अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी सुरू – आंबोली दरीत मृतदेह जाळला; न्यायाधीश बुधवंत यांची साक्ष

अनिकेत कोथळे खून प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरू झाली. अनिकेत कोथळे याचा मृतदेह हा आंबोली येथील 128 फूट खोल दरीत नेऊन जाळल्याची साक्ष इन्क्वेस्ट पंचनामा करणारे वरिष्ठ स्तर न्यायाधीश मनोजकुमार बुधवंत यांनी न्यायालयात दिली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सरकार पक्षातर्फे काम पाहात आहेत.

6 नोव्हेंबर 2017 रोजी मोबाईल चोरी व लुटमारीच्या संशयावरून अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेत कोठडीत ठेवले होते. त्यावेळी अनिकेतला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. दुसऱया दिवशी त्याचा मृतदेह आंबोली येथे नेऊन जाळण्यात आला होता. संपूर्ण राज्यात हे प्रकरण गाजले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यापुढे सुनावणीस प्रारंभ झाला. अनिकेत कोथळे खून खटल्यात अनिकेतच्या जळालेल्या मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा करणारे वरिष्ठ स्तर न्या. मनोजकुमार बुधवंत यांची तसेच अनिकेतच्या जळालेल्या हाडांचे सॅम्पल डीएनए चाचणीसाठी नेणाऱया पोलीस निरीक्षक ज्योती आमणे यांची साक्ष झाली. या खून खटल्यात संशयित अरुण लाड याने पोलिसांना आंबोलीतील अनिकेतला जाळलेले घटनास्थळ दाखवले होते. त्या ठिकाणी अनिकेतच्या प्रेताची जळालेली हाडे, राख मिळून आले होते.

न्या. बुधवंत यांनी अनिकेतच्या जळालेल्या प्रेताचा इन्क्वेस्ट पंचनामा केला होता. यात साक्षीदरम्यान न्या. बुधवंत यांनी 128 फूट खोल दरीत अनिकेतचे प्रेत जाळले होते असे सांगितले. तर, अनिकेतच्या जळालेल्या हाडांचे डीएनए सॅम्पल्स पुणे येथील लॅबमध्ये नेणाऱया पोलीस निरीक्षक ज्योती आमणे यांची महत्त्वपूर्ण साक्ष झाली. हे सॅम्पल्स आमणे यांनी पोहोचवले नाही, असे बचाव पक्षाचे म्हणणे होते. दोन्ही साक्षीचा सरतपास व उलटतपास आज पूर्ण झाला. यादरम्यान सरकार पक्ष व बचाव पक्षात वेळोवेळी खडाजंगी झाली. खटल्याची सुनावणी पुढे चालणार आहे. यावेळी जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, सीआयडीचे तत्कालीन उपअधीक्षक व तपासाधिकारी मुकुंद कुलकर्णी, सीआयडीच्या उपअधीक्षक आरिफा मुल्ला यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.