ऑनिमेशनची अद्भुत दुनिया!

राजेश खेले

[email protected]

जगभरात वॉल्ट डिस्ने, जॉर्ज लुकास, जॉन लिसेस्टर, स्टीव जॉब्स यासारख्या प्रज्ञा/प्रतिभावान दिग्गजांनी विविध प्रयोगांअंती पडद्यावर आभासी जग निर्माण केलं. ऑनिमेशन तंत्र हाच त्यांचा प्रयोगाचा आत्मा होता.  साधारण सिनेमा तंत्र माहीत असलेले चित्रकार, शिल्पकार, ग्राफिक डिझायनर्स पासून ते हार्डवेअर/सॉफ्टवेअर इंजिनिअर, डेटाबेस मॅनेजमेंट एक्स्पर्टपर्यंत व्यावसायिक ऑनिमेशन क्षेत्रात निर्मितीचे काम करतात.

मूलभूतदृष्टय़ा मनोरंजन, प्रबोधन किंवा प्रशिक्षण याकरिताच ऑनिमेशन उपयोगात आणले गेले आहे. सिनेमा, टीव्ही, वेबसिरीज, मोबाइल किंवा व्हिडीओ गेमिंग व्यतिरिक्त रियल इस्टेट किंवा बांधकाम क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, औषध निर्मिती, शरीरशास्त्र, प्राणीशास्त्र, ललित साहित्य-कथा-कविता, मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्र, ई-लार्ंनग, जैवतंत्रज्ञान, रिसर्च बेस्ड प्रेझेंटेशन्स, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेन्ट, इंडस्ट्रीयल किंवा होम सेफ्टी, इरिगेशन, शेती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात ऑनिमेशनचा सर्वोत्तम वापर होताना दिसतो आहे. मुळात ऑनिमेशनमध्ये चित्रभाषा मोठय़ा प्रमाणात वापरल्यामुळे कुठल्याही प्रेक्षकांशी सहज संवाद साधला जात असतो. हीच ऑनिमेशनची ताकद असून भाषा, प्रांत, वय याची बंधन ऑनिमेशनला नाहीत. आज जगभर अनेक विषयांवर ऑनिमेशन निर्मिती होत असून नवनवीन विषयाला, चित्रशैलीला  कायम मागणी असते. हिंदुस्थानात मात्र आजही ऑनिमेशन म्हटल की कार्टून फिल्म किंवा लहान मुलांच्या मनोरंजनाचे क्षेत्र यापुरताच विचार होताना दिसतो. २८ ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय ऑनिमेशन दिनानिमित्त बँकांनी ऑनिमेशन क्षेत्रास पुरते भांडवल, लोन सुविधा, निर्मिती संस्थांची आर्थिक घडी नीट बसण्याकरिता खेळते भांडवल किंवा काही स्कीम्स अभ्यासाअंती लवचिकता आणून उपलब्ध करून द्यायला हव्यात. हिंदुस्थानी अभिजात साहित्य-संगीत, हिंदुस्थानी सॉफ्टवेअरची उपलब्धता, हिंदुस्थानी टीव्ही चॅनल्सवर किमान ७०टक्के एअर टाइम हिंदुस्थानी कथांवर/समस्यांवर/क्षेत्रावर आधारित, हिंदुस्थानी तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध असावी किंवा अशा ऑनिमेशन प्रोग्रॅम्सना प्राधान्य द्यावे, तरुण कलातंत्रज्ञांना प्रोत्साहित करण्याकरिता सकारात्मकता आणावी. तर हिंदुस्थानी ऑनिमेटर्स आपले योगदान वाढवू शकतील.

 

आपली प्रतिक्रिया द्या