साद घालती हिमशिखरे!

113

>> ज्योत्स्ना गाडगीळ

`ह्या वयात आमच्याने गड-किल्ले चढवणार नाहीत’ असे म्हणणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, `घरकामातून फुरसत कुठे मिळते’ असे म्हणणाऱ्या महिलांसाठी आणि `दृष्टी नसूनही सृष्टी अनुभवण्याची आस लागलेल्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी’, गेली १८ वर्षे `ट्रेकिंग’ चे आयोजन करणाऱ्या महिला ट्रेकर आहेत, मुंबईच्या वैशाली देसाई-मोघे. ज्यांच्यासाठी ट्रेकिंग हा विरंगुळा नाही, तर `व्यक्तिमत्त्व विकासाचे’ प्रात्यक्षिक देणारे शिबिर आहे.

पूर्वी लोक फिरायला गेले, की फोटो काढायचे, आता फोटो काढण्यासाठी फिरायला जातात. तोच प्रकार ट्रेकिंगचा! ट्रेकिंग हे साहसाचे प्रतीक मानले जायचे, आता मिरवण्याचे साधन झाले आहे. ट्रेकिंगमुळे केवळ मनोरंजन किंवा हवापालट होत नाही, तर आत्मविश्वास, निर्णयक्षमता, आरोग्य, लोकसंग्रह, अनुभव ह्यात मौलिक भर पडते. `प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची शिस्त लावायची असेल, तर आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी ट्रेकिंगचा अनुभव घेतलाच पाहिजे’, सांगत आहेत वैशाली देसाई-मोघे.

vaishali-desai-moghe

मूळच्या रत्नागिरीच्या असलेल्या वैशाली `वास्तुशास्त्र’ विषयात पदविका घेऊन नोकरीसाठी मुंबईत आल्या. घराला आर्थिक हातभार लावणाऱ्या वैशाली ह्यांनी स्वत:च्या चैनीसाठी कधी पैसे खर्च केले नव्हते, तर सहल वगैरे दूरच. एक दिवस कामाच्या रामरगाड्यातून थोडा विरंगुळा म्हणून त्यांच्या मैत्रिणीने त्यांना लोणावळ्यात एका समूहाबरोबर ट्रेकिंगला येण्याची गळ घातली. त्यावेळेस `ट्रेकिंग’ हा शब्द त्यांनी पहिल्यांदा ऐकला होता. १६० रुपयांत दोन दिवस काही तरी वेगळे अनुभवायला मिळणार ह्या विचाराने त्यांनी तत्काळ होकार दिला. तो क्षण त्यांच्या आयुष्याचा `टर्निंग पॉर्इंट’ ठरला.

`युथ हॉस्टेल’ ही ट्रेकिंगसाठी जगभरात प्रसिद्ध असलेली संस्था आहे. आपल्या देशातही तिच्या अनेक शाखा आहेत. कमी खर्च, शिस्तबद्धता आणि ट्रेकिंगचा पुरेपूर अनुभव ही त्यांच्या संस्थेची ओळख आहे. सुदैवाने ह्या संस्थेच्या मालाड शाखेच्या ट्रेकर्सबरोबर ट्रेकिंगला जाण्याची वैशाली ह्यांना पहिली संधी मिळाली. परिस्थितीशी जुळवून घेत मिळेल तसे, मिळेल तिथे राहून, खाऊन, शारीरिक क्षमता आजमावून केलेला पहिला ट्रेक त्यांच्यासाठी स्फुर्तिदायक ठरला. त्यानंतर त्या `युथ हॉस्टेल’ किंवा अन्य ट्रेकर्स समुहाबरोबर वरचेवर ट्रेकिंगला जाऊ लागल्या.

१८ वर्षांपूर्वीचे ट्रेकिंग आतासारखे अनुकूल नव्हते. `परिस्थितीशी जुळवून घेणे’ हा ट्रेकिंगचा मूळ हेतू साध्य करण्यासाठी, ट्रेकर्सची प्लॅटफॉर्मवर झोपण्याची, कोणाच्याही घरचे जेवण्याची, बिस्कीटे खाऊन भूक भागवण्याची नाहीतर, प्रसंगी उपाशी राहण्याचीदेखील तयारी असे. अशा अनिश्चित वातावरणामुळे ट्रेकिंगला जाणाऱ्या मुलींची संख्या कमी असे.

वडील क्रिडाक्षेत्रात असल्यामुळे वैशाली ह्यांच्या रक्तातच खिलाडू वृत्ती होती. म्हणून मुलींची सोबत असो वा नसो त्या बेधडकपणे ट्रेकिंगला जायच्या. मात्र, इतर महिला निसर्गाला जवळून पाहण्याची संधी गमावत आहेत, ह्या गोष्टीची त्यांना खंत वाटत असे. ट्रेकिंगचे आयोजक, प्रशिक्षक, सोबती पुरुष असल्याने महिलांचा टक्का कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. महिलांना ट्रेकिंगची संधी आपण मिळवून द्यायची असे ठरवून त्यांनी `कल्पविहार’ नावाचा स्वत:चा ट्रेकिंग समूह तयार केला. तेव्हा त्या मुंबईजवळील नालासोपारा येथे राहत होत्या.

प्रायोगिक तत्त्वावर नालासोपाराजवळील `तुंगारेश्वर’ येथे सर्व खर्चासहित ७० रुपयांत पहिला ट्रेक त्यांनी आयोजित केला. सगळ्यांना नेण्याआधी आपण एकदा त्या वाटेची पाहणी करावी असे ठरवून आठवडाभर आधी तुंगारेश्वर धबधब्याच्या वाटेने त्या जाऊन आल्या. चहा-नाश्ता-जेवण ह्यांचा खर्च १०० चा आकडा ओलांडणार असे दिसू लागले. मात्र, ऐनवेळेवर वाढीव खर्च सांगणे योग्य नाही, म्हणून घरच्या घरी कांदे पोहे करून त्यांनी नाश्त्याचा प्रश्न सोडवला आणि नियोजित शुल्कामध्ये जेवण आणि बससेवा पुरवली. स्वाभाविकच त्यांना पदरचे पैसे मोजावे लागले. परंतु, त्या अनुभवातून त्यांना ट्रेकिंग व्यवस्थापनाची कायमस्वरूपी शिकवण मिळाली.

लोकांना ट्रेकिंगला नेत असताना वैशाली स्वत:देखील वरचेवर इतर समुहांबरोबर ट्रेकिंगला जात असत. ट्रेकिंगमध्ये रस वाढत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी उत्तर काशी नेहरू माऊंटेअरींग संस्था येथून माऊंटेनिअरिंगचे रितसर प्रशिक्षण घेण्याचे ठरवले. प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रगत प्रशिक्षणाचा पुढचा टप्पाही त्यांनी यशस्वीपणे पार पाडला. तिथे प्रशिक्षण घेत असताना त्यांच्या शारीरिक क्षमतेचा, मनोधैर्याचा खऱ्या अर्थाने कस लागला. तिथे महिनाभर राहून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. तो अनुभव त्यांना पुढच्या प्रवासात वेळोवेळी कामी आला, असे त्या सांगतात.

धडाडीचा स्वभाव असणाऱ्य़ा वैशाली ह्यांना २०११ मध्ये लिंका बुकमध्ये नाव नोंदवण्याची संधी मिळाली. निमित्त होते `कुलू ते लेह’ ह्या महिला विशेष सायकल रॅलीचे. लेहचा परिसर त्यांना खुणावत होता. सायकल चालवता येत नसतानाही त्यांनी फॉर्म भरला. घरच्यांनी कानउघडणी केली. परंतु, आपल्या निश्चयापासून न ढळता त्यांनी शारीरिक स्वास्थ्यावर भर दिला, योग, प्राणायाम, व्यायाम करून लेहच्या बर्फाच्छादित परिसरात आपण तग धरू शकू इतके स्वत:ला सक्षम केले. रॅलीच्या आठवडाभर आधी त्या पनवेलच्या धनंजय मदन ह्या सायकलस्वाराकडे सायकल शिकण्यासाठी गेल्या. दिवसभर त्यांनी सायकलीची तोंडओळख करून घेतली आणि तेवढ्या सरावावर थेट कुलू गाठले. देशभरातून आलेल्या १०० मुलींपैकी एक असलेल्या वैशाली सायकलीवर स्वार झाल्या आणि पडत-झडत, स्वत:ला सावरत त्यांनी इतर मुलींबरोबर लेहपर्यंतचा टप्पा पार केला. ह्या सामुहिक कार्याची लिंका बुकने नोंद घेतली आणि त्या घटनेचा एक भाग म्हणून वैशाली ह्यांनादेखील प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविले. त्या अनुभवाचे वर्णन करताना त्या गमतीने म्हणतात, `लोक गल्लीबोळात सायकल चालवायला शिकतात, मी लडाखला जाऊन सायकल चालवायला शिकले!’

सतत काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देईना. काही काळ त्यांनी जपानी भाषेचे प्रशिक्षण घेतले आणि त्या अनुभवावर जपानी भाषेची पहिल्या दोन लेव्हलची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची शिकवणीही घेतली. एकदा तर, रुईया महाविद्यालयात एका अंध विद्यार्थ्याची लेखनिक म्हणून गेलेल्या वैशाली ह्यांना त्या विद्यार्थ्यांमधील निसर्गप्रेमी पर्यटक दिसला. त्याच्यासारख्याच निसर्गावर प्रेम करणाऱ्या अंध मुलांना ट्रेकला नेले पाहिजे असे त्यांनी ठरवले. हिमालयाचे शिखर गाठणाऱ्या पहिल्या अंध महिला ट्रेकर-`परिमला भट’ ह्यांची त्यांनी भेट घेतली. त्यांचे अनुभव ऐकून, संपूर्ण अभ्यास करून अंध विद्यार्थ्यांसाठी ट्रेकचे आयोजन केले. तो प्रयोग एवढा यशस्वी झाला, की त्यानंतर `कल्पविहार’चे अनेक ट्रेक त्यांनी अंध विद्याथ्र्यांसाठी नेले. मुलांची जिज्ञासू वृत्ती, पर्यावरण प्रेम आणि भटकंतीची आवड पाहता वैशाली सांगतात, `आजवर डोळस लोकांबरोबर गड-किल्ले जितक्या बारकाईने पाहिले नाहीत, तेवढे अंध मुलांबरोबर पाहिले. त्यांच्याकडून प्रचंड सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यांच्यावर ट्रेकिंगचा आर्थिक भार पडू नये, म्हणून त्या मुलांकडून कसलाही खर्च घेतला जात नाही. ह्या मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर एक स्वयंसेवक उपस्थित असतो. आणि तिथल्या वातावरणाची अनुभूती देण्यासाठी इतिहास तज्ज्ञ अप्पासाहेब परब किंवा त्यांची मुलगी शिल्पा परब आम्हाला मार्गदर्शन करतात.’

treck-1

कोणत्याही ट्रेकिंगला जाताना आवश्यकता असेल तिथे वैशाली स्थानिक गाईड सोबत घेतात. त्यामुळे तिथल्या परिसराची सखोल माहिती मिळते, गाईडला रोजगार मिळतो आणि प्रवास सुरळीत होतो. वैशाली ह्यांनी आपल्या ट्रेकिंग समूहाचे काही नियम आखून घेतले आहेत. त्यांचे काटेकोरपणे पालन व्हावे याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्यांच्या प्रवासात धुम्रपान, मद्यपानाला मुभा नाही. अंगप्रदर्शन होईल असे कपडे न वापरता, ट्रेकिंगसाठी योग्य असे सुटसुटीत कपडे वापरावे, अशी त्यांची अट असते. त्यांच्या प्रवासात मजा-मस्करीला वाव असतो, परंतु थिल्लरपणाला नाही. त्यामुळे संपूर्ण प्रवास शिस्तबद्धपणे पार पडतो आणि ह्यासर्व कारणांमुळे महिला वर्गाचा ट्रेकिंगला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो.

`ट्रॅव्हेलिंग इंडस्ट्री’ हे झटपट अर्थाजर्नाचे साधन असूनसुद्धा वैशाली ह्यांनी आपल्या छंदाचे पर्यवसान व्यवसायात होऊ दिले नाही. ट्रेकिंगच्या नावावर अतिरिक्त पैसे घ्यायचे नाहीत, ही `युथ हॉस्टेल’ने लावून दिलेली शिस्त त्या आजही पाळत आहेत. लवकरच त्या आपल्या कल्पविहार संस्थेचे `कल्पविहार ट्रॅव्हेंजर’ असे बारसे करून पर्यटनासाठी उत्सुक असणाऱ्या लोकांसाठी विविध सहलींचे आयोजन करणार आहे.

ट्रेकिंगसाठी दरवेळी नव्या ठिकाणचे आव्हान पेलणाऱ्या वैशाली सांगतात, `कल्पविहारमुळे आजवर अनेक लोकांना मी निसर्गाच्या जवळ नेऊ शकले. ट्रेकिंगमुळे कोणाचे दमा, अर्धशिशीसारख्या व्याधी घालवू शकले, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, अशा अंध मुलांना स्पर्शातून निसर्ग दाखवू शकले, घर-संसार-नोकरीत अडकलेल्या बायकांना काही क्षणांचा विरंगुळा देऊ शकले. हीच माझी कमाई आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान मला उत्तरोत्तर नवे काही करण्याची प्रेरणा देते. त्यांच्यानिमित्ताने माझा प्रवास अविरत सुरू आहे आणि तो पुढेही असाच सुरू राहणार आहे. सगळ्या ट्रेकिंगप्रेमींना एवढेच सांगेन, की एकट्या-दुकट्याने प्रवास करण्यापेक्षा समुहाने प्रवास करा आणि ट्रेकिंगकडे केवळ मनोरंजन म्हणून नाही, तर व्यक्तिमत्त्व विकासाची संधी म्हणून बघा!’

चौकट : वैशाली ह्यांनी देशभरातील अनेक डोंगरमाथे पादाक्रांत केले असले, तरीही वनराईसोबतच इतिहासाचीही झूल ल्यालेल्या सह्याद्रीच्या कडेकपऱ्यांमध्ये त्यांचा जीव विशेष रमतो. अलंग-मदनसारखा शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारा ट्रेक त्यांनी केला आणि जे करू धजावत नव्हते अशांकडूनही करून घेतला. पनवेलजवळच्या `कलावंतीण’च्या सुळक्यावर भररात्री नवख्या मुलामुलींना केलेला `मून लाईट’ ट्रेक. सामान्य लोकही जिथे रोप-वे ने जाणे पसंत करतात, त्या रायगडावर किंवा राज्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाईवर अंधमुलींना घेऊन केलेली चढाई, सह्याद्रीतील असे शेकडो धाडसी ट्रेक त्यांच्या नावावर आहेत. तसेच, नौकानयन, जंगल सफारी, रॅपलिंग, रॉक क्लाइंबिंग अशा धाडसी खेळांचीही शिबिरे कल्पविहारच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतात.

आपली प्रतिक्रिया द्या