अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ‘करीब करीब’ वाढ

अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवणार, अशी घोषणा करत असताना महिला आणि बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘करीब करीब’ हा निर्णय झाल्याचे सांगितले. यामुळे विरोधकांसोबतच सत्ताधारीही चक्रावले होते. मंत्र्यांनी सभागृहामध्ये कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना ‘करणार’ अथवा ‘नाही करणार’ अशा स्पष्ट भाषेत उत्तर देणे अपेक्षित असते. मात्र मंत्री लोढा यांनी गोंधळात टाकणारे उत्तर दिल्याने ही वाढ होणार की नाही होणार याबाबत काहीच स्पष्टता येत नव्हती. विरोधकांनी ‘करीब करीब’वर आक्षेप घेत नक्की भूमिका काय आहे ते जाहीर करा अशी मागणी केली.

मंत्री लोढा यांनी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की , अंगणवाडी सेविकांच्या मानधनात आमच्या विभागाने 10 टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत ‘करीब करीब’ असं ठरलंय की ही वाढ 20 टक्क्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच अंगणवाडी सेविकांसाठी नवे मोबाईल विकत घेण्याचा निर्णयही ‘करीब करीब’ झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी, करीब-करीबला काय अर्थ आहे? असं कधीच उत्तर असत नाही. एकतर हो म्हणा किंवा नाही म्हणा, असं म्हणत उत्तरात स्पष्टता आणण्यास सांगितले. यावर मंत्री लोढा यांनी अर्थसंकल्पाचे कारण पुढे करत म्हटले की, चार दिवसानंतर अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे त्यातले आकडे मी मर्यादा पाळून सांगतो आहे. यावरून गोंधळ वाढताना पाहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘करीब करीब म्हणजे विचाराधीन आहे आणि लवकर निर्णय होणार’ असा अर्थ असल्याचे सांगत कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न केला.