देशी बनावटीची पिस्तुले व काडतुसांसह दोघांना अटक

अंधेरी पश्चिमेला दादाभाई नौरोजी नगर पोलिसांनी शस्त्रास्त्र घेऊन आलेल्या दोघा तरुणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे दोन अग्निशस्त्र व दोन काडतुसे हस्तगत करण्यात आली.

दोन तरुण जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ शस्त्रास्त्रs घेऊन येणार असल्याची माहिती दा. नौ. नगर पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून त्या दोन्ही तरुणांवर झडप घातली. दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन देशी बनावटीची पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. दोघेही मूळचे राजस्थानचे असून मुंबईत मालवणी परिसरात राहतात. त्यांनी अग्निशस्त्रs कुठून व कशासाठी आणली याचा पोलीस शोध घेत आहेत.