कानामागून आली, ‘मुरांबा’ झाली!

230

>> ज्योत्स्ना गाडगीळ

`सहजता’ हे जिच्या अभिनयाचे बलस्थान आहे, `गोडवा’ हा जिच्या सौंदर्याचा एक भाग आहे, जिचा `आत्मविश्वास’ ती साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला विशिष्ट उंचीपर्यंत नेतो, ती आहे आजच्या तरुण पिढीची नायिका मिथिला पालकर. अवघ्या २४ वर्षांची मिथिला उदयोन्मुख कलाकार म्हणावी की लोकप्रिय कलाकार, हा संभ्रम आहे. मागील दोन वर्षांतील तिची वाढती लोकप्रियता पाहता, येत्या काळात बॉलिवूड, टॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडेल, ह्यात शंका नाही. येत्या २ जून रोजी ती घेऊन येत आहे `मुरांबा’, तोही दीर्घकाळ टिकणारा!

`मुरांबा’ ह्या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारी मिथिला इतके दिवस इंटरनेटवरील `वेब सिरिझ’ मधून तरुण प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालत होती. वेब सिरिझ अर्थात इंटरनेटवर चालणाऱ्या मालिका, पण त्यात टीव्ही मालिकांसारखे चावून चोथा झालेले रटाळ विषय नसतात. तर, आपल्या दैनंदिन जगण्यातले अनेक छोटे-मोठे क्षण कलात्मकरित्या मालिकेत साकारले जातात. त्यात काम करणारी बहुतांशी मंडळी हिंदी-इंग्रजी थेटरमधील कलाकार असतात, जी आपल्याला चेहऱ्याने परिचयाची नसली, तरी त्यांच्या सहज अभिनयामुळे ती आपल्यातली वाटतात. अशाच वेब सिरिझचा अविभाज्य भाग झालेली मध्यम वर्गीय कुटुंबातली मराठमोळी मिथिला तरुणांची `आयडॉल’ झाली आहे.

सध्याचा तरुण मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर `पडिक’ असतो. हा टार्गेट ऑडियन्स कव्हर करण्याच्या दृष्टीने वेब सिरिझचा जन्म झाला. `बिनदास’ नावाच्या वाहिनीने `गर्ल इन द सिटी’, `ऑफिशिअल चुक्यागिरी’, `लिटिल थिंग्स’, `फिल्टर कॉफी’ अशा वेब सिरिजमधून मिथिलाला तिचे अभिनय कौशल्य दाखवण्याची संधी दिली आणि तिने ती सार्थ ठरवली. ह्या मालिकांच्या शीर्षकांवर जेवढा इंग्रजी प्रभाव आहे, तेवढाच मालिकांमधील संवादांवरही आहे. तरीदेखील त्यात बोजडता अजिबात नाही. आपल्यात जसे संवाद घडतात, तसे कलाकारांमध्ये ऑनस्क्रीन संवाद घडतात. मराठी कुटुंबातून आलेल्या मिथिलानेही ते आव्हान लीलया पेलेले आहे. तिचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्त्व पाहता आणि संवादफेकीतील सहजता पाहता ती मिथिला पालकर नसून खरोखरीच मालिकेतली मीरा सहगल वाटू लागते. `काव्या’, `मिली’, `मीरा’, `इंदू’ ह्या भूमिकांना मिथिलाने वेळोवेळी न्याय मिळवून दिला आहे. `यू ट्यूब’, `फेसबुक’, `इन्स्टाग्राम’, `बिनदास’ चॅनेलवर तिची वेब सिरिज बघणारे तिचे लाखो चाहते आहेत.

muramba-title-song-mithila

वेब सिरिझमध्ये वावरणारी किंवा `मुरांबा’ ह्या आगामी चित्रपटात दिसणारी मिथिला दादरच्या मध्यम वर्गीय कुटुंबातली मराठमोळी मुलगी आहे. तिचे बालपण दादरच्या घरात गेले. शिक्षणही तिथेच झाले. आजी-आजोबांच्या सान्निध्यात रमणारी मिथिला सेटवर ग्लॅमरस भूमिका साकारत असली, तरी दादरच्या जुन्या पठडीच्या घरात रमणे ती पसंत करते. घरातल्या झोक्यावर झोके घेते. जुन्या कॅसेटप्लेअरवर गाणी ऐकते. वेळ मिळेल तेव्हा आनंदाने स्वयंपाक करते, कुकिंग एक्स्पर्ट असलेल्या आजीची कौतुकाची थाप घेते. आजोबांकडून लाड करून घेते. बाबांबरोबर हिंदी-मराठी भावगीत, भक्तीगीत, शास्त्रीय, उपशास्त्रीय असे विविध गायनप्रकार ऐकते. ह्या सगळ्यात कुठेही तिचे `स्टारडम’ दिसत नाही. मात्र, अभिनय क्षेत्रात वावरताना तिचा `ग्लॅमरस’ अवतार तरुण-तरुणींना नक्कीच भुरळ पाडतो. तिचे स्टायलिश कपडे पाहून `फ्लिपकार्ट’वर अनेक जणी तिच्यासारखे कपडे विकत घेतात. तिच्या झुबकेदार कुरळ्या केसांचे तर अनेक चाहते आहेत. पण, ह्या सगळ्या गोष्टी ती निभावून नेते, त्यामागचे मुख्य कारण म्हणजे, `सहजता’!

अभिनयातील ही सहजता तिच्यात एका रात्रीत आलेली नाही. अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा तिचा मानस होता, पण घरच्यांच्या आग्रहास्तव तिने आधी शिक्षण पूर्ण केले आणि सोबतच अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावून पाहिले. कॉलेजमध्ये शिकत असताना तिच्या मित्राने `माझा हनिमून’ ह्या लघुपटात काम करण्यासाठी तिला विचारणा केली. एका टिपिकल मराठी मुलीचे ठरवून लग्न जुळल्यावर ती आपल्या हनिमूनबद्दल जसे स्वप्नरंजन करेल, तोच एकपात्री संवाद मिथिलाने त्या लघुपटात साधला आहे. तो लघुपट `मुंबई आर्ट फेस्टिव्हल’मध्ये दाखवण्यात आला. लघुपटाची आणि मिथिलाच्या अभिनयाची लोकांनी बऱ्यापैकी दखल घेतली. पण, तिथून तिच्या स्वप्नांनी धाव घेतली, असे घडले नाही. कारण,
अजून `ती’ वेळ आली नव्हती…

शिक्षण घेता घेता मिथिला नशीब आजमावत राहिली. `थेस्पो’ या मोठ्या नाट्यमहोत्सवात तिने पडद्यामागे काम केले. तिथे तिला ह्या क्षेत्रातील अनेक मंडळी भेटली, तसेच हिंदी-इंग्रजी नाटकांसाठी बोलावणे आले. पैकी `आज रंग है’, `टुन्नी की कहानी’ ह्या दोन नाटकांमध्ये सध्या ती काम करत आहे. सोबत `गर्ल इन द सिटी-२’च्या वेब सिरिजही सुरू आहेत. मराठी रंगभूमी तिला खुणावतीये, पण अजून तशी संधी मिळाली नाही, मात्र `मुरांबा’च्या निमित्ताने तिचे मराठी चित्रपट दुनियेत पदार्पण झाले आहे. चित्रपटाचे टीझर पाहता हा चित्रपट आजच्या तरुणांना आणि त्यांच्या पालकांना आवडेल अशी चिन्हे दिसत आहेत. ह्याआधी `कट्टी-बट्टी’ ह्या हिंदी सिनेमातून मिथिलाने इमरान खानच्या छोट्या बहिणीची छोटीशी भूमिका केली होती. त्यानंतर विविध जाहिरातींसाठीही तिने काम केले होते.

मिथिलाला घरातून अभिनयाची किंवा मनोरंजन क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही, ती स्वबळावर ह्या क्षेत्रात आली. जाहिरात विषयात ती पदवीधर आहे, परंतु अभिनयाचे धडे तिने काम करता करताच घेतले. एखाद्या भूमिकेचा अभ्यास करण्याची तिची पद्धत वेगळी आहे. दिग्दर्शकांशी, लेखकांशी, संवादलेखकांशी संवाद साधून त्यांच्या दृष्टीतून `ती’ व्यक्तिरेखेकडे पाहते आणि तशी भूमिका साकारते. पडद्यावर आत्मविश्वासाने वावरणारी मिथिला सांगते, `कॅमेरासमोर एन्ट्री घेताना माझी नेहमीच धाकधुक होत असते. चेहेऱ्यावर ती दिसत नसली, तरी मनात असते. पण एकदा का त्या भूमिकेत शिरले, की मी ती एन्जॉय करते.’

मिथिलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा गोड गाता गळा! `ही चाल तुरु तुरू’ हे गाणे `कप’ ह्या एका वाद्याद्वारे तिने पुनरुज्जिवित केले. गेल्या वर्षी मार्च महिन्यात तिने `कप साँग’ ही कला यूट्यूबवर शिकून घेत त्याच्या ठेक्यावर हे मराठी लोकप्रिय गाणे बसवले आणि यूट्यूबवर टाकले. तिच्या त्या हटके सादरीकरणामुळे तिला लाखो लाईक्स मिळाले. केवळ सर्वसामान्य रसिकांकडून नाही, तर प्रख्यात कवी आणि गायक स्वानंद किरकिरे, अभिनेता परेश रावल, लेखक-दिग्दर्शक इम्तेहाज अली ह्यांचीही कौतुकाची थाप मिळाली. तिच्या गोड गळ्यावर बालपणी संगीतकार वर्षा भावे ह्यांचे गाण्याचे संस्कार झाले होते. पण तिथे दोन वर्षे गाणे शिकल्यावर रियाजात खंड पडला, शिकणे बंद झाले, पण गुणगुणणे सुरूच होते. बऱ्याच वर्षांनी गायिका सुखदा कुलकर्णी ह्यांच्याकडे पुन्हा शास्त्रोक्त संगीत शिकायला सुरुवात केली, पण शूटिंगच्या व्यस्त दिनचर्येमुळे त्यातही खंड पडू लागला. तरीदेखील वेळात वेळ काढून मिथिला संगीताचे आणि नृत्यांगना राधिका फणसेंकडून कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेत आहे.

असे वैविध्य जपणाऱ्या मिथिलाला तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल विचारले असता ती सांगते, `मला कोणत्याही गोष्टीत नाविन्य शोधण्याची सवय आहे. अगदी माझ्या अभिनयातही तोच तो पणा येत असल्याची जाणीव झाली, की लगेच मी स्वत: बदलण्याचा प्रयत्न करते. मला वेगवेगळे प्रयोग करून बघायला आवडतात. म्हणून अभिनय क्षेत्रात कंगना रणौत, प्रियांका चोप्रा ह्या नायिका मला आवडतात. तर भविष्यात रणबीर कपूरबरोबर काम करायची माझी इच्छा आहे. त्यासाठी एक कलाकार म्हणून माझी `स्ट्रगल’ सुरू आहे. स्वत:ला सिद्ध करण्याचा माझा अट्टाहास नाही, येणाऱ्या प्रत्येक कामाचा मनापासून, भरभरून आनंद घेता येणे हे माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आाहे. आज प्रसिद्धी मिळत असली, तरी `हे’ दिवस कायम नसतात, हे मी माझ्या मनावर बिंबवून ठेवले आहे. त्यामुळे भविष्यात अशी स्थिती कायम राहो न राहो, आपण नेहमीच आनंदात राहायचे, हे मी स्वत:शी ठरवून टाकले आहे. माझा मित्रपरिवार, कुटुंब यांच्यात मी रमते, ते नेहमीच माझ्या सोबत राहतील. भविष्याचा फार विचार न करता स्वत:ला मी ह्या क्षेत्रात झोकून दिले आहे. प्रामाणिकपणे काम करत आहे आणि पुढेही करणार आहे.

`मुरांबा’ चित्रपटात मिथिलाला चिन्मयी सुमित, सचिन खेडेकर, अमेय वाघ ह्या मराठी चित्रपटसृष्टीत मुरलेल्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. चित्रपटातही मिथिला अतिशय गोड दिसत आहे. मराठी चित्रपटांनी कधीच कात टाकली आहे, पण मिथिलासारख्या कलाकारांच्या चित्रपटसृष्टीत येण्यामुळे मराठी चित्रपट `तरुण’ होत चालल्याचा दिलासा मिळत आहे. मिथिलाच्या अभिनयाचा `मुरांबा’ दीर्घकाळ टिकावा आणि त्याचा आंबट-गोड स्वाद सर्व रसिकप्रेक्षकांना घेता यावा, ही सदिच्छा!

आपली प्रतिक्रिया द्या