गोखले ब्रीज बांधण्यासाठी तीन कंपन्यांमध्ये स्पर्धा; पालिका 15 दिवसांत निर्णय घेणार, 84.72 कोटींचा खर्च

अंधेरी येथील धोकादायक गोखले ब्रीज बांधण्यासाठी पालिकेने मागवलेल्या जाहिरातीला उत्तम प्रतिसाद मिळाला असून आता तीन कंपन्यांमध्ये अंतिम स्पर्धा होणार आहे. पालिकेने जाहीर निविदेला प्रतिसाद देताना कंत्राटदारांनी पालिकेच्या अंदाजित 84.72 कोटी खर्चाच्या तुलनेत सुमारे 12 टक्के कमी दराने निविदा सादर केली आहे. या निविदांची पडताळणी होऊन 15 दिवसांत कंत्राटदार अंतिम केले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आली.

1975 मध्ये बांधण्यात आलेला गोखले ब्रीज 3 जुलै 2018 मध्ये कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून हा पूल आता नव्याने बांधण्यात येत आहे. यामध्ये पालिकेच्या हद्दीमधील पुलाचे काम एप्रिलपासून सुरू झाले असून आतापर्यंत 90 टक्के काम पूर्णही झाले आहे. तर रेल्वेच्या हद्दीमधील धोकादायक पूल रेल्वेकडून पाडण्यात आल्यानंतर पालिका या ठिकाणी गर्डर बसवण्याचे काम करणार आहे. धोकादायक झालेला गोखले ब्रीज 7 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा महत्त्वाचा पूल बंद असल्याने परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे गोखले पूल लवकरात लवकर बांधण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे.

पुलाचे काम जानेवारीअखेरपासून सुरू करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. काम सुरू झाल्यास किमान मे 2023 पर्यंत किमान ‘फेज – 1’ सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर ‘फेज-2’ सप्टेंबर 2023 मध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ब्रीजला एकूण चार लेन आहेत.

या कंपन्यांमध्ये स्पर्धा
ए.बी. इन्फ्राबिल्ड लि. – 74.56 कोटींचा दर सादर
साई प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लि. – 82.10 कोटींचा दर
श्री मंगलम बिल्डकॉन प्रायव्हेट लि. – 83.73 कोटींचा दर