चिथावणीसाठी आभार, लवकरच प्रत्युत्तर देऊ; आनंद महिंद्रा यांनी चीनला सुनावले

हिंदुस्थानने टिकटॉक, शेअरइटसह चीनच्या 59 अॅपवर बंदी घातल्याने चीनच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तसेच देशभरातही चीनच्या वस्तूंवर बंदी घालण्यासाठी जनताच पुढे सरसावली आहे. त्यामुळे चीनचा तिळपापड झाला आहे. त्याची प्रतिक्रिया चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबस टाईम्समध्येही उमटली आहे. चीनमधील नागरिकांनी हिंदुस्थानी उत्पादनांवर बंदी घालण्याचे ठरवले, तर चीनमध्ये हिंदुस्थानी उत्पादने शोधूनही सापडणार नाही, असे या वृत्तपत्राच्या लेखात म्हटले आहे. त्यावर प्रत्युत्तर देत उद्योजक आनंद महिंद्रा यांनी चीनला सुनावले आहे. ”हिंदुस्थानी उद्योजकांना चिथावणी दिल्याबाबत आभार! तुमचे आव्हान आम्ही स्विकारत आहोत. या संकटावर मात करत संधीचे सोने करू आणि प्रगती करू, लवकरच प्रत्युत्तर देण्यात येईल” असे ट्विट करत महिंद्रा यांनी चीनला प्रत्युत्तर दिले आहे.

चीनमध्ये हिंदुस्थानी उत्पादने मिळतच नाहीत आणि हिंदुस्थानी बाजारपेठा चीनच्या उत्पादनांनी भरलेल्या आहेत. हिंदुस्थानी, मित्रांनो तुम्हाला राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती यापेक्षा वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे लेखात म्हणत चीनने हिंदुस्थानी उद्योजक आणि उत्पादनांना हिणवले आहे. या लेखाचा सर्वत्र निषेध होत असून आनंद महिंद्रा यांनी चीनला प्रत्युत्तरही दिले आहे. ” हिंदुस्थानी कंपन्या, उद्योग आणि उत्पादनांवर याआधी अशाप्रकारे कोणीही वक्तव्य केलेले नाही. चीनने असभ्य आणि हेटाळणीची भाषा वापरत हिंदुस्थानला आव्हान दिले आहे. हे आव्हान आम्ही स्वीकारत आहोत. ही चिथावणीच आमच्यासाठी नारा ठरेल. त्यामुळे चिथावणीसाठी आभार, आम्ही संकचातून बाहेर पडू, संधीचे सोने करू आणि लवकरच प्रत्युत्तर देऊ,” असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

चीनच्या अॅपवर बंदी घातल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे चीन अस्वस्थ झाला आहे. त्याची अस्वस्थता त्यांच्या सरकारी वृत्तपत्राच्या लेखातून दिसून आली आहे. आता आपल्यावर टीका करून दिलेल्या चिथावणीचा आव्हान म्हणून स्वीकार करण्याची गरज आहे. देशासह परदेशातही हिंदुस्थानी उत्पादने पोहचवून त्यांची लोकप्रियता वाढवून चीनला प्रत्युत्तर देण्याची गरज आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या