आत्महत्या करण्यासाठी तरुण रुळांवर झोपला, मोटरमनने वाचवला जीव

787

आत्महत्या करण्यासाठी रुळांवर झोपलेल्या तरुणाला एका मोटरमनने प्रसंगावधान राखून वाचवलं आहे. आंध्र प्रदेशच्या विजयनगर इथे ही घटना घडली. या मोटरमनचं सर्वत्र कौतुक होत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्रप्रदेशच्या विजयनगरम येथील कोरुकोंडा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. इथून एक मोटरमन काही रिकाम्या बोग्यांच्या रेल्वेसह विशाखापट्टणमपासून विजयनगरम येथे जात होता. त्यावेळी त्याला अचानक काही अंतरावर एक तरुण रुळांवर झोपलेला दिसला. त्यावेळी गाडीचा वेग पाहता ते अंतर फार नव्हतं. त्याने जोरात हॉर्न वाजवून त्याला तिथून हटण्याचा इशाराही दिला. मात्र, तरूण तसाच रुळावर पडून राहिला.

त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रसंगावधान राखत मोटरमनने आपत्कालीन ब्रेक दाबला. गाडी वेगात असल्याने तरुण जिथे होता त्याच्या अगदी जवळ जाऊन थांबली. गाडी थांबल्यानंतर तत्काळ मोटरमनने गाडीतून बाहेर उडी टाकली आणि तरुणाला रुळावरून बाजूला केलं. लोको पायलटने या घटनेची माहिती स्टेशन मास्तर आणि रेल्वे अधिकाऱ्यांना कळवली. स्टेशन मास्तरांनी तरुणाला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं आणि त्याच्या कुटुंबीयांना बोलवून त्यांच्यासोबत पाठवून दिलं. या घटनेनंतर मोटरमनच्या प्रसंगावधानाचं कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या