मी ‘कात’ टाकली!

125

>> ज्योत्स्ना गाडगीळ

‘साप’ हा शब्द उच्चारला तरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो फणाधारी नाग, नाहीतर हॉलीवूड चित्रपटातला अॅनाकोंडा! सगळेच साप विषारी नसतात. मात्र हे समजून घ्यायला भीतीची ‘कात’ टाकायला हवी. निसर्गात सौंदर्य ठासून भरले आहे, ते केवळ डिस्कव्हरी, नॅशनल प्लॅनेट चॅनेलवर न्याहाळत न बसता जंगलात जाऊन प्रत्यक्ष अनुभवायला हवे. मात्र एकट्याने नाही, तर अनुभवी व्यक्ती किंवा वनतज्ज्ञांना सोबत घेऊन!’, सांगत आहेत वन्य छायाचित्रकार युवराज गुर्जर!

‘मुसळधार पावसात, गर्द झाडीत, दबक्या पावलांनी चालत, टॉर्चच्या प्रकाशात एखाद्या झाडावर लटकलेला, एखाद्या खडकाला चिकटून बसलेला, एखाद्या फांदीला वेटोळे घालून बसलेला, सळसळत्या कांतीचा साप दिसला की जंगलसफर सार्थकी लागल्याचा आम्हाला आनंद मिळतो. सगळ्यांच्या हाती सज्ज असलेले कॅमेरे त्याचे फोटो काढण्यासाठी सरसावतात. मनसोक्त क्लिकक्लिकाट झाला, की सापाला `डिस्टर्ब’ न करता आम्ही पुन्हा दबक्या पावलांनी तिथून काढता पाय घेतो. ह्या सगळ्यात क्वचित एखाद्यालाच ‘बेस्ट शॉट’ मिळतो. बाकीच्यांना केवळ फोटो काढता आले, ह्यावर समाधान मानावे लागते. तो ‘बेस्ट शॉट’ मिळवण्यासाठी लागते तपश्चर्या. वन्यजिवांचा अभ्यास आणि प्रचंड सराव.’ हे स्वानुभवाचे बोल आहेत, ठाणे येथील वन्यजीव छायाचित्रकार युवराज गुर्जर ह्यांचे. छायाचित्र जगतात ते `मायक्रोगुरू’ म्हणूनही परिचित आहेत.

वन्यजिवांचे अतिसूक्ष्म बारकावे कॅमेऱ्यातून टिपण्यात तरबेज, म्हणून गुर्जर ह्यांच्या चाहत्यांनी त्यांना `मायक्रोगुरू’ ही उपाधी दिली आहे. विज्ञान विषयाची पार्श्वभूमी नसताना केवळ आवड म्हणून गेली ३० वर्षे गुर्जर ह्यांनी वन्य छायाचित्रणाचा छंद जोपासला आहे.

वाणिज्य शाखेतून पदवीधर झाल्यावर सॉफ्टवेअरचा डिप्लोमा करून ते `रेमंड’ कंपनीत रूजू झाले. ठाण्यात त्यांच्या वसाहतीत राहणाऱ्या एका पक्षीतज्ज्ञामुळे गुर्जर ह्यांना पक्षीनिरीक्षणाची आवड लागली. पक्ष्यांची माहिती मिळवण्यासाठी वाचन आणि त्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी गुर्जर ह्यांची भ्रमंती सुरू झाली. दर शनिवार-रविवार कोणत्या न कोणत्या जंगलात मुशाफिरी करण्याचा त्यांना छंद लागला. जे बघतोय ते डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवावे असे वाटू लागले. कॅमेऱ्यातली छबी लोकांना दाखवून संबंधित प्राणी-पक्ष्यांची ते ओळख करून देऊ लागले. आपल्याकडे असलेले वनवैभव लोकांना कळावे म्हणून `लोकप्रभा’ साप्ताहिक आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रातून वन्यजिवांची सोप्या भाषेत माहिती देणारे सदर लिहू लागले. कॅमेऱ्यावर पकड आणि कॅमेऱ्यामागची दृष्टी कशी असावी ह्याचे प्रशिक्षण देऊ लागले. मुंबईत आढळणारी फुलपाखरे ह्या विषयांवर त्यांनी शेकडो फुपाखरांची सचित्र माहिती देणारे ‘आय लव्ह बटरफ्लाईज’ हे अॅपदेखील मोफत उपलब्ध करून दिले आहे. तसेच ह्याच विषयावर त्यांचे मराठीतही पुस्तक प्रकाशित झाले आहे. सोशल मीडियावर तसेच ब्लॉगवर त्यांचे ह्या संदर्भात सातत्याने लिखाण सुरू असते.

परदेशातले लोक आपल्याकडचे वनवैभव बघण्यासाठी येतात, पण आपण मात्र त्यापासून अनभिज्ञ आहोत, ह्या विचाराने अस्वस्थ झालेले गुर्जर ह्यांनी लोकांना निसर्गभ्रमंतीतून निसर्गाशी जोडण्याची मोहीम सुरू केली. त्यांनी ह्या विषयाशी निगडित अनेक पुस्तके वाचली. परंतु अजूनही त्यात बरेच लिखाण होणे गरजेचे आहे, असे ते सांगतात. वन्यजिवांवर अनेक संशोधक अभ्यास करत आहेत, परंतु ते वैज्ञानिक भाषेत जी माहिती लिहून ठेवतात, ती सर्वसामान्य वाचकाच्या उपयोगाची नसते. ह्या विषयाबद्दल उत्सुकता वाटावी असे सहज सोपे लिखाण होणे आवश्यक आहे. जीवशास्त्रातील भारतीय घराण्यांची माहिती इतर देशांतील जीवशास्त्रातील घराण्यांच्या माहितीच्या तुलनेत अतिशय त्रोटक आहे, असेही ते सांगतात. एकवेळ इंग्रजीत पुस्तके मिळतीलही, परंतु मराठीत ह्या विषयाचा अतिशय तुटवडा आहे. ही परिस्थिती लक्षात घेता गुर्जर ह्यांनी लिखाणाला सुरुवात केली. त्यांच्या लिखाणाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यांनी दिलेली माहिती अभ्यासक संदर्भ म्हणून वापरू लागले.

गुर्जर ह्यांची छायाचित्रे अतिशय जिवंत वाटतात. ह्याचे कारण म्हणजे त्यांनी जपलेले वेगळेपण! दर वेळी काहीतरी नवीन देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हे वेगळेपण जपण्यामागे त्यांची वर्षानुवर्षांची मेहनत आहे. ते सांगतात, `दरवेळी आपल्याला किंग कोब्रा दिसेलच असे नाही. एखाद्या वेगळ्या प्रजातीचा साप दृष्टीस पडेल, त्याचा पूर्वाभ्यास तुम्ही केलेला असेल, तर तुम्हाला त्याची ओळख लगेच पटू शकेल, तो कसा प्रतिसाद देईल ह्याची कल्पना येईल, त्याच्या कितपत जवळ जाणे योग्य आहे ह्याचा अंदाज येईल. मात्र ही माहिती नसताना तुम्ही जवळ जाऊन त्याचा फोटो काढण्याचा अट्टहास केलात, तर त्याचे परिणामही तुम्हाला भोगावे लागतील. म्हणून जंगलात जाताना केवळ महागड्या लेन्सेसचा कॅमेरा हातात असून उपयोग नाही, तर तो सहजतेने वापरण्याचा नियमित सराव, वन्यजीवांचा अभ्यास, प्रकाशयोजनेचा विचार ह्या बाबीदेखील अतिशय महत्त्वाच्या असतात.’

वन्यजीव स्वसंरक्षणार्थ समोरच्यावर आक्रमण करतात. अतिसाहस दाखवण्याच्या हेतूने त्यांच्याशी जवळीक केली तर जिवावर बेतू शकते. गेल्या वर्षभरात अशा अतिआत्मविश्वासामुळे १८ सर्पमित्रांनी आपले प्राण गमावले आहेत.

छायाचित्रकारांवरही असे प्रसंग ओढवू शकतात. म्हणून त्यांनी जाणकारांना सोबत नेले पाहिजे, असे गुर्जर आवर्जून सांगतात.
गुर्जर ह्यांच्या छायाचित्रांची देश-विदेशातील छायाचित्रकारांनी दखल घेतली आहे. नुकत्याच गोव्यात झालेल्या `मलबार पिट वायपर’ ह्या सर्प छायाचित्र प्रदर्शनात देशभरातून ३२ नामवंत छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता, त्यात गुर्जर ह्यांनी टिपलेलेही एक छायाचित्र होते. तिथेही त्यांच्या छायाचित्राचे खूप कौतुक झाले.

सापांशिवाय इतर वन्यजिवांचाही गुर्जर ह्यांनी सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या नजरेतून जंगलसफारी करणे हा रोमांचकारी अनुभव असतो. ही अनोखी दृष्टी अन्य निसर्गप्रेमींना आणि नवख्या छायाचित्रकारांना मिळावी ह्यासाठी गुर्जर, इच्छुक मंडळींना घेऊन जंगलसफारीला निघतात. महाराष्ट्रातच नाही, तर देशभरातील कान्हा, बांधवगड, रणथंबोर, भारतपूर इ. ठिकाणच्या जंगलांमध्येही त्यांनी भ्रमंती केली आहे. वन्यजीव त्यांना जेवढे खुणावतात, तेवढेच निसर्गातील सूक्ष्म बारकावे त्यांना आकर्षून घेतात. मग तो फांदीवरून ओघळणारा दवबिंदू असो, नाहीतर खळाळत वाहत जाणारा झरा…!
एवढे सगळे असूनही गुर्जर स्वत:च्या कलेत रमत नाहीत, तर इतर कलाकारांनाही मनमुराद दाद देतात. त्यांच्याशी बोलत असताना अनेक निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, छायाचित्रकार, सर्पमित्र ह्यांचे उल्लेख ओघाने येतात. `बाम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’ आणि `वल्र्ड वाईड फंड फॉर नेचर (डब्लूडब्लूएफ) ह्या निसर्गसंवर्धन संस्थांशी जोडलेले असल्यामुळे गुर्जर ह्यांनी जोपासलेल्या छंदाला पोषक वातावरण आणि नवनवीन माहितीचा स्रोत मिळत आहे.

गुर्जर ह्यांच्या सांगण्यानुसार, मॉलमध्ये हजारो रुपये खर्च करून कृत्रिम आनंद मिळवण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात राहून नैसर्गिक आनंद घेऊया. तसे केल्याने नवे काही बघायला मिळाल्याचा, शिकायला मिळाल्याचा आनंद नक्कीच मिळू शकेल. चला तर मग, आपणही `साप साप म्हणत भुई थोपटत न बसता’ निसर्गाशी अनुसंधान साधूया आणि वन्यजिवांबद्दल असलेल्या गैरसमजाची कात टाकून त्यांची ओळख करून घेऊया!

आपली प्रतिक्रिया द्या