अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण : अनिक्षा जयसिंघानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिक्षा जयसिंघानीला शुक्रवारी सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालय येत्या सोमवारी तिच्या जामीन अर्जावर सुनावणी करणार आहे.

बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाला याआधी सुनावलेल्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे शुक्रवारी दुपारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अजय मिसार यांनी अनिक्षाची आणखी तीन दिवस कोठडी हवी असल्याचे सांगितले. या प्रकरणात साक्षीदार आणि आरोपीची समोरासमोर चौकशी करायची आहे. व्हिडीओग्राफीसाठी वापरलेला मोबाईल, बॅग तसेच रोख रकमेची वसुली या सर्व बाबींचा सखोल तपास करायचा आहे, असे म्हणणे अॅड. मिसार यांनी मांडले. त्यावर अनिक्षाच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला. तपासात पूर्णपणे सहकार्य केले असताना कोठडीत वाढ कशासाठी? कोणत्याही महिलेचा जबाब नोंदवण्यासाठी कोठडीची गरज नाही, असा दावा अनिक्षाचे वकील मनन संघाई यांनी केला. दोन्ही युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायाधीश आलमाले यांनी पोलीस कोठडीत वाढ देण्यास नकार दिला आणि अनिक्षाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.