दोन मिनिटं द्या, तुमच्या डोक्यातही ‘प्रकाश’ पडेल

pravin-wakchoure>> प्रविण वाकचौरे

‘वन आयडिया कॅन चेंज द वर्ल्ड’ असं म्हटलं जातं, मात्र अशा बदल घडवणाऱ्या आयडिया सुचणं गरजेचं असतं. कल्पना ही काही सहजासहजी नक्कीच सुचत नाही आणि मग आठवण होते ती जाहिरात क्षेत्रातील मंडळींची. मात्र आजकाल जाहिरातीतून अनेकदा फसवणूक जास्त होताना दिसते. क्रिएटीव्हीटी वापरून खोट्याचं खरं करण्यासाठी डाव मांडला जातो. मात्र मुंबईतल्या पाच तरुणांनी याला छेद देत, आपल्या एका आयडियातून एका मोठ्या समस्येवर ‘प्रकाश’ टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दोन मिनिटाच्या एका जाहिरातीनं त्यांचं आयुष्यच बदललं.

विशेष पेज- गुढीपाडवा-२०१८

मुंबईत राहणाऱ्या करण लाखे, यश आंब्रे, मिहीर पाडिया, भुवन बाली, गौरव बंब या तरुणांनी मुंबई विद्यापीठातून बीएमएम अर्थात ‘बॅचलर ऑफ मास मीडिया’मधून जाहिरात विषयामध्ये पदवी प्राप्त केली आहे. मात्र हे तरुण त्यांच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांपेक्षा थोडे वेगळे आहेत. कारण त्यांनी देशातील नाही, तर आंतरराष्ट्रीय स्थरावरील जाहिरात क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ‘ए अँड एडी (D&AD)’ हा पुरस्कार जिंकला आहे. त्यामागची त्यांची मेहनत आणि कामगिरी नक्कीच उल्लेखनीय आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील काही तरूण सातासमुद्रापार जाऊन आपल्या आयडिया आणि विचार कौशल्याने वेगळी छाप पाडत असतील तर त्याची दखल घेणे गरजेचं आहे. यासाठीच ‘दैनिक सामना’ची वेब आवृत्ती ‘saamana.com’ला या तरुणांशी संवाद साधणे गरजेचं वाटलं. नव्या क्षेत्रात यशाची गुढी उभारणाऱ्या या सर्व तरुणांशी बोलून त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या यशाबद्दल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून या विषयाचा अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रील इतर मुलांना याबद्दल माहिती मिळेल.

हा व्हिडिओ पाहा आणि मुलाखत वाचा

तुम्हाला जो पुरस्कार मिळाला आहे त्याचं जाहिरात क्षेत्रातील महत्वआणि त्याबद्दल थोडी विस्तृत माहिती सांगा?

पुरस्काराविषयी बोलायचं तर जाहिरात क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारांपैकी एक हा पुरस्कार आहे. ‘ए अँड एडी (D&AD)’ न्यू ब्लड असं या पुरस्काराचं नाव आहे. इंग्लंडमध्ये दिला जाणारा जागतिक पातळीवरचा हा पुरस्कार आहे. जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा पुरस्कार नोबेलपेक्षा कमी वाटत नाही. प्रामुख्यानं २४ वर्षाखालील तरुणांना या स्पर्धेत भाग घेता येतो आणि त्याच तरुणांना हा पुरस्कार दिला जातो. विविध कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार दिला जातो. आम्ही अंडर २४ प्रोफेशनल कॅटेगरीमधून या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी जगातील अनेक नामवंत ब्रॅन्ड्स मार्केटींग ब्रिफ देतात. त्या ब्रिफ जगात सर्वांसाठी खुल्या असतात. ‘पिअर्सन’ नावाची शैक्षणिक क्षेत्रातली नावाजलेली पब्लिशिंग कंपनी आहे. त्या कंपनीचं ब्रिफ आम्ही निवडलं होतं. सध्या जगातील शैक्षणिक पद्धती बदलत आहे, डिजिटायजेशन वाढतंय तर येत्या काळात शिक्षण पद्धतीत काय बदल होतील? असं त्यांचं एक ब्रिफ होतं. त्याबद्दल आम्हाला काही आयडिया शोधून त्या मांडायच्या होत्या.

तुम्हाला ही आयडिया कशी सुचली?

आम्ही ‘पिअर्सन’नं दिलेल्या ब्रिफवर काम करण्याचं ठरवलं, त्यावेळी आम्हाला बऱ्याच आयडिया सूचत होत्या. मात्र आम्हाला या सर्व आयडियांमधून अशी आयडिया निवडायची होती, ज्याची मांडणी केल्यानंतर आम्हाला मानसिक समाधानही मिळेल. आम्ही विचार करत असताना, प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतीचा विचार न करता हिंदुस्थानच्या शिक्षण पद्धतीचा आम्ही विचार करत होतो. कारण हिंदुस्थानात शिक्षण व्यवस्थेत अनेक समस्या आहेत आणि विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या विषयावर अभ्यास करत असताना देशातील अशी १९ हजार गावं आहेत जिथे अद्याप वीजचं पोहोचली नसल्याची माहिती आम्हाला सरकारी वेब साईटवर मिळाली. मग या गावातील मुलं रात्रीच्या वेळी अभ्यास कसे करत असतील असा प्रश्न आम्हाला पडला. याविषयी शोध घेत असताना आम्ही अनेकांना भेटून याबाबत चौकशी केली. त्यावेळी आम्हाला कळालं की, ही मुलं रात्रीच्या वेळी जिथे उपलब्ध असतील तिथे रस्त्यावरील दिव्यांच्या उजेडात, घरात बत्तीच्या उजेडात अभ्यास करतात. याव्यतिरिक्त चौकशीदरम्यान आम्हाला आश्चर्यचकीत करणारी आणि वेगळी अशी गोष्ट कळाली. काही मुलं जंगलात जाऊन काजवे पकडून आणतात आणि काजव्यांना काचेच्या बाटलीत किंवा बरणीत भरून ठेवतात. रात्रीच्या वेळी जेव्हा काजवे चमकू लागतात, तेव्हा पडणाऱ्या प्रकाशामध्ये ती मुलं अभ्यास करतात. जिथे वीजच नाही त्या मुलांना डिजिटल शिक्षणाचा काय उपयोग होणार असा प्रश्न आम्हाला पडला. या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आम्ही ठरवलं आणि त्यानुसार काम करायचं असं निश्चित केलं. या गावामध्ये वीज पोहोचवणे मोठी खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे, हे आम्ही जाणून होतो. याशिवाय हे केवळ सरकारचं करू शकतं, त्यामुळे यासाठी पुढील किती वर्ष जातील याचा निश्चित कालावधी कोणी सांगू शकत नाही. मग तोपर्यंत या मुलांचं भवितव्य अंधारात ठेवून चालणार नाही असं आम्हाला वाटलं. मग या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही करता येईल याबाबत आम्ही विचार करू लागले. मग आम्हाला सुचलं की, जर मुलं काजव्यांच्या प्रकाशात अभ्यास करू शकतात, मग पुस्तकचं चमकू लागली तर काय? या दृष्टीने आम्ही पुढील संशोधन सुरू केलं. या संशोधनादरम्यान आम्हाला ‘ग्लो इन डार्क’ या संकल्पनेविषयी माहिती मिळाली. चमकणारी शाई यामध्ये वापरली जाते. ही शाई अंधाराच चमकते. चमकणारी शाई अनेकदा विमानावर, फॅन्सी कपडे इत्यादींवर वापरली जाते. जर ही शाई धातू, कपडे इत्यादींवर चमकू शकते तर मग कागदावर का नाही चमकरणार? असा प्रश्न आम्हाला पडला. मग या चमकणाऱ्या शाईबद्दल आम्ही वैज्ञानिक माहिती शोधू लागलो. आमच्या ओळखीच्या काही प्रिटिंग प्रेस, एक्सपर्ट्सना याबाबत विचारणा केली. तेव्हा आम्हाला कळालं की पुस्तकांवर चमकणारी शाई वापरणे शक्य आहे. त्यामुळे आमची आयडिया यशस्वी ठरली.

तुम्ही जी संकल्पना मांडली त्याची अमंलबजावणी होऊ शकते का?

आम्ही पिअर्सन या कंपनीच्या ब्रिफवर काम करत होतो. आम्ही मांडलेली संकल्पना त्यांना देखील फार आवडली. हिंदुस्थानच नव्हे तर जगातील अनेक देशांमधील काही भागात वीजेची समस्या आहे. तेथील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही संकल्पना फायदेशीर ठरू शकते. पिअर्सन कंपनीचं असं म्हणणं आहे की, तुमची ही संकल्पना आहे तिला तुम्ही कायदेशीररित्या तुमच्या नावे करून घ्या. संकल्पना तुमच्या नावे झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे सोपं होऊ शकेल. त्यानंतर आम्ही संकल्पना आमच्या नावे कशी होईल यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला, त्यावेळी आम्हाला कळालं की, ही प्रक्रिया मोठी आणि किचकट आहे. या सगळ्या बाबी जुळवून आणून आमची संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणणं थोडं कठीण आहे, पण आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय.

समजा भविष्यात या शाईने पुस्तकं बनवण्यात आली, तर या केमिकल शाईच्या संपर्कामुळे विद्यार्थ्यांवर काही घातक परिणाम होऊ शकतो का?

या शाईचा कोणताही दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर होणार नाही. कारण ही शाई तयार करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल्स घातक नसतात. या संशोधन करताना अनेत तज्ज्ञांचा याबाबत सल्ला घेतला होता. पुस्तकं आली म्हणजे मुलांचा त्यांना स्पर्श होणार, मग स्पर्शातून मुलांना अॅलर्जी, त्वचा, डोळे, तोंड याबाबत काही समस्या निर्माण होऊ शकतात का? याची आम्हाला माहिती मिळवायची होती. मात्र या शाईसाठी वापरली जाणारी केमिकल्स मुलांसाठी धोकादायक नसल्याची माहिती आम्हाला मिळाली.

तुमचा ग्रुप कसा तयार झाला?

आम्ही सगळे मुंबईतल्या विविध महाविद्यालयांमधून जाहिरात क्षेत्रात पदवी मिळवली. पदवीनंतर एका जाहिरात कंपनीत आम्ही सगळे इंटर्नशीप करत होतो. इंटर्नशीप करत असताना कंपनीतील वरिष्ठ मंडळींकडून आम्हाला या पुरस्कार आणि स्पर्धेविषयी माहिती मिळाली. आम्ही सगळे या स्पर्धेसाठी पात्र होतो. त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले आणि आमचा एक ग्रुप तयार झाला.

जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या किती विद्यार्थ्यांना या पुरस्काराबद्दल माहिती असेल?

आम्ही पाचही जणांनी मुंबईतल्या विविध महाविद्यालयांत जाहिरात विषयात पदवी घेतली. मात्र आम्हाला कधीच कॉलेजमध्ये असताना ‘D&AD’ किंवा इतर कोणत्याही पुरस्काराबाबत माहिती कळाली नव्हती किंवा शिक्षकांकडून सांगण्यात आली नव्हती. कारण कॉलेजमध्ये हे विषय शिकवणारे फार कमी शिक्षक प्रोफेनल असतात. जास्तीत जास्त शिक्षक पुस्तकातून शिकवतात. म्हणजे त्यांचं पुस्तकी ज्ञान खूप असतं मात्र प्रॅक्टिकल माहिती त्यांना म्हणावी तेवढी नसावी. त्यामुळेच त्यांना या पुरस्कारांबद्दलही माहिती नसावी आणि विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहोचत नसावी.

पुरस्कार घ्यायला लंडनला तुम्ही स्वत: गेले होते का?

लंडनला सगळ्यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी जायला आवडलं असतं, मात्र सगळ्यांना तिथे जाणं शक्य नव्हतं. लंडनला जाण्यासाठी स्वखर्चानं तेथे जायचं होतं. त्यामुळे एवढे पैसे खर्चून लंडनला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे आमच्या ग्रुपमधील फक्त एक जण पुरस्कार स्वीकारण्यासाठी लंडनला गेला होता.

भविष्यात काय करणार आहात याचं काही नियोजन केलं आहे का?

नक्कीच याच क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न आहे. जाहिरातीच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी लोकापर्यंत पोहोचवता येतात. तसेच जाहिरात क्षेत्रातील अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्या गोष्टी या विषयाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत.