संत विचारांचे ‘रिंगण’

256

>>ज्योत्स्ना गाडगीळ

भजनातील अत्युच्च आनंद अनुभवण्याचा क्षण म्हणजे रिंगण. रिंगण कोणाचे? तर संतविचारांचे! ग्यानबा-तुकारामाच्या गजरात फेर धरणारे वारकरी रिंगणात मनसोक्त नाचतात. तसे केल्याने त्यांचा सगळा शिणवठा नाहीसा होतो. वारी झाली की, तृप्त मनाने वारकरी आपापल्या गावी मार्गस्थ होतात. मात्र काही जणांना इच्छा असूनही वेळेअभावी ह्या रिंगणात उतरण्याची संधी मिळत नाही, संत विचारांवर हसत-खेळत अध्यात्म शिकण्याची संधी मिळत नाही, मराठी संस्कृती आणि परंपरा ह्यांचे प्रत्यक्षात दर्शन घडत नाही, अशा वारकऱ्यांसाठी ‘संत विचारांचे रिंगण’ घेऊन आले आहेत, मुक्त पत्रकार सचिन परब. त्यांच्या `रिंगण’ ह्या वारी विशेष वार्षिक अंकाचे यंदाचे पाचवे वर्ष!

`दिवाळी अंक निघू शकतो, तर महाराष्ट्राचा वार्षिक सोहळा असणाऱ्या वारीचा अंक का असू नये?’ ह्या अंत:प्रेरणेने परब ह्यांनी `रिंगण’ सुरू करायचे ठरवले. त्यासाठी त्यांना अनेक पत्रकार मित्रांची साथ लाभली. पत्रकारितेत राहून ज्यांनी दरवर्षी `वारी’ ह्या विषयावर वेगवेगळ्या प्रकारे प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला-कोणी लिखाणातून, कोणी छायाचित्रातून, कोणी थेट प्रक्षेपणातून! अशाच सवंगड्यांना घेऊन परब रिंगणात उतरले. `संतपरंपरेचा सामाजिक आणि सांस्कृतिक मागोवा घेणारे  वार्षिक’ अशी रिंगणची टॅगलाइन आहे.

घरबसल्या रिंगणाचा आनंद देणारे सचिन परब २२ वर्षांपासून पत्रकारितेत आहेत. `नवशक्ती’, `मी मराठी’, गोवा येथून प्रसिद्ध होणारा `गोवादूत’ अशा टीव्ही आणि वृत्तपत्रांत त्यांनी संपादक पदावर काम केले आहे. तसेच, महाराष्ट्र टाईम्सच्या संकेत स्थळाचे संपादक म्हणूनही पदभार सांभाळला. `ई टीव्ही’, `सहारा’ ह्या वाहिन्यांवर राजकीय पत्रकार म्हणून काम केले. असे विविध अनुभव घेत असताना स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी त्यांनी नोकरी सांभाळून प्रबोधनकारांच्या साहित्य संकलनाचा प्रकल्प हाती घेतला आणि मोठ्या प्रयत्नांनी तो तडीस नेला. prabodhan.org या संकेतस्थळावर प्रबोधनकारांचे बहुतांश लेख, पुस्तके, छायाचित्रे, इ. महत्त्वपूर्ण गोष्टी त्यांनी संकलित केल्या आहेत. अनेक अभ्यासक, वाचक आज त्या संकेतस्थळाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. ह्या एका यशानंतर त्यांना आणखी अनेक कल्पना सुचू लागल्या. मात्र त्या पूर्णत्वास नेण्यासाठी वेळ पुरत नव्हता. म्हणून त्यांनी नोकरी सोडून मुक्त पत्रकारिता करण्याचा निर्णय घेतला. ह्या निर्णयानंतर त्यांनी हाती घेतलेला दुसरा प्रकल्प म्हणजे `रिंगण’!

`रिंगण’ सुरू करत असताना त्यात नेमके काय मांडायचे आहे, ह्याबाबत त्यांचे विचार स्पष्ट होते. त्यांचे सहकारी संपादक श्रीरंग गायकवाड ह्यांच्याशी चर्चा करून त्यांनी `रिंगण’ चा आराखडा तयार केला. नीलेश बने, प्रशांत जाधव, पराग पाटील, हर्षदा परब, राजा कांदळकर हे पत्रकार मित्र सोबत होतेच. शिवाय  संतसाहित्यावर अधिकार असणारे भालचंद्र नेमाडे, सदानंद मोरे, अशोक कामत, श्रीपाल सबनीस, तारा भवाळकर, रामदास डांगे अशा जाणकार अभ्यासकांचे विचार त्यांनी अंकात एकत्र आणले. तसेच, त्यांच्या पुढच्या पिढीच्या श्यामसुंदर सोन्नर, श्यामसुंदर मिरजकर, संजय सोनवणी, प्रतिमा जोशी, अरुणा ढेरे, नंदन राहणे अशा अभ्यासकांकडूनही त्यांनी संतविचारांची वाट स्पष्ट करून घेतली आहे. अशा सर्वांच्या सहकार्यातून २०१२ मध्ये पहिले रिंगण पार पडले. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात अंकाचे प्रकाशन झाले. तेव्हापासून प्रकाशन सोहळा असाच पार पाडायचा, असा जणू अलिखित नियमच झाला.

sachin-parab

`रिंगण’च्या अनुभवाबद्दल परब सांगतात, `महाराष्ट्राला संतांची भली मोठी परंपरा लाभली आहे. त्यात `रिंगण’ची सुरुवात  नेमकी कोणत्या संतांपासून करावी, अशा विचारात असताना संतशिरोमणी नामदेव ह्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले. संत नामदेवांनी ऐन तारुण्यात देशभ्रमण केले. जिथे गेले, तिथल्या लोकांना आपलेसे केले, त्यांची भाषा शिकून घेतली आणि त्या त्या भाषेत साहित्य निर्मिती केली. सर्व भाषेतील, जातीतील संतांना त्यांनी एकत्र आणले. समाजाला प्रेरणा देऊन नेतृत्व करणारी फळी तयार केली. चोखामेळासारख्या समाजाने अस्पृश्य ठरवलेल्या पण अध्यात्माची जाण असलेल्या व्यक्तीला लिहिते केले. ७५० वर्षांपूर्वी भेदाभेद अमंगळ ठरवण्याचा चमत्कार नामदेवांनी घडवून आणला. आजही अनेक गावात जातीवाद सुरू आहे. त्यासाठी संतविचाराची सातत्याने उजळणी होणे गरजेचे आहे. संत हे तत्कालीन पत्रकारच होते. पत्रकाराची वृत्तपत्रीय भाषा जशी सर्व साहित्यप्रकारांच्या तुलनेत समजण्यास सोपी असते, तशीच भाषा वापरून संतांनी समाजाला ज्ञानामृत पाजले. आजवर संतांची `मवाळ’ बाजू उद्धृत केली गेली, मात्र त्यांनी दांभिकतेवर कसे वार केले, हेदेखील लोकांना कळणे  गरजेचे आहे, तेच काम आम्ही `रिंगण’च्या माध्यमातून करत आहोत.’

पहिल्याच अंकाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर परब ह्यांचा पुढील अंकाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतरच्या वर्षांत संत चोखामेळा, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ ह्यांच्यावर अंक प्रकाशित झाले. पुढे ते अंक पुस्तकरूपानेही प्रकाशित झाले. ह्या अंकांमध्ये संतांचे जीवन, कुळ आणि मूळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तत्कालीन परिस्थिती आणि आजची परिस्थिती ह्यांचा तुलनात्मक विचार मांडला आहे. विशिष्ट शब्द, वस्तू, कालौघात लुप्त झालेल्या परंपरा ह्यांचा मागोवा घेतला आहे.

येत्या अंकामध्ये आपल्याला विसोबा खेचर ह्यांच्याबद्दल बरेच काही वाचायला मिळणार आहे. विसोबा खेचर आपल्या परिचयाचे आहेत, ते औंढ्या नागनाथाच्या कथेतून आणि दुसरे म्हणजे संत नामदेवांचे गुरु म्हणून. मात्र परब ह्यांना विसोबा खेचर सापडले, ते ज्येष्ठ साहित्यिक रा. चिं. ढेरे ह्यांनी साठच्या दशकात शोधून काढलेल्या `शडुस्थळी’ ह्या ग्रंथातून. लिंगायत विचारपरंपरेतला  तो सर्वात प्राचीन ग्रंथ विसोबा खेचरांनी लिहिलेला आहे. त्यात दिलेली माहिती वाचल्यावर आणखी माहिती मिळवावी, ह्या विचाराने त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महात्मा बसवेश्वरांचा वारसा संत नामदेवांपर्यंत आणणारे विचारवंत म्हणून विसोबा खेचरांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

`रिंगण’ हा वार्षिक अंक असल्यामुळे त्यांची बांधणी टिकाऊ असायला हवी, यासाठी चांगल्या प्रतीचा कागद वापरलेला आहे. साहजिकच त्याचा खर्चही जास्त असणार. हे आर्थिक गणित त्यांनी कसे बसवले?, असे विचारले असता परब सांगतात, `आमच्यावर प्रेम करणारे काही मित्र रिंगणला जाहिरात देतात, त्यातून खर्च निघतो. पण गेली दोन वर्षे आम्ही लोकवर्गणीतून अंकाचा खर्च निघावा यासाठी प्रयत्न करत आहोत. ज्यांना रिंगण महत्त्वाचे वाटते त्यांनी आम्हाला दरवर्षी फक्त १००० रुपये मदत करावी, असे आवाहन आम्ही करतो. देणगी देणाऱ्यांचा उल्लेख अंकात करतो. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. संतांचा हा अंक लोकांचा व्हावा, अशीच आमची इच्छा आहे. (संपर्क : ९९८७०३६८०५/९४२०६६८५१८३)

`रिंगण’चे लेख माहितीपूर्ण आहेतच, शिवाय त्याचे मुखपृष्ठदेखील एका कवी आणि चित्रकाराच्या दीर्घ विचारांतून प्रसवले आहे. मुळात संतांची बहुतांशी चित्रे ही काल्पनिक आहेत.  संत विचारांना साजेसे व्यक्तिमत्त्व चित्रकारांनी घडवले आणि आपल्यासमोर संतांची प्रतिमा तयार केली. `रिंगण’चे मुखपृष्ठ तयार करताना, आंतरराष्ट्रीय चित्रकार भास्कर हांडे यांच्यासमोरदेखील तसेच आव्हान होते. कवीमनाचे भास्कर हांडे लोकसाहित्याचेही अभ्यासक आहेत. मृखपृष्ठ रंगवतांना त्यांना अंकातील संताबद्दल तसे चित्र का काढावेसे वाटले, त्यामागे कोणती प्रेरणा मिळाली किंवा कोणता विचार होता हे सांगणारा चित्रकाराच्या दृष्टीतून चितारलेला संतदेखील अंकात सविस्तर वाचायला मिळतो. मुखपृष्ठ एवढे प्रभावी आहे, की अंकात लेख वाचत असताना ती प्रतिमा वेळोवेळी आपल्या डोळ्यासमोर राहते.

गेल्या चार वर्षांतील `रिंगण’चे अंक ringan.in ह्या संकेतस्थळावर मोफत वाचता येतील. तर, ह्या वर्षीचा अंक ८० रुपयांत विकत घेता येईल. आजवर आपण संतांचा `गजर’ केला, पण आता संत विचारही सखोलपणे जाणून घेणे, ही काळाची `गरज’ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या