कुर्रेबाज

78

शिरीष कणेकर

क मराठमोळा कुर्रेबाज नट आहे. तो नट नसतो म्हणजे चेहऱ्याला रंग चोपडून नाटकात, मालिकेत, सिनेमात अभिनय करीत नसतो तेव्हाही तो कुर्रेबाजच असतो. त्याच्याकडे पाहिलं की कुर्रेबाज या शब्दाची ओळख पटते. उर्मट गाल, मस्तवाल चेहऱ्याची ठेवण, मांजरं लाजतील असे घारे पिंगट डोळे हे त्याचे व्यावसायिक लक्षण नसून आक्रमक व्यक्तिमत्त्वाचा मारकुटा आविष्कार आहे. नशीब आमचे मार्ग कुठे ‘क्रॉस’ होत नाहीत.

एका ज्येष्ठ व श्रेष्ठ नटानं कुठेशी जमीन, शेती व डोंगर विकत घेतले. भेटेल त्याच्यापाशी त्याचे रसभरीत वर्णन करून झाले. कुर्रेबाज त्याच्या तावडीत सापडला. (कोण कोणाच्या तावडीत सापडलं हे पुढच्या काही मिनिटांतच कळलं). त्यानं डोंगराच्या सौंदर्याचं वर्णन सुरू केलं.
‘‘मग मी काय करू? कुर्रेबाज तिरसटपणे ओरडला.
आता बॉल इन हिज कोर्ट. ‘‘माझं बोलणं सगळय़ांनाच खटकलं. पण मी तरी काय करू? त्या डोंगराचं डोंगराएवढं वर्णन मी आधी दोनदा ऐकलं होतं. किती वेळा ऐकायचं? माझं डोकं गेलं.’’ तो म्हणाला, मला पटलं. मी अगदी हे नाही पण असंच काहीतरी उलटून चपराक मारणारं म्हणालो असतो.
एका चित्रपटात कुर्रेबाज पोलीसवाल्याची भूमिका करीत होता. असिस्टंट डायरेक्टरनं त्याला चालून दाखवायला सांगितलं. यानं आज्ञाधारकपणे चालून दाखवलं. असिस्टंट डायरेक्टरला ते रुचलं नाही. त्यानं स्वतः चालून दाखवलं.
‘‘हे असं फक्त परेडला चालतात, एरवी नाही.’’ कुर्रेबाज सौम्यपणे म्हणाला.
‘‘पुन्हा चालून दाखव.’’ असिस्टंट डायरेक्टर म्हणाला.

कुर्रेबाज चालायला लागला. तो चालत चालत सेटवरून बाहेर पडला. स्टुडिओतून बाहेर पडला व रिक्षात बसून चेंबूरला घरी गेला. त्यानंतर बऱयाच दिवसांनी अपघातानं दोघं समोरासमोर आले.
‘‘अरे, कुठं गेलात त्या दिवशी तुम्ही चालत चालत?’’ दिग्दर्शकानं विचारलं.
‘‘मी चाललोच आहे.’’ कुर्रेबाज म्हणाला, ‘‘तुमचं कसं चाललंय?’’
भल्ला नावाच्या एका दिग्दर्शकाला कुर्रेबाजाचं नाव बिलकूल आवडलं नाही.
‘‘मी जन्मात असं आडनाव ऐकलेलं नाही.’’ तो घमेंडीत म्हणाला.
‘‘नसेल ऐकलं.’’ कुर्रेबाज निर्विकारपणे म्हणाला, ‘‘मीही तुमचं आडनाव ऐकलेलं नव्हतं. आता कामाचं बोलूया का?’’
‘‘हे बघा, तुम्हाला पुढे यायचं असेल…’’ भल्ला बोलला.
‘‘मी पुढे आलेलोच आहे.’’ कुर्रेबाज म्हणाला, ‘‘म्हणून तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधलात. माझी बिदागी मान्य केलीत. आता तुम्ही पुढं यायचं बघा.’’

तो सेटवर अजय देवगणबरोबर सिगारेट ओढत बोलत बसला होता. प्रॉडक्शनचा माणूस त्याच्या कानात म्हणाला, ‘‘सेटवर सिगारेट ओढण्यास मनाई आहे.’’
‘‘हा काय ओढतोय?’ कुर्रेबाजानं ‘पॉइंट’ काढला.
‘‘त्यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांना कोण सांगणार?’’ प्रॉडक्शनवाला नर्व्हस होत म्हणाला.
‘‘अच्छा, म्हणजे ज्यांना तुम्ही सांगू शकत नाही त्यांना सांगणार नाही व ज्यांना तुम्ही सांगू शकता असे तुम्हाला वाटतं त्यांना मात्र सांगणार. खासा नियम आहे तुमचा’’ तो म्हणाला. त्यानंतर अजयनं सिगारेट विझवली की कुर्रेबाजानं नवीन पेटवली हा तपशील कळला नाही.

कुर्रेबाज एरवी शांत असतो. कमी बोलतो. मध्ये मध्ये पचकत नाही. आपण बरे की आपली सिगारेट बरी असा कोपऱयात बसलेला असतो. पण अकारण कोणी त्याच्या वाटेला गेलं तर त्याची काही खैर नाही. मस्तवाल बैलाला लाल फडकं दाखवायचं नसतं. तो काय होतंय कळायच्या आत शिंगावर घेऊन भिरकावून देईल. मग बसा जखमा चाटत.
पण एकदा एक असिस्टंट डायरेक्टर अशोक सराफला म्हणाला, ‘‘ अशोकजी, वो जरा टायमिंग का देख लेना.’’
कुर्रेबाजाला ते सहन झालं नाही. तो डायरेक्टरला सरळ म्हणाला, ‘‘तुम्ही अशोक सराफना टायमिंग शिकवताय? छान छान!’’

बरेच दिवस आमचं भेटायचं चाललं होतं. सारखं पुढे जात होतं. अखेर आम्ही भेटलो. भर हॉटेलात तो निःसंकोचपणे माझ्या पाया पडला. वय सोडून दुसरं त्याला माझ्यात काय दिसलं कोण जाणे. मोबाईलवरही ‘सर’ म्हटल्याशिवाय तो मला ‘मेसेज’ पाठवत नाही. असा कसा हा कुर्रेबाज? पुढले दोन-अडीच तास माझे झकास गेले. मी कधी नाही तो श्रोत्याच्या भूमिकेत होतो. ऐकण्यातही गंमत असते हो. फक्त बोलणारा त्या तोलामोलाचा हवा. येणारे जाणारे त्याच्याकडे टवकारून बघत होते. माझ्याकडे तो बघत होता.

घटस्फोटित कायस्थ बायकोकडे गटगटे (पक्षी: ‘बॉम्बे डक’ ऊर्फ बोंबिल) खायला जाण्याइतके खेळीमेळीचे संबंध त्यांनी जपलेत. तिचं एवढंच म्हणणं असतं की त्यानं आधी सांगून यावं. ऐनवेळी ‘फिश’ मिळत नाही. एका कोर्ट केसमध्ये माजी पत्नी व मुलगी त्याच्या बाजूने साक्ष द्यायला कोर्टात हजर होते. सगळेच अजब. कुर्रेबाजची दुनियाच अजब.

अरे हो, कुर्रेबाज म्हणता म्हणता मी त्याचं नावच लिहायचं विसरलो. (लुच्चे कुठले, फोटोवरून तुम्ही ओळखलंच असेल) अनंत जोग. आपल्या शांताबाईंचा मुलगा. तो मला भेटायला जाणार आहे असं त्यानं लेकीच्या कानावर घातलं तेव्हा ती चपापून बापाला म्हणाली, ‘‘बाप रे! त्यांच्याशी तरी नीट वाग.’’

मी क्षितीला सांगू इच्छितो की आम्ही दोघंही एकमेकांशी खूप चांगले वागलो. मीदेखील एक ‘लोअर लेव्हल’ कुर्रेबाजच आहे की. अर्थात अंत्या जोगापुढे मी म्हणजे अमिताभपुढे मुकेश खन्ना. मला एक शंका येते. आम्ही दोघं खरोखरच चांगले तर नसू?…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या