अनिल देशमुख यांचा महाराष्ट्र दौरा खुला, सत्र न्यायालयाची परवानगी

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईबाहेर जाण्यास परवानगी देत सोमवारी सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशाला अनुसरून नागपूरला जाण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयाकडे रीतसर परवानगी मागितली होती. त्यांच्या अर्जाचा स्वीकार करीत ईडी आणि सीबीआयच्या दोन्ही विशेष न्यायालयांनी देशमुख यांना पुढील चार आठवडय़ांसाठी नागपूरसह महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे देशमुख हे सव्वा वर्षांनंतर स्वतःच्या नागपूर मतदारसंघात जाणार आहेत.

100 कोटींच्या कथित खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना वर्षभर दक्षिण मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात राहावे लागले. ईडीने आर्थिक अफरातफरीच्या आरोपाखाली नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना अटक केली होती, तर सीबीआयने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अटक केली होती. दोन्ही प्रकरणांत उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर 28 डिसेंबरला देशमुख यांची तुरुंगातून सुटका झाली. उच्च न्यायालयाने जामीन देताना त्यांना सत्र न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली होती. त्या अनुषंगाने देशमुख यांच्या वतीने ऍड. इंद्रपाल सिंग यांनी सत्र न्यायालयात रीतसर अर्ज केला आणि नागपूरला जाण्यास परवानगी मागितली. त्यांच्या अर्जावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या वतीने विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी आक्षेप घेतला. देशमुख यांच्याविरोधातील गुह्यांचा तपास सुरू असल्याचे कारण पुढे करीत त्यांनी विरोध केला. अर्जावरील सुनावणीदरम्यान देशमुख यांच्यातर्फे ऍड. सिंग यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर विशेष ईडी न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे आणि विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी देशमुख यांना पुढील चार आठवडयांसाठी मुंबईबाहेर जाण्यास परवानगी दिली.