वृद्धाची कवळी जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. डिसेंबर 2021 मध्ये एका महिलेने पोलीस ठाण्यात नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नवरा आपल्यावर अनैसर्गिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती करत असल्याचं तिने तक्रारीत म्हटलं होतं. संबंध ठेवत असताना नवरा आपल्याला चावतो आणि गुप्तांगामध्ये दात रुतवतो असं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. हा विकृत माणूस लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच असे प्रकार करत असल्याचं पिडीत महिलेने म्हटलंय. तक्रारदार महिलेचं वय 27 वर्ष असून तिच्या नवऱ्याचं वय 67 वर्षे इतकं आहे.

तक्रारदार महिला ही इंदूरची राहणारी असून तिचं लग्न वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या व्यक्तीशी झालं आहे. तिचा नवरा हा गुजरातमधला दागिन्यांचा व्यावसायिक आहे. नवऱ्याच्या या विकृत गोष्टींना जेव्हा विरोध केला तेव्हा त्याने धमकावलं असा आरोप या महिलेने केला आहे. माझ्याकडे खूप पैसे असून, वरपर्यंत ओळखी असल्याचं सांगत तो तिला धमकावत होता. कसंतरी करून तक्रारदार महिला नवऱ्याच्या तावडीतून सटकली आणि थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. तक्रारदार महिलेचं हे दुसरं लग्न असून ती लग्नानंतर नवऱ्यासोबत उदयपूर इथे गेली होती. महिलेने म्हटलंय की नवऱ्याला दात नसून तो कवळी लावतो.

28 ऑक्टोबरला लग्न झाल्याच्या दिवसापासून नवरा विकृतपणे आपल्याला त्रास देत होता असं या महिलेने म्हटलं आहे. या प्रकाराबद्दल कोणाला सांगितलंस तर तुझ्या अख्ख्या कुटुंबाला संपवून टाकेन अशी धमकी तिच्या नवऱ्याने दिली होती. हे प्रकरण कोर्टात पोहोचल्यानंतर महिलेच्या वकिलाने तिच्या शरीरावरील जखमांच्या व्रणाचे फोटो न्यायाधीशांपुढे सादर केले. हे फोटो पाहिल्यानंतर कोर्टाने आरोपीला तत्काळ अटक करून त्याची कवळी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.