पिक विम्यातून गाव वगळल्याने मतदानावर टाकला बहिष्कार

anandwadi-village-latur

अभय मिरजकर । चापोली

सध्या लातूर लोकसभेच्या जागेसाठी जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात सर्वत्र नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळ पासून रांगेत उभा राहत मतदान करत आहेत. मात्र आनंदवाडी (ता. चाकूर) येथील ग्रामस्थांनी खरीप पिक विम्यात गाव वगळल्याने अन्याय झाल्याचे कारण पुढे करत या निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर दुपारी 12 वाजेपर्यंत शुकशुकाट पाहायला मिळाला.

नुकताच खरीप पिक विमा जाहीर झाला. यात आनंदवाडी या गावाला पूर्णतः वगळले आहे. या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. पाण्याअभावी शेतात काहीच पिकले नाही. शेतकऱ्यांना आशा होती की पिक विमा मंजूर होईल. मात्र पूर्ण गावाला वळल्याने ग्रामस्थांची घोर निराशा झाली. या संदर्भात आनंदवाडी ग्रामस्थांनी चाकूर चे तहसीलदार यांना भेटून निवेदनही दिले होते व जर आम्हाला न्याय मिळाला नाहीतर आम्ही ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा ही दिला होता. मात्र या निवेदनाची कोणीही गांभीर्याने दखल घेतली नसल्याने गुरुवारी 18 रोजी होत असलेल्या लातूर लोकसभेच्या मतदान प्रक्रियेवरच ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे.

सर्व ग्रामस्थ मतदार केंद्राच्या बाहेर थांबून आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत एकाही मतदाराने आपला हक्क बजावला नाही. या गावाची मतदार संख्या 1172 आहे.