धक्कादायक…एका मुलीच्या उपचारासाठी दुसऱ्या मुलीला 10 हजारात विकले!

sad-girl

पालक आपल्या सर्व मुलांवर एकसारखे प्रेम करतात. त्यात कोणताही भेदभाव नसतो. मुलांसाठी आईवडिल अनेक खस्ताही खातात. मात्र, परिस्थितीमुळे आईवडिलांना आपल्या पोटच्या मुलीला विकण्याची वेळ आली आहे. एका मुलीवर उपचार करण्यासाठी आईवडिलांनी दुसऱ्या मुलीला विकल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

आंध्र प्रदेशात नेल्लोरमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या एका जोडप्याने 16 वर्षांच्या आपल्या मुलीचे उपचार करण्यासाठी आपल्या 12 वर्षांच्या दुसऱ्या मुलीला अवघ्या 10 हजारात विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या जोडप्याच्या 16 वर्षांच्या मुलीला श्वसनाशी संबंधित विकार आहे. त्याचे उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी 12 वर्षांच्या मुलीला विकण्याचा निर्णय घेतला.

मोठ्या मुलीवर उपचार करण्यासाठी त्यांनी 12 वर्षांच्या मुलीला 10 हजारात चिन्ना सुबय्या नावाच्या व्यक्तीला विकले. त्याने बुधवारी या अल्पवयीन मुलीशी लग्नही केले. या घटनेची माहिती महिला आणि बालकल्याण विभागाला मिळताच त्यांनी त्या मुलीची सुटका केली आहे. तिला चाइल्ड केअकमध्ये दाखल करण्यात आले असून तिचे समुपदेशन करण्यात येत आहे.

कौटुंबीक वादविवादामुळे सुबय्या पहिल्या पत्नीपासून वेगळा राहतो. सुबय्याने पीडित मुलीच्या आईवडिलांना मोठ्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तिच्यावर उपचार करायचे असल्याने त्यांनी त्याला नकार देत दुसऱ्या मुलीला विकण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याने त्या मुलीला विकत घेत त्याने तिच्याशी लग्न केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

लग्नानंतर सुबय्या मुलीला धामपूरमधील आपल्या नातेवाईकांकडे घेऊन आला. शेजाऱ्यांनी मुलीच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर त्यांनी चैकशी केली असता ही घटना उघडकीस आली. त्यांनी गावातील सरपंचांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुलीची सुटका केली आहे. या प्रकरणी सुबय्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या