कोकणातील पर्यटन उद्ध्वस्त करण्याचे किरीट सोमय्यांचे पाप

दापोलीतील साई रिसॉर्टसंबंधी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या लुडबुडीचा शिवसेना नेते अनिल परब यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सोमय्या तोंडघशी पडले आहेत. न्यायालयाने कोकण किनारपट्टी परिसरातील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट, घरांचा तपशील मागवला आहे. त्यामुळे या बांधकामांवर कारवाई झाली तर कोकणातील पर्यटन उद्ध्वस्त करण्याचे पाप सोमय्या यांचे असेल, असा आरोप अनिल परब यांनी केला.

गेली अडीच वर्षे किरीट सोमय्या साई रिसॉर्ट बांधकामाबाबत खोटे आरोप करीत बसले. त्याआधारे ईडीने कारवाई करीत सदानंद कदम यांना अटक केली. कदम 11 महिने तुरुंगात होते, मात्र सर्वोच्च न्यायालयात ईडीने शरणागती पत्करली. त्यामुळे कदम यांना 11 महिने तुरुंगात का ठेवले? हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे अनिल परब म्हणाले. साई रिसॉर्टच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली होती त्यापेक्षा अतिरिक्त बांधकाम असेल तर ते स्वखर्चाने पाडण्याची तयारी कदम यांनी दर्शवली आहे. याची नोंद घेताना न्यायालयाने साई रिसॉर्टवर सरकारने केलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचे निरीक्षण नोंदवले आणि यंत्रणांच्या गैरवापरावर टिप्पणी केली. याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड परिसरातील सीआरझेड नियमावलीचे उल्लंघन झालेल्या प्रकरणांचा तपशील मागवला आहे. जर या रिसॉर्टवर कारवाई करणार असाल, तर सर्व रिसॉर्टवर कारवाई झाली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. किरीट सोमय्याच्या तक्रारीमुळे कोकण किनारपट्टी भागातील रिसॉर्ट, हॉटेल्स, बंगले आणि घरांवर कारवाईची धाकधूक आहे. त्यामुळे कोकणातील सर्व पर्यटन उखडून काढण्याचे पाप किरीट सोमय्या यांच्यावर जाते, असा आरोप अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केला.

100 कोटी रुपये तयार ठेवा, अन्यथा पुन्हा कपडे उतरवू!

किरीट सोमय्या यांनी केलेल्या खोटय़ा तक्रारीच्या आधारे मला ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. या प्रकरणात उच्च न्यायालयाने यंत्रणांच्या गैरवापरावर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे सोमय्या यांचे आरोप बिनबुडाचे ठरले आहेत. त्यांनी आता मला 100 कोटी रुपये देण्याची तयारी ठेवावी, अन्यथा त्याचे पुन्हा कपडे उतरवणार, असा इशारा शिवसेना नेते-आमदार अनिल परब यांनी यावेळी दिला. खोटय़ा तक्रारी दाखल करणाऱया किरीट सोमय्या व खोटय़ा तक्रारी नोंदवून घेणाऱया अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.