आंध्रात बोट उलटून 12 ठार; 23 जणांना वाचवण्यात यश

289

आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीत एक बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. बोटीमध्ये 61 प्रवासी होते असे सांगण्यात आले. एनडीआरएफच्या 30 सदस्यांची दोन पथके घटनास्थळी बचावकार्य करीत आहेत. बोटीतील 23 जणांना आतापर्यंत नदीतून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या बोटीला लायसन्स नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी जिह्यातील सर्वच उपलब्ध मंत्र्यांना घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिले असून डीजीपी गौतम सवांग आणि मुख्य सचिव एल. व्ही. सुब्रह्मण्यम यांना बचावकार्याची बारकाईने पाहणी करायला सांगितले आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातलगांना 10 लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे. गोदावरी नदीला काही दिवसांत मोठा पूर आला आहे. त्यामुळेच ही बोट कच्चुलुरू येथे उलटली.

बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आदेश दिल्यानंतर पोलीस प्रमुखांनी नौदल अधिकाऱ्यांकडे बचावकार्यासाठी एका हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. रेड्डी यांच्या आदेशानंतर मुख्य सचिव एल. व्ही. सुब्रह्मण्यम यांनी पूर्व गोदावरी येथील जिल्हा आयुक्त मुरलीधर रेड्डी यांच्याशी बचावकार्याबाबत चर्चा केली असून परिस्थितीची माहिती घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या