शिक्षणसम्राट म्हणवणारा संस्थाचालक फरार; शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

सामना प्रतिनिधी । पाथरी

पाथरी शहरातील आनंदवन इंटरनॅशनल स्कूल ही विनापरवाना थाटून व शाळेला मोठमोठी नावे देऊन शेकडो विद्यार्थी व पालक तसेच शासनाचे फसवणूक करणारा व स्वत:ला शिक्षणसम्राट समाजणारा भामटा शिक्षण संस्थाचालक डॉ. सलीम अमीन शेख हा शिक्षणाधिकारी पाथरी यांच्या फिर्यादीवरुन पाथरी ठाण्यात गुन्हा दाखल होताच फरार झाला आहे. त्याच्या शोधार्थ पाथरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा परभणीचे दोन पथके रवाना केले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

डॉ. सलीम मेडिकल एज्यूकेशन फाउंडेशन या संस्थेअंतर्गत पाथरी शहरातील आनंदवन इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी शाळेची तपासणी व चौकशी केली असता गटशिक्षणाधिकारी विश्वास खोगरे यांच्या असे निदर्शनास आले की, ही शाळा शासनमान्य नाही. त्यानंतर डॉ. सलीम मेडिकल एज्युकेशन पाथरी या संस्थेचे संचालक डॉ. सलीम अमीन शेख याच्याकडे आनंदवन इंटरनॅशनल स्कूलबद्दल विचारणा केली असता, ‘आनंदवन इंटरनॅशनल स्कूल ही शाळा मी 17 जून 2017 पासून अनाधिकृपणे चालवितो. ही शाळा बंद करण्याचा अधिकार कोणासही नाही’ असे डॉ. शेख याने गटशिक्षणाधिकारी पाथरी यांना लेखी कळविले होते. यानंतर ही बाब गटशिक्षणाधिकारी पाथरी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी परभणी यांना 5 जानेवारी 2019 रोजी लेखी अहवालानीशी कळविली. यानंतर 29 जानेवारी 2019 रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी परभणी यांनी सदर शाळा अनाधिकृत असल्याने या शाळेचा संस्थाचालक डॉ. सलीम अमीन शेख याच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर डॉ. शेख याची आनंदवन इंटरनॅशनल स्कूल बंद करून या शाळेतील 164 विद्यार्थी जवळच्या मान्यताप्राप्त शाळेत समायोजित करण्याच्या सुचनाही 4 जून 2019 रोजी दिल्या. डॉ. शेख याने बनावट दस्ताऐवजाचा वापर करून, शाळेची जाहिरात करून नियमबाह्य शाळा चालवून विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट केली. तसेच शासनाचीही फसवणूक केल्याची फिर्याद पाथरी पोलीस ठाण्यात पाथरीचे गटशिक्षणाधिकारी विश्वास खोगरे यांच्या फिर्यादीवरुन दाखल होताच या शाळेचा भामटा शिक्षण संस्थाचालक डॉ. सलीम अमीन शेख पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला आहे.

दरम्यान, याप्रकरणी डॉ. शेख याच्या शोधार्थ पाथरी पोलीस ठाण्याचे एक तर स्थानिक गुन्हा शाखा परभणीचे दोन पथके रवाना केले असल्याची माहिती पोलीससूत्रांकडे मिळाली आहे. याप्रकरणी डॉ. शेख याला अटक करून तात्काळ शिक्षा करण्सयाची मागणी विद्यार्थी व पालकवर्गातून होत आहे.