अंधेरी स्थानकातील फेरीवाल्यांना हटवा! हायकोर्टाचे पालिकेला आदेश

अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर अनधिकृतपणे आपला व्यवसाय थाटणाऱया फेरीवाल्यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. स्थानकाबाहेरील सदर फेरीवाल्यांवर कारवाई करा असे आदेश मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्या खंडपीठाने पालिका प्रशासनाला दिले. एवढेच नव्हे तर हे फेरीवाले या ठिकाणी पुन्हा आपला व्यवसाय थाटू शकणार नाहीत याची काळजी घ्या, असेही बजावले.

अंधेरी पश्चिम गावदेवी दुर्गामाता येथील रस्त्यालगत अनेक फेरीवाले बसत असून याचा त्रास पादचाऱयांसह वाहनचालकांना होत आहे. या फेरीवाल्यांबाबत तक्रार केल्यानंतर पालिका प्रशासनाने अनेकदा त्यांच्यावर कारवाई केली परंतु पुन्हा हे फेरीवाले आपला व्यवसाय थाटत आहेत. या फेरीवाल्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा म्हणून नाओशेरवन मोहम्मद युसूफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन पालिका प्रशासनाला फटकारले. तसेच या फेरीवाल्यांवर तत्काळ कारवाई करा असे आदेश प्रशासनाला दिले व याचिका निकाली काढली.

आपली प्रतिक्रिया द्या