सणाला आनंदाचा शिधा न देणार्‍या मिंध्यांना बातमीच्या मिरच्या झोंबल्या! पैठणमध्ये भूमरेंच्या समर्थकांनी ‘सामना’ जाळला

‘पैठण विधानसभा मतदारसंघात पाडव्यानंतर आला आनंदाचा शिधा’ या आशयाच्या ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या बातमीने गद्दार मंत्री संदीपान भूमरे यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या. तीळपापड झालेल्या भूमरे यांच्या समर्थकांनी ‘सामना’ जाळण्याचे भेकड कृत्य केले. दरम्यान, पैठण तालुका मराठी पत्रकार संघाने या कृतीचा कडक शब्दांत निषेध केला असून प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे.

गुढीपाडव्याच्या अगोदर गोरगरिबांना आनंदाचा शिधा मिळणार असे मिंधे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र पाडवा उलटून गेल्यावर बहुतेक ठिकाणी हा शिधा मिळाला. पालकमंत्री असूनही संदीपान भूमरे यांच्या पैठण मतदारसंघातही हा आनंदाचा शिधा सण उलटून गेल्यावर आला. ‘सामना’ने हे वृत्त प्रसिद्ध केले. मात्र मिंधे गटाला हे वास्तव पचले नाही. पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोटावर मोजण्याएवढ्या कार्यकर्त्यांनी ‘सामना’चे अंक जाळले.

मिंधे गटाच्या या भ्याड कृत्याचा पैठण तालुका पत्रकार संघाने तीव्र निषेध केला. पोलीस प्रशासनाची परवानगी न घेता हे आंदोलन करण्यात आले. सत्तेच्या जोरावर माध्यमांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे. त्यामुळे भूमरे समर्थक कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तालुका पत्रकार संघाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक डॉ. विशाल नेहूल तसेच प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर 17 पत्रकारांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

मतदारच गद्दारांना धडा शिकवतील

केवळ खोक्यांच्या हिशेब ठेवणारांना निष्ठा कशी कळणार? सत्तेसाठी लाचार झालेल्या या गद्दारांना पैठणचे मतदारच धडा शिकवतील.
– मनोज पेरे, तालुकाप्रमुख (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे)

जे पक्षाचे झाले नाहीत, ते जनतेचे काय होणार

गद्दार हा गद्दारच असतो. ज्या पक्षाने मोठे केले त्याच्याशीच बेईमानी करणारे जनतेचे काय भले करणार? जे पक्षाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार?
– दत्तात्रय गोर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय गोर्डे यांनी सांगितले की, ‘गद्दार हा गद्दारच असतो. ज्या पक्षात मोठे झाले. त्यांच्याशी बेईमानी करणारे जनतेचे काय भले करणार?’ असा प्रश्नही गोर्डे यांनी उपस्थित केला.