विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा उदो उदो सुरू असताना अनेक वर्षांपासून अगदी थोडक्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुन्हा न्यायासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अंगणवाडी कर्मचारी 21 ऑगस्ट रोजी मंत्रालयावर मोर्चा घेऊन धडकणार आहेत.
एकीकडे लाडकी बहीण योजनेद्वारा सरकार स्वतःची पाठ थोपटून घेतंय, तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या सर्वच मागण्यांसाठी आणि मानधन वाढीच्या मागणीसाठी 21 ऑगस्ट रोजी मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या महाराष्ट्र अध्यक्षा ॲड. निशा शिवरकर यांनी दिली.
महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करीत आहेत. 15 जुलैपासून कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सुरू केलेले आहे. या आंदोलनामुळे अंगणवाडी कर्मचारी यांनी शासकीय बैठका, अहवाल देणे इत्यादी कामांवर बहिष्कार टाकला आहे. 12 ऑगस्ट पासून मुंबईला आझाद मैदानावर कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे.
अंगणवाडी सेविकांच्या कष्टाची जाणीव शासनाला नाही. मंत्री महोदय केवळ तोंड देखत कौतुक करत आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी द्यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मिंधे सरकारनेही हे कबूल केले, मात्र ग्रॅच्युइटी देण्याचे टाळत आहे. यामुळेही अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मानधन वाढ मिळावी, दरमहा पेन्शन मिळावे, ग्रॅच्युईटी मिळावी लाभार्थींना मिळणाऱ्या आहाराच्या रकमेत वाढ व्हावी इत्यादी मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने 21 ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा आयोजित केला आहे.