आनंदवारी

320

ज्येष्ठाची पौर्णिमा संपली की उभ्या मराठी मनाला वेध लागतात ते आनंदवारीचे… अवघ्या मराठी मनात हरीनामाचा गजर दुमदुमू लागतो. वर्षभर काळ्या आईची सेवा आणि संसारात बुडालेल्या मनाला जय जय राम कृष्ण हरी या सुरांची साद घालू लागते. सदोदीत संसाराचा व्याप घेउन जगणाऱ्या देहाला आत्मभानाचा मोह लागतो तो विठ्ठल या तीन अक्षरांचा…

निस्वार्थी मनाला आनंदकारीचे वेध लागतात. दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय मराठी मनाचा हा कुळाचार वर्षानुवर्षे सुरू आहे. सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी ‘माझिया जिवाची आवडी, पंढरपूरा नेईन गुढी’ असा निर्धार केला होता. माऊलीनी प्रकट केलेली ती इच्छा आजही चढत्या वाढत्या उत्साहाने अवघा महाराष्ट्र भक्तीभावानं पूर्ण करतोय.

कपाळावर गोपीचंदनाचा टिळा. खांद्यावर भगवी पताका. मनात शुद्ध सात्विकभाव. पंढरपुरी निघालेली ही वैष्णवांची मांदियाळी आणि वाटचालीतील शिस्त हा एक कुतूहलाचा विषय आहे. पहिली दिंडी ही पंढरपूरहून आळंदीस आली आहे; पण वारीचे आज जे ‘पालखी-सोहळा’ म्हणून नेटके रूप दिसते ते कै. ह. भ. प. हैबतबाबा आरफळकर यांच्यामुळे. विश्वंभर बाबा आणि हैबतबाबा यांनी सुरू केलेली ही वारी आज केवळ महाराष्ट्राचंच नाही तर साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतंय. पंढरपूरची वारी निश्चित केव्हा सुरू झाली हे सांगणे कठीण आहे; परंतु तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेकांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेवून सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली.

आषाढी वारी सोहळ्याची तयारी तशी महिनाभरापूर्वीच सुरू होते. शेगावहून गजानन महाराजांच्या पालखी, जळगाव जिह्यातून मुक्ताईंची, निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. तब्बल २१ दिवसांचा पायी प्रवास करून झाल्यावर या सर्व पालख्या आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात एकत्र येतात. आपल्यामध्ये असलेलं मीपण काढून टाकायचं असेल, तर वारीमध्ये जायलाच हवं असं म्हटलं जातं. लहान मुलांपासून ते ८० वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंत सगळेजण मोठ्या आनंदाने या आनंदवारीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात. घर-संसारापासून तब्बल एक महिनाभर आपण दूर असलो तरी वारीतील सहचरीच आपलं कुटुंब बनतात.

वारीमध्ये तमाम वारकऱ्यांसोबत प्रवास केल्यानंतर आपल्यामध्ये एक सांघिक भावना वाढीस लागते. एकमेकांना सोबत घेऊन जाण्याची सवय जडते. वारीचं मुख्य प्रयोजन हेच असावं.
वारी सोहळ्याची ही परंपरा ३५० वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहे. अगदी सुरुवातीपासून वारीमधली शिस्त ही सगळ्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण लाकून जाते. लष्करामध्ये अनुभवायला मिळणारी शिस्त वारीत गेलं की, शिकायला मिळते. पालखी जेव्हा मुक्कामासाठी विसावते. त्याअगोदर समाजआरती केली जाते. त्याकेळी सगळ्या दिंड्या पालखी तळावर एकत्र जमतात. सगळ्याच दिंड्यांमधून टाळ-मृदुंगाचा गजर आणि विठुनामाचा जयघोष सुरू असतो. पण त्याचवेळेला जेव्हा चोपदार आपला दंडक वर करतात, त्यावेळी मात्र अचानक पालखी तळावर एकदम शांतता अनुभवयाला मिळते. चोपदारांनी एकदा दंडक वर केला की, सगळ्यांनी जागीच थांबायचं हा नियम कसोशीने पाळला जातो. एकढ्या लाखभर लोकांपर्यंत पोहोचणं अशक्य असलं तरीही, चोपदारांच्या एका सूचनेनं हा संबंध वारकरी समाज स्तब्ध झालेला असतो. ही शिस्त कुणी सांगून येत नाही, ही शिस्त वारीमध्येच शिकायला मिळते. खरंतर तो चोपदारांच्या प्रती दाखवलेला मान असतो. अशाच नित्यक्रमाने वारकरी पंढरपूरकडे वाटचाल करत असतात.

वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. महत्त्वाचं म्हणजे या वारीसाठी कोणतेही निमंत्रण कुणीही देत नाही. गेली काही शतके ठरलेल्या वेळेला, ठरलेल्या दिवशी वारकरी एकत्र ते येतात. या शिस्तबद्धतेचं जगाला फार मोठे आश्चर्य लागून राहिले आहे. अपरंपार श्रद्धा, काटेकोर नियोजन व कार्यक्षम व्यवस्थापन यांची सक्षम जोड म्हणजे आषाढीची पायकारी. श्रीक्षेत्र आळंदीपासून निघून श्रीक्षेत्र पंढरीस पोहोचेपर्यंतचा पालखी सोहळा म्हणजे एक चालतेबोलते शहरच. एवढय़ा प्रचंड संख्येने येणाऱ्या आणि चालणाऱ्या समाजाचे नियंत्रण, त्यांच्या सेवासुविधा, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य, मलमूत्र विसर्जन व कचरा व्यवस्थापन, वाहतुकीचे नियंत्रण आणि पालखीच्या मुक्कामाचे संयोजन अशा कार्यवाहीत अचूक व्यवस्थापनाची सूत्रे दडलेली आहेत. अनेक दिंड्यांचा समावेश असलेला पालखी सोहळा, त्याचे आज अनेक शतके होत आलेले स्वयंस्फूर्त, काटेकोर, शिस्तबद्ध नियोजन आणि व्यवस्थापन हा अभ्यासाचा विषय आहे. यात सहभागी असलेली शासनव्यवस्था, संस्थान समिती, सोहळ्याचे मालक, सर्व मानकरी, दिंडी समाज यांच्या सहयोगातून वारीचे अचूक संयोजन केले जाते. पालखी मार्गावर मुक्कामाची ठिकाणे, तिथे पाळले जाणारे दंडक, समाजआरती, केली जाणारी सेवा यात अद्याप कोणताही बदल नाही. वारी प्रस्थान करतानाचे नियमही काटेकोरपणे पाळले जातात. वारी सोहळ्यातील जरीपटक्यांचे स्थान, रथामागील सर्वात शेवटच्या दिंडीचा क्रमांक, पुढच्या दिंडींचे क्रमांक, त्यांचे स्थान ठरलेलेच असते. माऊलींच्या कारी सोहळ्याची नियमाकली इ.स. १८३१ पासून जी श्री गुरू हैबतबाबा यांनी ठरकून दिली ती आजही तशीच अमलात आणली जाते. कित्येक सेवेकरी श्रीमाऊलींच्या चरणी आजही वर्षांनुवर्षे सेवा अखंडितपणे रुजू करतात. त्यात खंड नाही. अशी ही वारी अधिक निर्मळ करत निर्मलवारी करण्याचे आव्हान सध्या वारकरी पेलत आहेत. स्वयंशिस्त’ म्हणजे वारकरी, असे समीकरण वारीत दिसते. या वारीमागे कुठलीही मोठी सरकारी अथवा इतर कोणतीही यंत्रणा का मोठी आर्थिक मदत नाही. तरीदेखील हा सर्व सोहळा वर्षानुवर्षं परंपरागत पद्धतीने पार पडतो.
हैबतबाबांच्या पूर्वी माऊलींच्या पादुका गळ्यात बांधून नेण्याची परंपरा होती; पण हैबतबाबांनी पादुका पालखीतून नेण्याची व्यवस्था सुरू केली. त्यांनी त्यावेळचे औंधचे प्रतिनिधी यांच्याकडून हत्ती, घोडे पालखीबरोबर मागवले. काही दिवस हा लवाजमा येत असे. पुढे तो येण्याचे बंद झाले. मग हैबतबाबांनी बेळगाव जिह्यातील अंकली गावचे सरदार शितोळे यांच्याकडून घोडे, तंबु, सामान वाहाण्यासाठी गाड्या, नैवेद्यासाठी सेवेकरी हा सारा स्वारीचा लवाजमा मागवला. तो आजतागायत चालू आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी शितोळे सरदारांनी मदत देऊन महान सेवाकार्य केलेले आहे. म्हणूनच वारी सोहळ्यात आजही शितोळे सरकारांचा मान मोठा आहे.

ज्याला पंढरीचा लळा लागला आहे त्याचे मन संपत्तिसोहळ्यात रमत नाही. एकादशी केव्हा येते आणि दिंडी केव्हा निघते, या आर्त भावनेने तो पालखी सोहळा आपल्या गावी येण्याची वाट पाहतो, जसा पांडुरंग त्याच्या गावी म्हणजे पंढरपुरी त्याच्या येण्याची वाट पाहात उभा राहतो. देवानेही भक्ताची वाट पाहावी असा हा सोहळा. संताचे प्रतीक म्हणून त्यांच्या पादुका पालखीत नेऊन संतांची परमात्म्याशी भेट घडविणारा हा सोहळा आहे.
शब्दांकन – शुभांगी बागडे
[email protected]gmail.com

आपली प्रतिक्रिया द्या