वर्ल्डकप 2019 : वेस्ट इंडीजला मोठा धक्का, रसेल वर्ल्डकपमधून बाहेर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत दुखापतींचे सत्र सुरुच आहे. दक्षिण आफ्रिका, हिंदुस्थाननंतर आता वेस्ट इंडीजला मोठा धक्का बसला आहे. इंडीजचा विस्फोटक खेळाडू आंद्रे रसेल दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. आंद्रे रसेलच्या जागी सुनील आंब्रिसला संघात स्थान देण्यात आले आहे.

वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीजचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहेत. आगामी दोन ते तीन लढतींमध्ये विजय मिळवून शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या वेस्ट इंडीजला सोमवारी धक्का बसला. अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आगामी लढतींना मुकणार आहे. रसेलची दुखापत गंभीर असल्याने वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या चुरशीच्या लढतीतही रसेल खेळला नव्हता. तर बांग्लादेशविरुद्धच्या लढतीत रसेलचे दुखापतीमुळे आत-बाहेर चालू होते.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रसेलने तीन डावात फलंदाजी करताना 12 च्या सरासरीने फक्त 36 धावा केल्या आहेत, तर चार लढतीत 5 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये रसेलने दमदार प्रदर्शन केले होते. परंतु वर्ल्डकपमध्ये तो त्या प्रदर्शनाची पुनरावृत्ती करू शकला नाही.

वर्ल्डकपमधून आतापर्यंत दुखापतीमुळे बाहेर झालेले खेळाडू –

  1. शिखर धवन – हिंदुस्थान
  2. डेल स्टेन – दक्षिण आफ्रिका
  3. आंद्रे रसेल – वेस्ट इंडीज