राहुल द्रविड होणार हिंदुस्थानचा प्रशिक्षक?

43

सामना ऑनलाईन । मुंबई

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी माजी कर्णधार राहुल द्रविडची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. कोहली ब्रिगेडचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे याची ‘टीम डायरेक्टर’ पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या संदर्भातला निर्णय एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने हिंदुस्थानच्या क्रिकेट नियामक मंडळाचे नियंत्रण एका प्रशासक समितीकडे सोपवले आहे. या समितीने बंगळुरू येथील हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया कसोटी संपल्यानंतर कुंबळेशी काही विषयांवर चर्चा केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पुरुष आणि महिला संघ तसेच ज्युनिअर पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणारे सर्व पुरुष आणि महिला संघ यांच्याविषयी एक सविस्तर अहवाल मागितला आहे. हा अहवाल आल्यानंतर एप्रिल महिन्यात प्रशासकीय समिती माजी कर्णधार सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्याशी चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर प्रशासकीय समिती देशातील क्रिकेट प्रशिक्षणासाठी नव्याने आखणी करणार आहे. नव्या व्यवस्थेत कुंबळेची ‘टीम डायरेक्टर’ पदावर आणि राहुल द्रविडची प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या