पर्रीकर राजकीय क्षेत्रातील माफीया आहेत !

29

सामना ऑनलाईन, पणजी

पणजी मतदारसंघाची पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे भाजपाचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात गोवा सुरक्षा मंचने उमेदवार दिला असून आनंद शिरोडकरांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिरोडकरांनी पर्रीकरांवर सडकून टीका केली. विरोधी गटाशी संधान साधून विरोधी गटाला खिळखिळं करण्याचा पर्रीकरांकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर हे देखील शिरोडकरांसोबत अर्ज दाखल करताना उपस्थित होते, त्यांनी देखील पर्रीकरांवर टीका केली आहे. पर्रीकरांनी आशा-आकांशा धुळीळा मिळवल्या आहेत, स्वत:चा पक्ष देखील ते धुळीला मिळवण्याची बेतात आहे असं वेलिंगकर म्हणाले आहेत. तत्वच्युत कार्यकर्ता सत्तेसाठी कसा वागू शकतो हे त्यांनी गोव्याला दाखवून दिलं आहे अशा शब्दात वेलिंगकरांनी पर्रीकरांवर टीका केली आहे.

या मतदारसंघात काँग्रेसला उमेदवार सापडताना दमछाक झाली होती. गिरीश चोडणकर यांचे नाव अखेर काँग्रेसने निश्चित केलं आहे. आधी पणजीचे माजी महापौर अशोक नाईक यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता होती. मात्र त्यांनी नाव जाहीर होण्याच्या आधीच माघार घेतली त्यामुळे काँग्रेस अधिकच चिंताग्रस्त झाली आहे. बाबूश मोन्सेरात यांच्यावर पूर्वी काँग्रेस विसंबून होती. मात्र निवडणुकीच्या काही दिवस आधी मोन्सेरात यांनी भाजप आघडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला नाईक यांच्या नावाचा विचार करावा लागला होता. आपने देखील या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. २३ ऑगस्टला पणजी आणि वाळपेई या दोन मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक होत असून २८ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या