मराठी, मुस्लिम कष्टकरी मतदारांच्या विश्वासामुळे अनिल देसाईंचा मार्ग सुकर; 53 हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्यावर मराठी, मुस्लिम, मध्यमवर्गीय आणि धारावीतील कष्टकरी मतदारांनी विश्वास दाखवला. त्यामुळे मतमोजणीत अनिल देसाई यांनी घेतलेली आघाडी अगदी शेवटच्या म्हणजे 21 व्या फेरीपर्यंत कायम राहिली आणि अनिल देसाई तब्बल 53 हजार 384 मताधिक्याने येत त्यांनी शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांचा दणकून पराभव केला.

या मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फेरीत राहुल शेवाळे यांनी आघाडी घेतली. नंतर पुढच्या चार फेऱयांमध्ये अनिल देसाई पुढे राहिले. मात्र पाचव्या फेरीत पुन्हा राहुल शेवाळे यांनी आघाडी घेतली. पण त्याच्या पुढच्या फेऱयामध्ये अनिल देसाई यांनी पुन्हा आघाडी घेतली. अठराव्या फेरीनंतर अनिल देसाई यांनी घेतलेली पन्नास हजार मतांची आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. धारावीतील कष्टकरी मतदारांपासून अणुशक्तीनगरमधील मुस्लिम मतदारांनी अनिल देसाई यांना भरभरून मते दिली आणि विजयाचा मार्ग सुकर केला. विजयी होताच शिवडीच्या गाडी अड्डय़ाचा संपूर्ण परिसर भगवामय झाला. शिवसैनिकांनी गुलाल उधळत विजयोत्सव साजरा केला.

गद्दारीला मतदारांनी उत्तर दिले
या विजयानंतर अनिल देसाई यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, ही विजय म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर मतदारांनी ठेवलेला हा विश्वास आहे. मुंबई व शिवसेना हे समीकरण गेल्या कित्येक दशकांपासून आहे. मुंबई महानगरपालिकेवर चांगले काम करण्याची संधी नेहमी मुंबईकरांनी शिवसेनेला दिलेली आहे. त्याचे सार्थक उद्धव ठाकरे यांनी केले. मतदारांना परिवर्तन हवे होते. त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. मतदारांनी आम्हाला साथ दिली. मतदार सुजाण आहेत. शिवसेना पक्ष कोणाचा याचा निर्णय पेंद्रीय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात निकाल लागला नाही, पण जनतेच्या कोर्टात निकाल लागला आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष पह्डून उद्धव ठाकरेंशी ज्याप्रमाणे गद्दारी केली होती त्या गद्दारीला मतदारांनी उत्तर दिले आहे. मुंबईच्या लोकांच्या मनात काय होते ते आज त्यांनी मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिले.

राहुल शेवाळे फिरकलेच नाहीत
सलग दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले राहुल शेवाळे यांना मतदारांनी तिसऱयांदा मात्र नाकारले आहे. मतमोजणीतील पिछाडी सुरुवातीपासूनच दिसल्यामुळे राहुल शेवाळे हे शिवडीतील मतमोजणी पेंद्राकडे दिवसभर फिरकलेच नाहीत.