अंधेरी-दहिसर मेट्रो रेल्वे सुस्साट!

15

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या अंधेरी ते दहिसर मेट्रो रेल्वे मार्गाचे काम आता झपाट्याने होणार आहे. या मार्गासाठी रेल्वे स्टेशन,जिने, लिफ्ट, भुयारी मार्ग यासाठी जागा देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्तावाला आज सुधार समितीची मंजुरी मिळाली. या मार्गासाठी मुंबईकरांची उद्याने आणि मोकळ्या जागा जात नसल्याने या प्रस्तावाला शिवसेनेने पाठिंबा दिला.

मुंबईत होणाऱ्या सात मेट्रो रेल्वे मार्गांपैकी वर्सोवा-अंधेरी ते घाटकोपर हा एकच मार्ग सुरू झाला असून इतर मार्गांचे बांधकाम सुरू आहे. यामधील दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो रेल्वे मार्ग क्रमांक ७ साठी स्थानक उभारणे, भुयारी मार्ग बनवणे, लिफ्ट, जिने अशा सुविधांसाठी जागा आवश्यक आहे. यासाठी महापालिका हद्दीतील जागेचा वापर करण्याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीत मांडण्यात आला. या मार्गातील मेट्रोसाठी जागेचा वापर करताना नागरिकांच्या हिताला कोणत्याही प्रकारच्या फटका बसत नसल्याची भूमिका सदस्यांनी मांडली. त्यामुळे या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

या ठिकाणच्या जागांचा वापर होणार
मेट्रो रेल्वे-७ प्रकल्पासाठी मौजे गुंदवली, चकाला, मालाड, आकुर्ली, मागाठाणे, दहिसर येथील जमिनीचा विकास योजनेतील वापर बदलून मेट्रो रेल्वे स्थानक आणि इतर अनुषंगिक कामांसाठी होणार आहे.

मुंबईकरांच्या मोकळ्या जागा बळकावू देणार नाही
मुंबईत होणाऱ्या ७ मेट्रो मार्गांपैकी अनेक मार्गांत नागरिकांसाठी आरक्षित असणारी उद्याने, मैदाने, राहत्या इमारती बाधित होत आहेत. यामध्ये आरे कॉलनीत होणारा मेट्रो कारशेड, वर्सोवा मलनिःसारण प्रकल्प अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. त्यामुळे मेट्रोमुळे मुंबईकरांच्या हिताआड येणाऱया प्रस्तावाला शिवसेनेचा विरोधच राहील, अशी भूमिका सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी मांडली. झपाट्याने औद्योगिकीकरण होणाऱ्या या शहरात मोकळी मैदाने, उद्याने ही मुंबईची फुप्फुसे आहेत. त्यामुळे अशा जागांमधून जर मेट्रो जात असेल तर शिवसेना विरोध करेल, असेही नर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या