपल्या चाहत्याला ताटकळत ठेवणे मला पसंत नाही. उपस्थित प्रत्येकाला `पैसा वसूल’ झाल्याचा आनंद मिळवून देणे हे माझ्या कार्यक्रमाचे ध्येय असते. मी कार्यक्रमाला कितीही सरावले असले, तरी दरवेळेस मनात थोडीफार भीती असतेच, जी व्यासपीठावर पाय ठेवता क्षणीच कुठल्या कुठे पळून जाते.’

फाल्गुनीच्या लोकप्रियतेमुळे गरबा-दांडियाच्या क्लासेसलाही उधाण आले आहे. गरबा खेळताना सर्वांना एकसारखा पदन्यास करता यावा म्हणून लोक चार महिने आधी शिकवणी घेतात आणि नवरात्रीच्या दिवसात समूहाने नृत्य करून आनंद घेतात. याबाबत फाल्गुनीला विचारले असता ती सांगते, `नवरात्रीत देवीच्या भक्तिरंगात बेभान होऊन नाचणे हा ह्या उत्सवाचा मुख्य आशय आहे. माझ्या कार्यक्रमांत अंबा मातेचा जागर, हिंदी, मराठी, राजस्थानी, पंजाबी लोकगीते, चित्रपटगीते ह्यांचाही समावेश असतो.  माझ्या सगळ्या गाण्यांमधून मी तो आनंद उपभोगते. राहिला प्रश्न लोकांचा, तर तो त्यांचा आनंद आहे. त्यातून कोणाचेही नुकसान नाही. हा उत्सव आनंद देणारा आहे आणि त्या आनंदाचा मी एक भाग होऊ शकले, ह्याचा मला आनंद आहे.’

navratri-garba

फाल्गुनी पाठक ही आज एक मोठी सेलिब्रेटी असली, तरी तिला तुमच्या आमच्यासारखे कौटुंबिक जीवन जगायला आवडते. तिला सर्व प्रकारचे शाकाहारी जेवण आवडते, भैयाजीच्या ठेल्यावर जाऊन पाणीपुरी, शेवपुरीचा फडशा पाडायला आवडतो. कार्यक्रम नसतानाच्या काळात ठिकठिकाणी फिरायला जाणे आवडते. नातेवाईकांची, मित्रपरिवाराची भेट घेणे आवडते. फाल्गुनीला ऐकण्यासाठी तिचे चाहते पैसे खर्चून तिच्या कार्यक्रमास हजेरी लावतात, परंतु त्यांच्या घरगुती कार्यक्रमात फाल्गुनीच्या बहिणी गातात आणि ती श्रोत्यांच्या भूमिकेत असते.

आजवर मिळालेल्या यशाबद्दल फाल्गुनी समाधानी आहे. तिचे स्वप्न विचारले असता, ती म्हणते, `आजवर जे जे घडत गेले, ते स्वप्नवतच होते. माझ्या यशाचा आलेख उंचावत राहिला, तो आरोही ठेवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहिले. माझ्या संगीताने लाखो लोकांना समाधान मिळत आहे, भविष्यातही त्यांना असाच आनंद देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल, नव्हे तसा `संकल्प’च मी केला आहे.’