पुणेकर अनिल मुंढेची मुंबईकर योगेश धोंगडेवर मात

58 व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुणेकर अनिल मुंढेने मुंबईकर योगेश धोंगडेवर अंतिम सामन्यात सरळ दोन सेटमध्ये 25-17, 24-11 अशी मात करत बाजी मारली. दादरच्या मध्य रेल्वे इन्स्टिटय़ुटच्या सहकार्याने पार पडलेल्या या स्पर्धेत फहिम काझीने रिझवान शेखचा पराभव करत तिसरे स्थान संपादले. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या काजल कुमारीने ठाण्याच्या मधुरा देवळेवर 25-0, 22-17 अशी मात करत जेतेपद पटकावले.

विविध गटात रंगलेल्या या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष वयस्कर गटात अंतिम सामन्यात मुंबईच्या बाबुलाल श्रीमलने विजेतेपद पटकविताना मुंबई उपनगरच्या शब्बीर खानवर 6-25, 20-5 व 25-13 असा विजय प्राप्त केला. या गटात सत्यनारायण दोंतुलने गिरीधर भोजचा 9-25, 11-10 व 25-21 असा पराभव करत तिसरा क्रमांक पटकावला. महिला वयस्कर गटात अंतिम फेरीत ठाण्याच्या मीनल लेले – खरेने मुंबई उपनगरच्या माधुरी तायशेटेचा 25-0, 20-16 असा पराभव केला. कोल्हापूरच्या शोभा कामतने तिसरे स्थान मिळवले.

विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा महाराष्ट्र कॅरमचे कार्याध्यक्ष भारत देसडला, मुंबई कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष धनंजय पवार तसेच सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट दादरचे उपाध्यक्ष विजय सावंत यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी यतीन ठाकूर, अरुण केदार, अजित सावंत, केतन चिखले, योगेश फणसळकर, संजय देसाई व संजय बर्वे हे उपस्थित होते.