ठोकशाही कराल तर दांडके मोडू! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

39

सामना प्रतिनिधी, मुंबई

लोकशाहीच्या नावाखाली ठोकशाही करत असाल तर तुमचे दांडके मोडून काढू, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारला ठणकावले. बुलेट ट्रेन आणि समृद्धी महामार्गाची स्वप्ने पाहणाऱयांनी सर्वसामान्यांची मात्र झोप उडवली आहे असे सांगतानाच असा झोप उडवणारा विकास काय कामाचा, असा परखड सवालही त्यांनी केला.

मानधनवाढीसाठी गेले १७ दिवस राज्यव्यापी आंदोलन करणाऱया अंगणवाडी सेविकांची उद्धव ठाकरे यांनी आज आझाद मैदानात भेट घेतली. यावेळी हजारो अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात घोषणा देऊन आझाद मैदान दुमदुमवून टाकले. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाची दखल न घेणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरे यांनी यावेळी तोड डागली. सरकार तुमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही निश्चयाने संप सुरू ठेवा, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी अंगणवाडी सेविकांना दिला.

पाहा खास फोटो गॅलरी

आपण इथे नेतृत्व करायला नाही, तर नेतृत्वाला ताकद द्यायला आलो आहोत असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी आपण सरकारला नमवू शकतो अशा आत्मविश्वासाने लढा असा सल्ला अंगणवाडी सेविकांना दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्या वेदना मी पाहिलेल्या आहेत. कुपोषित बालकांना अन्न देऊन तुम्ही त्यांच्या आई होता. लाखो मुलांच्या आरोग्याची काळजी घेता. तुम्ही त्यांच्या माता आहात. सरकार दोन बहिणींमध्ये वाद निर्माण करू पाहत आहे, पण तुम्ही एकजुटीने उभ्या राहा. अंगणवाडी सेविकांची ताकद प्रचंड आहे. सर्वसामान्यांची ताकद काय असते हे इतिहासाने दाखवून दिले आहे. पण जर या सरकारला ते पाहायचे असेल तर त्या इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

आमची मनं मेलेली नाहीत
राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. सरकार झोपलेले असले तरी शिवसेना आणि शिवसेनेचे मंत्री मात्र झोपलेले नाहीत. आमची मनं मेलेली नाहीत. आम्ही संवेदनशील आहोत म्हणून तुमच्यासोबत आहोत. आंदोलनात झेंडा कुठलाही असो, पोटातली आग एकच आहे. मुख्यमंत्रीसाहेब इकडे प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका. तुम्ही लाडू द्या नाही तर चिक्की द्या! (प्रचंड हशा) कोणतंही टेंडर पास करा, पण मुलांना भुकेले राहू देऊ नका. कारण हा प्रश्न सुटला नाही तर देशाची भावी आधारस्तंभ असलेली मुले मृत्युमुखी पडतील असे उद्धव ठाकरे म्हणाले.

वेडा झालेला विकास परवडेल का?
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री बुलेट ट्रेन आणि समृद्धी महामार्गाची स्वप्ने पाहताहेत. पण स्वप्नं पाहण्यासाठी झोपावे लागते. या अंगणवाडी सेविकांची झोप तुम्ही उडवली आहे. सर्वसामान्यांची झोप उडवणारा विकास काय कामाचा, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ते पुढे म्हणाले, विकास कुठेय शोधत राहुल गांधी फिरताहेत. असे म्हणतात विकास वेडा झालाय. पण हा वेडा झालेला विकास देशाला, राज्याला परवडणार आहे काय, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

वीज जोडण्या करायच्या आणि माणसे तोडायची हे कसले सौभाग्य!
मुलांना जगवणाऱ्या माता जगायला हव्यात. नुसती वीज जोडणी दिली म्हणजे सौभाग्य नव्हे. माणसं जोडा, त्यांना जपा. नुसत्याच वीज जोडण्या करतोय आणि माणसं तोडतोय. चार रुपये ९० पैशांत काय येतंय? अंगणवाडी सेविकांच्या चुली विझल्या तर काय करणार? त्यांचं सौभाग्य कसं टिकणार? फक्त वीज वाटण्याच्या बाता करण्यापेक्षा सौभाग्य टिकवण्यासाठी काही करा, असा संतप्त टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.

उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है!
राज्यभरातून आलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनासाठी उभारण्यात आलेला आझाद मैदानातील मंडपही अपुरा पडत होता. प्रचंड उन्हात त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच या अंगणवाडी सेविकांमध्ये उत्साह संचारला. ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी एकच घेषणबाजी अंगणवाडी सेविकांनी केली. ‘मानधन नको, वेतन हवे’, ‘शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा या अंगणवाडी सेविकांनी दिल्या. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱहे, विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब, उपनेत्या मीना कांबळी, प्रवक्ते अरविंद भोसले यांच्यासह अंगणवाडी सेविका कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

मातांचे शाप भोकतील!
फक्त निवडणुकीपुरतेच सरकारला शिवाजी महाराज आठवतात, मात्र शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील स्त्रियांचा सन्मान ठेवला होता, त्या मातांचा आशीर्वाद घेतला. तो आदर्श हे सरकार ठेवत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. उत्तर प्रदेशात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यानं बालकांचा मृत्यू झाला. हे पाप कुणाचं, असा सवाल करतानाच अंगणवाडीत जी मुलं येतात त्यांची स्थितीही फार चांगली नसून अनेक बालकं आणि त्यांच्या माताही कुपोषित असतात याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. त्या मुलांना सांभाळण्याचं काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचेच हाल जर सरकार करणार असेल तर या मातांचे शाप तुम्हाला भोवतील, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यपालांना भेटणार
अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी जी पावले उचलली जातील, जी दिशा ठरवली जाईल त्यावेळी शिवसैनिक त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत राहील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. यावेळी अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना भेटण्याची इच्छा सदस्यांनी व्यक्त केली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांना त्यांच्यासोबत जाऊन राज्यपालांची भेट घेण्याचे निर्देश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या