कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱयांच्या वारसांना 50 लाखांची मदत द्या! परिवहन मंत्री अनिल परब यांची मागणी

कोरोना संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱयांच्या वारसांना राज्य सरकारने प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत  द्यावी, अशी मागणी परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

मार्च 2020 पासून कोरोना महामारीच्या काळात सरकारच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांची वाहतूक, लाखो परप्रांतीय मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सुखरूप पोहचवणे, हजारो विद्यार्थ्यांना परराज्यातून त्यांना सुखरूप घरी घेऊन येणे, हजारो ऊस तोडणी मजुरांना कारखान्यापासून त्यांच्या घरापर्यंत घेऊन जाणे, अत्यावश्यक आणि कृषिजन्य मालाची वाहतूक करणे, वैद्यकीय ऑक्सिजन आणण्यासाठी टँकरला चालक पुरविणे आदी अनेक कामांमध्ये धोका पत्करून एसटीच्या कर्मचाऱयांनी आपली सेवा बजावलेली आहे.

200 हून अधिक एसटी कर्मचाऱयांचा मृत्यू

कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, परिचारिका, पोलीस यांसारख्या कोरोना योद्धय़ांच्या खांद्याला खांदा लावून एसटीच्या कर्मचाऱयांनीही शर्थीचे प्रयत्न केले. दुर्दैवाने या काळात 200 पेक्षा अधिक कर्मचाऱयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच हजारो कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत. एसटी महामंडळाने सरकारच्या निर्देशानुसार कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱयांपैकी 11 कर्मचाऱयांच्या वारसांना 50 लाख रुपयांची मदत महामंडळाच्या आर्थिक निधीतून केली आहे. दुर्दैवाने इतर मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱयांना आर्थिक मदत करण्याची इच्छा असूनही महामंडळाच्या आर्थिक अडचणीमुळे मदत करणे शक्य होत नाही. त्यामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱयांना कोरोना योद्धय़ाचा दर्जा देऊन सरकारकडून 50 लाख रुपयांची त्यांच्या वारसांना मदत करण्यात यावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या