”राजधर्माचे’ पालन खरेच होते आहे का?

<<अनंत बोरसे>>

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेसच्या प्रदीर्घ राजवटीला कंटाळून अनपेक्षितपणे मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपला एकहाती सत्ता मिळाली. स्वतःच्या पक्षाच्या २८२ जागा तर मिळाल्याच पण एन.डी.ए.ने ३३० च्यावर जागा मिळवून सत्तांतर झाले.

त्यानंतर विजयाच्या धुंदीतच, ना खाऊंगा ना खाने दुंगा’, ‘बाहेरच्या देशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा होतील’, ‘दरवर्षी सुमारे दोन कोटी रोजगार उपलब्ध होतील,’ प्रधानमंत्री नव्हे, तर देशाचा प्रधानसेवक,’ महागाई शंभर दिवसांत कमी करू’अशा विविध घोषणा करुन, अब अच्छे दिन आ गये है, जनतेला जणू काही दुसरे स्वातंत्र्य मिळाले असे वातावरण निर्माण केले गेले. पण जसजसे दिवस जाऊ लागले, तसतसे जनतेचा भ्रमनिरास होत गेल्याचे स्पष्ट होऊ लागले. ना रोजगार उपलब्ध झाला, ना महागाई कमी झाली, सर्वसामान्य जनतेचे आयुष्य यत्किंचितही सुसह्य झाले नाही. पण जेव्हा जनता प्रश्न विचारु लागली, तेव्हा ६०-७० वर्षांत देशात काहीच झाले नाही, असे सांगून जनतेलाच तेव्हा गप्प का होतात, असे प्रश्न विचारले जाऊ लागले.

वास्तविक, कॉंग्रेस राजवटीला कंटाळून तुम्ही काहीतरी कराल या आशेने जनता तुमच्याकडे पाहते आहे. आता चार वर्षांनतरही तेच रडगाणे ऐकायला जनता तयार नाही. तुम्हाला पण जनतेने ६०-७० वर्षे द्यायला हवी का? तोपर्यंत तुम्ही जे काही कराल ते जनतेने हतबलपणे सहन करीत राहायचे का? जनतेचा अपेक्षाभंग होतो आहे, हे पाहून तो सगळं निवडून येण्यासाठीचा जुमला होता असे सांगून मोकळे होता येणार नाही.

देशातील २०-२१ राज्यांत सत्ता मिळविली असे सांगितले जाते, जनतेने नक्कीच भाजपला कौल दिला आहे. पण या पैकी बहुतांश राज्यांतील चित्र काय आहे? केंद्रात फक्त भाजपचीच राजवट, एन डी ए तर फक्त कागदावरच आहे. देशाचा कारभार करताना इतर ना कुणालाही विचारात घेतले जाते, ना चर्चा केली जाते. एक देश, एक पक्ष, एक नेता, या दिशेने चाललेली वाटचाल, नक्कीच लोकशाही देशात रुजणार नाही.
भाजपशासित राज्यांत, यूपी, राजस्थान, किंवा इतर राज्यांतील जी काही परिस्थिती जनता पाहत आहे ते पाहून सत्तेची हवा डोक्यात भिनल्याचेच दिसते आहे. केवळ हिंदू मतांचे ध्रुवीकरण आणि भगवेकरण हा एकच अजेंडा दिसत आहे. केवळ एकाच विशिष्ट जनसमुदायाला झुकते माप द्यायचे आणि इतरांच्या आक्रोशाकडे सोयिस्कर दुर्लक्ष करायचे असेच चालले आहे. आपल्या पक्षात आल्यावर वाल्याचा वाल्मीकी होतो, असे लंगडं समर्थन करीत अनेक गुन्हेगारांनाच पाठीशी घातले जात आहे. यूपीमधील उन्नाव प्रकरण, कश्मीरमधील चिमुरडीवरील अत्याचाराचे प्रकरण गंभीर असताना आरोपी फक्त आपल्या पक्षाचे आहेत म्हणून वाचविण्यासाठीची धडपड हे सगळं चांगले नाही.

एकंदरीतच, मोदी आणि राज्यातील इतर सुभेदारांची कार्यपद्धती पाहता, यांना राजधर्माची शिकवण देणाऱ्या ‘भीष्मपितामहांची ’नितांत गरज आहे. अन्यथा देशातील हवा बदलत आहे, २०१९च्या निवडणुकीचे भाकीत जे गिरीश बापट यांनी मागे केले तसेच होणे अटळ आहे. भाजपकडून जनतेचा अपेक्षाभंग होणे हे नक्कीच दुःखदायक ठरले आहे.