दैदीप्यमान संस्कृतीला लाभलेला ‘कुलदीप’!

119

 >> ज्योत्स्ना गाडगीळ

एकीकडे देशभरात ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित होत असताना, दुसरीकडे एक युवक सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी दिवसरात्र झटत आहे. भावी पिढीचे मानसिक संवर्धन व्हावे म्हणून, कर्नाटकातील ३५ वर्षीय प्रख्यात गायक कुलदीप पै संगीत संजीवनीतून पुरातन वेद-श्लोक-स्तोत्र पुनरुज्जीवित करत आहेत. गुरु-शिष्यपरंपरा अबाधित ठेवणाऱ्या ह्या संस्कृती रक्षकाची गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष मुलाखत!

आज लोकांकडे सगळे काही आहे, पण मनःशांती नाही. ती निश्चितच संगीतातून मिळू शकते, म्हणून संगीताला `संजीवनी’ म्हणतात. आत्मशांतीची ही वैयक्तिक अनुभूती घेतल्यावर ती दुसऱ्यांनाही मिळावी म्हणून गायक कुलदीप पै ह्यांनी थेट वेद-मंत्राना हात घातला. त्यांना सुरेल चाली लावल्या. मात्र, त्या चाली मोठ्या गायकांकडून गाऊन न घेता ८-१० वर्षांच्या गायकांकडून गाऊन घेतल्या. आज एक ते दीड कोटी लोक त्यांच्या आवाजातील मंत्रानी मंत्रमुग्ध झाले आहेत.

मुलांना आणि भारतीय संस्कृतीला उत्तेजन देणारे कुलदीप पै वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून संगीत साधना करत आहेत. त्यांनी कर्नाटक संगीतात पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच मृदंग, तबला, व्हायोलिन, हार्मोनिअम, मेलोडिका अशा अनेक प्रकारच्या वाद्यवादनातही ते तरबेज आहेत. त्यांनी पाश्चात्त्य संगीताचा बारकाईने अभ्यास केला आहे. बालपणापासून अनेक गानसभा गाजवल्या आहेत. कमी वयात अत्यंत मेहनतीने देश-विदेशात नाव कमावले आहे. विविध पुरस्कारांनी त्यांच्या घराचा कानाकोपरा भरलेला आहे. घरातच त्यांनी म्युझिक स्टुडिओ थाटलेला आहे. तिथे त्यांची संगीत आराधना अखंड सुरू असते.

घरात संगीताची व्यावसायिक पार्श्वभूमी नसतानाही कुलदीप ह्यांनी संगीत जगात स्वत:ची ओळख निर्माण केली. ‘कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन’ ह्या विषयात पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी संगीत अभियांत्रिकीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. केरळ मधील `कोची’ ह्या आपल्या जन्मगावी सर्व शिक्षण पूर्ण केल्यावर करिअरसाठी त्यांनी चेन्नईत पाऊल टाकले. कधी समुहगानासाठी आवाज दिला, तर कधी छोट्या-मोठ्या जाहिरातींना संगीत दिले. दहा ते पंधरा वर्षांचा परीक्षा कालावधी पार केल्यावर त्यांचे पाय घट्ट रोवले गेल़े  एअरटेल, वोडाफोन, बीएसएनएल ह्या मोबाईल कंपन्यांच्या जाहिरातींपासून, स्वित्झर्लंडच्या ‘मॅडली इन लव्ह’ सारख्या चित्रपटाला संगीत देण्यापर्यंत त्यांना अनेक प्रकारची कामे मिळाली. त्यांनी अनेक शास्त्रीय नृत्यकार्यक्रमांसाठी गायन केले. अनेक गायकांना हार्मोनिअमवर साथ केली. ‘अद्वितीय’ नावाची स्वत: संगीतबद्ध केलेली, गायलेली आणि ७ प्रकारची वाद्ये वाजवलेली ध्वनिफीत प्रकाशित केली. ह्या सर्व अनुभवातून ते तावून सुलाखून निघाले.

चित्रपट संगीताला वाव असूनही भक्तीसंगीताकडे वळण्याचे कारण विचारले असता पै सांगतात, ‘मला लोकांना सवंग संगीत द्यायचे नाही, तर लोकांना अंतर्मुख करेल, असे संगीत द्यायचे आहे. संगीत क्षेत्रात राहून मी संगीत विषयाशी संबंधित सर्व प्रकारची कामे केली, मात्र मन:शांती मिळाली ती भक्तीसंगीतात! सुदैवाने चांगल्या चालींची मला उमज असल्याने आपल्या कौशल्यातून काहीतरी चांगले देता यावे, असा मी नेहमीच प्रयत्न केला. कवींकडून काव्य लिहून घेण्यापेक्षा जे काव्य ईश्वरीकृपेने ऋषीमुनींनी प्रसवले आहे अशा वेदमंत्रांना चाली बांधायचे ठरवले. माझ्या चालींना न्याय देतील असे चांगले बालकलाकार मिळाले. त्यांनी अतिशय तन्मयतेने गाणी गायल्यामुळे ती अतिशय प्रभावी ठरली आणि पाहता पाहता लोकप्रियतेचा आकडा कोटींच्या घरात गेला.’

आपले काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पै ह्यांनी सोशल मिडियाचा पुरेपूर वापर केला. ‘यू ट्यूब’वर त्यांच्या व्हिडिओला मिळणारे ‘लाईक्स’ आणि ‘शेअर’ पाहून खुद्द ‘यू ट्यूब’ संकेतस्थळाने त्यांच्या कामाची दखल घेतली. पै ह्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रुपेरी मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देत पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

kuldeep-and-surya

‘श्रीरामचन्द्र कृपालू भज मन’ हे लतादीदींच्या आवाजातले सुप्रसिद्ध गीत मध्यंतरी एका कोवळ्या वयातल्या मुलीच्या आवाजात व्हायरल झाले. ती होती, कुलदीप पै ह्यांची ९ वर्षांची पहिली शांतिदूत-सूर्यागायत्री! कोणाला ती दिवंगत गायिका सुब्बलक्ष्मी ह्यांची नात वाटली, तर कोणाला कुलदीप पै ह्यांची मुलगी. उत्तर केरळातील पुरामेरी गावातले हे रत्न कुलदीप पै ह्यांनी शोधून काढले. बालवयातील तिची संगीतातील समज, निरागस-सुरेल आवाज आणि संगीत शिकण्याची तयारी पाहता पै ह्यांनी ‘वंदे गुरु परंपराम्’ चे `जय गणेश’ हे पहिले गाणे तिच्याकडून गाऊन घेतले आणि आपणही गायले. व्हिडिओ रेकॉर्डिंगची पहिलीच वेळ असल्याने त्यांनी घरच्या घरीच त्या गाण्याचे शूटिंग आणि रेकॉर्डिंग केले आणि सोशल मिडियावर टाकले. रातोरात त्या गाण्याला अमाप प्रसिद्धी मिळाली.

पहिल्या व्हिडिओच्या यशानंतर `रामअष्टकम्’, `शिवाष्टकम्’, `हनुमान चालिसा’, `महीषासुरमर्दिनी स्तोत्र’ तसेच `भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’, `ब्राह्मण ओकाटे’, `हरिवर्षणम्’, `भज गोविंदम्’, `ॐनम: शिवाय’, `वंदे मातरम्’ यांसारखी अनेक गाणी रेकॉर्ड करण्यात आली. सूर्यागायत्रीसारखे आणखी काही बालकलाकार ह्या उपक्रमास जोडले गेले आणि त्यांच्या आवाजाने देशोदेशीचे रसिक श्रोतेही अप्रत्यक्ष जोडले गेले. ह्या समूहाचे दोन वर्षांत ३० व्हिडिओ तयार झाले असून येत्या सहा वर्षांत १०० चा आकडा पार करण्याचा पै ह्यांचा मानस आहे.

वेद-मंत्रांचे पठण करणे आणि बालकलाकारांकडून ते करवून घेणे हे येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी संस्कृत भाषेची उत्तम जाण असायला हवी. हे शिवधनुष्य पै ह्यांनी कसे पेलले, असे विचारले असता ते म्हणतात, `माझ्या शालेय शिक्षकांनी मला संस्कृत भाषेची गोडी लावली. उच्चारांवर त्यांचा भर असे. संस्कृत शब्द उच्चारत असताना तो अर्थ समजून उच्चारला गेला पाहिजे, याबाबत ते नेहमी आग्रही असत. तीच सवय मलाही लागली. मंत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य आणि गुह्य अर्थ आहे. त्याची उकल केली तर परमानंद मिळतो. आमचे छोटे कलाकार माझे शिष्य नाहीत, ते त्यांच्या गुरुंकडे स्वतंत्रपणे शिकतात. पण रेकॉर्डिंगच्या निमित्ताने मला मिळालेले भाषेचे बाळकडू मी त्यांनाही पाजतो. शब्द, अर्थ, सूर आणि ताल सांभाळून गाणे गायले तरच ते समोरच्यापर्यंत नीट पोहोचू शकते. आज हे सर्व कलाकार जीव ओतून गातात. त्याचाच परिणाम म्हणजे, त्यांना पाहून इतर लहान मुलेही त्यांचे अनुकरण करत असल्याची पोचपावती पालकांनी आम्हाला दिली. हेच माझे साध्य होते. भावी पिढीने आपल्या संस्कृतीचा मान राखला पाहिजे, आपली संस्कृती जतन केली पाहिजे, वृद्धिंगत केली पाहिजे. मला जर कोणी अधिकार दिले, तर मी सर्वप्रथम शालेय अभ्यासक्रमात बदल करून शिशुवर्गापासून पदवीपर्यंत संस्कृत विषय सक्तीचा करेन. मुलांना भाषेची ओळख झाली, तरच ती आपल्या वेद-शास्त्रांचा अभ्यास करतील. ह्या गाण्यांच्या निमित्ताने मला खारीचा वाटा उचलता आला, याचा मला आनंद आहे.’kuldeep-shishya

कुलदीप ह्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या सांगितिक प्रवासात पत्नी रूपा हिची सुरेल साथ लाभली आहे. तीदेखील संगीतकार आहे. त्यांची साडेतीन वर्षांची कन्या शिवाराध्या भविष्यात कुलदीप ह्यांच्यासोबत गाताना दिसणार का? ह्यावर ते उत्तर देतात, `ती अंत:प्रेरणेने संगीताकडे वळली, तर तिला संगीताचे प्राथमिक ज्ञान आम्हा दोघांकडून नक्कीच मिळू शकेल. पण तिला दुसऱ्या कोणत्या विषयात रस असेल, तर आम्ही आडकाठी करणार नाही. शिवाराध्याप्रमाणे सूर्यागायत्री आणि अन्य बालकलाकार आम्ही आमचीच अपत्ये समजतो. ह्या ओल्या मातीला योग्य वळण देण्याचा आम्ही फक्त प्रयत्न करत आहोत.’

गुरुवो बहव: सन्ति शिष्य वित्त: पहारक:

गुरुवो विरला: सन्ति शिष्य हृत्त: पहारक:।।

‘शिष्याचे वित्त हरण करणारे अनेक गुरु सापडतील, परंतु शिष्याचे चित्त हरण करणारे गुरु सापडणे दुर्मिळच’, असा ह्या सुभाषिताचा अर्थ आहे. कुलदीप पै ह्यांच्या रूपाने त्यांच्या सहवासात असलेल्या बालकलाकारांना आणि समस्त श्रोतृवर्गाला एक असा गुरु मिळाला आहे, जो संगीताच्या माध्यमातून परमानंदाची अनुभूती देत आहे. भक्तीसंगीतातून मिळणारा आनंद त्यांना एका भाषेपुरता मर्यादित न ठेवता विविध भाषांमधून वाटायचा आहे. त्याचीच सुरुवात म्हणून, येत्या गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर मुंबईतील अक्षता आणि अपर्णा नावाच्या दोन मुलींकडून गाऊन घेतलेले ‘आवरी आवरी आपुली बासुरी’ हे गाणे ते प्रकाशित करणार आहेत. परदेशातील बालकलाकारांना घेऊन पाश्चात्त्य संगीतावर आधारित गाणे, भारतीय शब्द गुंफुन ‘इंडोवेस्टर्न भक्तीसंगीत’ करण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

एकंदरीतच, हा ‘कर्नाटकातील कानडा विठ्ठल’ समस्त रसिकांना अभिजात संगीताचे, अध्यात्माचे आणि वेदपठणाचे वेड लावणार आहे, असे दिसते.

आपली प्रतिक्रिया द्या