माजी गृहमंत्र्यांवरील आरोपामुळे मुंबई पोलिसांची बदनामी! अनिल देशमुखांचा हायकोर्टात दावा

परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या आरोपामुळे मुंबई पोलिसांची बदनामीच नव्हे तर पोलीस दलात प्रचंड निराशा पसरली आहे. एवढेच काय तर सीबीआयने देशमुखांविरुद्ध सबळ पुरावे नसताना प्राथमिक चौकशीच्या नावाखाली थेट एफआयआर दाखल करून त्यांना गुन्हेगार ठरवले आहे, असा दावा अनिल देशमुख यांच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची सीबीआयमार्फत आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी परमबीर यांनी याचिकेद्वारे केली होती. हायकोर्टाने या याचिकेची दखल घेत सीबीआयला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. असे असताना सीबीआयने देशमुख यांच्या निवासस्थानी छापा टाकून त्यांची नागपूर येथे चौकशी केली व त्यांच्याविरुद्ध थेट गुन्हाही दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. देशमुख यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी खंडपीठाला सांगितले की, हायकोर्टाने डॉ. जयश्री पाटील यांच्या तक्रारीवरून केवळ प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते व त्यात काही तथ्य आढळून आल्यास कायद्यानुसार पुढील कारवाई करणे गरजेचे होते. तत्पूर्वी सरकारची परवानगी घेणेही बंधनकारक होते, परंतु सीबीआयने तसे न करता थेट गुन्हाच दाखल केला. चौकशीला विरोध नाही, पण आपले पूर्ण म्हणणे सीबीआयने ऐकूनच घेतले नाही.& पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या व नेमणुका हा राज्य सरकारच्या धोरणाचा एक भाग आहे. त्यातही सीबीआयला हस्तक्षेप करायचा आहे. त्यावर न्यायालयाने सुनावणी 2 जुलैपर्यंत तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या