अंधेरीत इमारतीला भीषण आग, कांदिवलीत सिलिंडर स्फोट

327

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत आगीचे सत्र सुरूच असून बुधवारी रात्री उशिरा कांदिवलीत झालेल्या सिलिंडर स्फोटात नऊ जण जखमी झाले, तर आज अंधेरीतील रोल्टा कंपनीच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने अंधेरीत आग लागलेली इमारत रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला.

अंधेरीत आग लागलेली ‘एमआयडीसी’ परिसरातील ही इमारत बंद स्थितीत होती. मात्र सकाळी 11 वाजून 26 मिनिटांनी या इमारतीत अचानक आगीचा भडका उडाला. ही इमारत ग्लास फसाड असल्याने आग वरच्या मजल्यांवर वेगाने पसरत गेली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. इमारतीमधील इलेक्ट्रिक साहित्य, वायर, संगणक, एसी, फाइल्स आणि लाकडी सामान असल्याने आग आणखीनच भडकत गेली. त्यामुळे काही वेळातच ‘लेव्हल-4’ची मोठी आग असल्याचे अग्निशमन दलाकडून जाहीर करण्यात आले. इमारतीला असलेल्या काचांमुळे संपूर्ण चारही मजले आगीने वेढले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला कसरत करावी लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 11 फायर इंजिन, 9 जंबो टँकर आणि आवश्यक साधनसामग्रीचा वापर करण्यात आला. दरम्यान, इमारतीमधील काही साहित्य पुन्हा पेट घेत असल्याने रात्री 7 वाजेपर्यंत आग वारंवार भडकत होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला काचा फोडून पाण्याचा फवारा करावा लागला. दरम्यान, रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी कूलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

…तर कारवाई होणार
सुदैवाने अंधेरीच्या आगीतील इमारत बंद असल्याने जीवितहानी टळली. मात्र आगीचा भडका नेमका कशामुळे उडाला याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी खेळती हवा किंवा आपत्कालीन स्थितीसाठी मोकळी जागा नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोठी अडचण आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित कंपनीच्या परवान्यांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले असून दोषी आढळल्यास निश्चितच कठोर कारवाई होणार असल्याची माहिती अग्निशमन दलप्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दिली.

कांदिवलीच्या स्फोटात नऊ जखमी
कांदिवली पूर्वेकडील जानुपाडय़ातील गवारे चाळीतील कानडे कुटुंबाच्या घरात बुधकारी रात्री 11.30 वाजता सिलिंडर स्फोट झाला. या स्फोटात शेजाऱयांसह नऊ जण जखमी झाले. जखमींमध्ये शारदा कानडे, संदीप कानडे, ओंकार चिके, मेहुल सुरती, दिक्यांनी सुरती, जयेश सुतार, दिवेश पटेल, राजेश दुबला, निशांत पांचाळ यांचा समावेश आहे. जखमींवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील पाच जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून इतरांवर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या