कोथळे हत्या प्रकरणी पोलीस अधीक्षकाची बदली

सामना ऑनलाईन । सांगली

पोलिसांच्या मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि शहराच्या उपधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची बदली करण्यात आली आहे. दत्तात्रय शिंदे यांची बदली राज्य राखीव पोलिस दलाच्या (नागपूर) समादेशकपदी करण्यात आली असून डॉ. दीपाली काळे यांची बदली उपायुक्‍त (सोलापूर शहर) या पदावर करण्यात आली आहे.

चोरीच्या आरोपात अटक केलेल्या अनिकेत कोथळेचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी परस्पर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. अनिकेत कोथळेच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सांगली पोलिसांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. हत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे.

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात सीआयडीने डॉ. दीपाली काळे यांची चार तास चौकशी केली होती. या सर्व प्रकाराला अधीक्षक दत्तात्रय शिंदे जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत होता.

आपली प्रतिक्रिया द्या