अयोध्येत एन्काऊन्टर, महिला पोलिसावर हल्ला करणाऱ्या अनीसला ठार मारला

सरयू एक्सप्रेसमध्ये (Saryu Express )महिला पोलिसावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या अनीसला पोलिसांनी ठार मारलं आहे. पोलीस आणि विशेष तपास पथकाने अयोध्येत अनीसचा एन्काऊन्टर केला आहे. पूरा कलंदर भागात अनीस आणि पोलिसांत चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनीसने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनीही गोळीबाराला सुरूवात केली ज्यात अनीस ठार झाला.

अनीसचे दोन साथीदार अयोध्येतील इनायतनगर इथे झालेल्या चकमकीनंतर अटक करण्यात आले आहेत. अनीसचे अन्य दोन साथीदार आझाद आणि विश्वंभर दयाल उर्फ लल्लू हे चकमकीत जखमी झाले आहेत. एन्काऊन्टरमध्ये ठार मारण्यात आलेला अनीस हा सरयू एक्सप्रेसमधील महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत अश्लील वर्तन करत होता. या महिला पोलीस हवालदाराने अनीसला झापलं होतं, याचा राग आल्याने अनीस आणि त्याच्या दोन साथीदारांनी या महिला पोलिसावर हल्ला केला होता. या महिलेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यात वार करण्यात आले होते. महिला पोलीस कर्मचारी बेशुद्ध पडल्यानंतर ती मेली आहे असं समजून अनीस आणि त्याच्या साथीरादांनी तिला बर्थखाली ढकलून दिलं होतं. रक्तबंबाळ अवस्थेतील या महिला पोलीस कर्मचाऱ्याला अन्य प्रवाशांनी पाहिल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. रेल्वे पोलिसांनी या महिला पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. या महिलेची प्रकृती सुधारत असल्याचे कळते आहे.

सीटवर बसण्यावरून अनीस आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला होता असे कळते आहे. 30 ऑगस्ट रोजी मनकापूरहून अयोध्येला येत असताना हा प्रकार घडला होता. या हल्ल्यानंतर पोलिसांनी अनीस आणि त्याच्या साथीदारांची माहिती देणाऱ्याला 1 लाखाचे इनाम जाहीर केले होते. सदर प्रकरणाची अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी रात्री झाली होती आणि मुख्य न्यायमूर्तींनी त्यांच्या घरीच याबाबतची सुनावणी घेतली होती. मुख्य न्यायमूर्तींनी उत्तर प्रदेश सरकार आणि रेल्वे प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले होते.