अनंतरामने स्वत:वर ठेवला अंकुश!

>> ममता क्षेमकल्याणी

‘मुक्तांगण’मध्ये पडेल ते काम करून स्वतःमध्ये बदल करायला सज्ज झालेल्या अनंतरामने स्वतःचे नाव बदलून अंकुश असे करून घेतले. व्यसनातून सुटका करून घ्यायची तर आपणच स्वतःवर ‘अंकुश’ ठेवला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. त्याचीच ही यशोगाथा…

अगदी कोवळ्या वयात वडिलांचे छत्र हरपलेल्य अनंतराम दर्वेशचे सगळे पालनपोषण त्यांच्या आईने किस्नाबाईंनी केले. आपल्याला वडील नाहीत, त्यात घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि दिवसभर काबाडकष्ट करून आई आपल्याला जमेल ते खायला घालून आपल्याला वाढवते आहे या विचारांचा नकारात्मक परिणाम सातवीत शिकणाया अनंतरामच्या मनावर झाला आणि त्या नैराश्यावरील उपाय म्हणून अवघ्या सातवीतल्या या मुलाच्या हातात मित्राने सिगारेट ठेवली. परिस्थितीची जाणीव ठेवून त्यातून चांगला मार्ग काढण्याऐवजी मनाने एकटा पडलेला कोवळा जीव हळूहळू व्यसनाच्या इतक्या आहारी गेला की, अगदी थोडय़ाच वर्षांत ब्राऊन शुगरपर्यंतच्या सगळ्या व्यसनांनी त्याला घट्ट विळखा घातला.

मुंबईतील कुर्ला इथे आपल्या आईबरोबर चाळीतल्या छोटय़ाशा खोलीत वास्तव्यास असलेल्या अनंतराम दर्वेशचा सगळा दिवस अशाच चुकीच्या विचारांच्या मुलांबरोबर जात असे. इयत्ता सातवीपर्यंत आपल्या शिक्षणाकडे बऱयापैकी लक्ष देणाऱया अनंतरामला सिगारेटच्या धुराचे लोट खुणावू लागले, तसे त्याचे शिक्षणावरचे लक्ष उडू लागले. कसेबसे सातवीचे वर्ष संपून आठवीत प्रवेश घेतला, पण त्याही वेळी व्यसनाची सोबत होतीच. एवढंच नव्हे, तर आठवीतच अनंतरामला गांजाची ओळख झाली आणि सिगारेटपेक्षा हा नवीन प्रकार त्याला अधिक प्रिय वाटू लागला. गांजामुळे येणारी नशा अनंतरामला स्वतःच्याच मस्तीत ठेवत होती. त्यामुळे गांजा ओढल्यानंतर ना त्याला आपल्या एकटेपणाची जाणीव व्हायची, ना अहोरात्र काम करणाऱया आईचे कष्ट दिसायचे. अनंतराम पदोपदी फक्त आणि फक्त व्यसनाची पूर्तता करण्याचा विचार करू लागला.

एकटेपणा आणि नैराश्याची जाणीव झाली की, नशा करायची आणि नशा उतरली की, एकटेपणा जाणवून पुन्हा नशेकडे वळायचे या दृष्टचक्रात अडकलेल्या अनंतरामला पुढच्या अनेक व्यसनांची चव चाखायला फारसा वेळ लागला नाही. मद्यपान, झोपेच्या गोळ्या असे एकेक टप्पे सुरू झाले. नववीपर्यंत गेलेली शिक्षणाची गाडी तिथेच थांबली आणि नववी पास झाल्यानंतर अनंतरामने कायमचीच शाळा सोडली. दरम्यान, 1980 मध्ये ब्राऊन शुगर मुंबईत उपलब्ध होऊ लागली आणि इतर अनेक किशोरवयीनांप्रमाणे अनंतरामदेखील या नव्या व्यसनाकडे वळला. ब्राऊन शुगरची खुलेआम विक्री होऊ लागली. दोन रुपयांची पुडी आणि पाच रुपयांची कॅप्सूल त्यावेळी मिळत असे. आतापर्यंतच्या केलेल्या सगळ्या व्यसनांपेक्षा ब्राऊन शुगरने अनंतरामवर काही वेगळीच जादू केली. ब्राऊन शुगर घेऊन शांत पडून राहणाऱया अनंतरामला त्याच्या आईने हरप्रकारे समजावले, दटावले, रागावले, पण त्याचा फार काही परिणाम अनंतरामवर झाला नाही. शेवटी आईने त्याला केईएम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्या वॉर्डमध्ये बरेच मानसिक रुग्ण असायचे. त्यावेळी तिथे अनंतरामसारख्या रुग्णांना झोपेच्या गोळ्या दिल्या जात. त्यावेळी नाईट शिफ्टला असलेल्या नर्सेसची फसवणूक करून अनंतरामने स्वतःच त्यांच्याकडून झोपेच्या गोळ्यांचा डोस वाढवून घेतला.

व्यसनाचा तिढा मात्र काही सुटला नाही. कारण काहीही करून व्यसन करायचे हे एकमेव ध्येय डोळ्यांसमोर असल्याने इतरांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करण्याकडे अनंतरामचा कल वाढला. ब्राऊन शुगरच्या पुडय़ा घेण्याचे प्रमाण वाढल्याने त्यावर होणारा खर्च पण वाढू लागला. खिशात पैसे नसल्याने चोरी, दादागिरी, फसवणूक अशा जमेल त्या मार्गाने पैसे मिळवून व्यसनाची तहान भागवणे एवढेच अनंतरामचे ध्येय राहिले.
अनंतरामचे वयाच्या बाराव्या वर्षी सिगारेटने सुरू झालेले व्यसन पंधराव्या वर्षापर्यंत गांजा आणि ब्राऊन शुगरपर्यंत येऊन पोहोचले होते. व्यसन साध्य करण्यासाठी पडेल ती काम पण त्याने केली. दहा वर्षांचा व्यसनाचा हा विळखा अनंतरामचे शरीर आणि त्याच्या आईचे मन पोखरत होता. दरम्यान, मुंबईच्या चाळीतील घर विकून पुण्यात येण्याचा निर्णय त्याच्या आईने घेतला. घराच्या या व्यवहारातील काही पैसेसुद्धा अनंतरामने स्वतःचे व्यसन करण्यासाठी वापरले. एकदा भरपावसात गुडघाभर पाण्यात धारावी येथे ब्राऊन शुगर मिळवण्यासाठी दोन तास चालून आल्यानंतर अनंतरामच्या डाव्या पायाला पक्षाघात झाला. त्यावेळी स्वतःच्या अस्तित्वाबद्दल झालेली तीव्र जाणीव अनंतरामला खूप काही शिकवून गेली. यासाठीच्या औषधोपचारांत त्याच्या आईने खाल्लेल्या खस्ता पाहून अनंतरामचे डोळे पाणावले. मात्र, व्यसन त्याला शांत बसू देत नव्हते.
दरम्यान, अनंतरामचे व्यसन आणि त्यासाठीच्या फसवणूक, लबाडी यांसारख्या गोष्टींमुळे कोणीही नातलग, मित्र, परिचित त्याला मदत करेनासे झाले. मुंबईतील घर विकून त्या पैशांतून पुण्यातील हडपसर येथे त्याच्या आईने एका नातलगाच्या ओळखीने छोटेसे घर घेतले. याचदरम्यान पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्राची माहिती मिळाली आणि अनंतराम ‘मुक्तांगण’मध्ये दाखल झाला. त्यावेळी ‘मुक्तांगण’ची फी देण्यासाठीदेखील त्याच्या आईकडे पैसे नव्हते. तेव्हा ‘मुक्तांगण’च्या संस्थापका डॉ. अनिता अवचट यांनी अनंतरामला प्रवेश दिला आणि त्याच्या आईला मोठा दिलासा मिळाला.

दरम्यान, 1993 साली किल्लारी येथे झालेल्या भूकंपाच्या वेळी मदतकार्यासाठी गेलेल्या ‘मुक्तांगण’च्या पाच कार्यकर्त्यांमध्ये अंकुशदेखील सहभागी झाला. मात्र, तिथे गेल्यानंतर तिथे मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे इतर चौघांनी आपल्या व्यसनाच्या रस्त्यावर पुन्हा वाटचाल सुरू केली. त्यावेळी अंकुशने लगेच पुणे गाठून त्यांच्यापासून दूर राहणे पसंत केले. अंकुशचा हा प्रामाणिकपणा ‘मुक्तांगण’साठीदेखील मोठा दिलासा होता. याच काळात अंकुशच्या आईने त्याचे लग्न ठरविले आणि मग मंगल या आपल्या सहचारिणीच्या मदतीने अंकुशने आपल्या संसाराला सुरूवात केली.

मंगल आणि अंकुश या दोघांचेही शिक्षण फार नसल्याने जमेल ती काम करणे, सायकलवर अनेक किलोमीटर प्रवास करणे, पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत फक्त काम आणि काम करणे अशा नव्या आयुष्याला हे दांपत्य हसतमुखाने सामोरे गेले. ‘मुक्तांगण’च्या डॉ. अनिता अवचट, डॉ. अनिल अवचट, डॉ. अनंत नाडकर्णी, प्रसाद ढवळे, मुक्ता पुणतांबेकर या सगळ्यांनी दिलेला विश्वास अंकुशने सार्थ ठरवला. ‘हेही दिवस जातील’ हा ‘मुक्तांगण’चा विचार कायमच त्याला लढण्याचे बळ देऊन गेला. ‘मुक्तांगण’मध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या काळात दत्ता श्रीखंडे यांनी अंकुश यांना खूप सहकार्य केले.

आईचा आशीर्वादही मोलाचा ठरला आणि एकेकाळी व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने त्यातून सावरत स्वतःच्या कष्टाने बांधलेल्या घरात राहण्याचे भाग्य त्या माऊलीला मिळाले. सायकलवर येता-जाता होणारी दमवणूक कमी करण्यासाठी कर्ज काढून रिक्षा घेतली. त्यामुळे ‘मुक्तांगण’मध्ये येणे-जाणे सोयीचे झाले आणि उरलेल्या वेळेत रिक्षा चालवून चार पैसे जास्तीचे मिळू लागले. यासाठी घेतलेल्या प्रत्येक कर्जाच्या वेळी ‘मुक्तांगण’ने पुढे केलेला मदतीचा हात खूप मोलाचा ठरला.

‘मुक्तांगण’मध्ये मिळालेला विश्वास, तिथे होणारे मार्गदर्शन सत्र, जगण्याकडे बघण्याची मिळालेली नवीन दृष्टी या सगळ्यामुळे 35 दिवसांच्या कालावधीत अनंतराममध्ये चांगलाच बदल झाला. ‘मुक्तांगण’मध्ये पडेल ते काम करून स्वतःमध्ये बदल करायला सज्ज झालेल्या अनंतरामने स्वतःचे नाव बदलून ‘अंकुश’ असे करून घेतले. व्यसनातून सुटका करून घ्यायची तर आपणच स्वतःवर अंकुश ठेवला पाहिजे, अशी त्याची भूमिका होती.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या