भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाकडे माध्यमांचे दुर्लक्ष, सरकारच्या दबावाची शंका

21
anna-hazare

सामना प्रतिनिधी । नगर

दिल्ली येथे २३ मार्चपासून होणाऱ्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाकडे माध्यमांचे लक्ष नसल्याचा आरोप करून माध्यमांवर सरकारचा दबाव नाही ना अशी शंका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित केली. दरम्यान, कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल, तसेच शेतकऱयांच्या प्रश्नासंदर्भात आंदोलन करण्याचा निर्णय तीन महिन्यांपूर्वी जाहीर केला होता. या अगोदर अण्णांनी विविध प्रश्नांसदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधले होते. मात्र, मोदींनी उत्तर न दिल्याने अण्णांनी केंद्र सरकारवर जाहीरपणे टीकाही केली होती.

गेल्या २ महिन्यांपासून अण्णा हजारे यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांत दौरा करून कार्यकर्त्यांची फळी उभी केली. आंदोलनासाठी नव्या समितीचीसुद्धा घोषणा करून नवीन चेहऱयांना व युवकांना संधी देण्यात आली. १३ मार्च रोजी होणाऱ्या या आंदोलनासाठी राळेगणसिद्धी येथे नवीन कार्यकारिणीची बैठक पार पडली. जनआंदोलनाकडे माध्यमांचे लक्ष नसल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी करून याकडे दुर्लक्ष होत असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर करावा. आपआपल्या भागात प्रत्येक महाविद्यालयात मिस्ड कॉलचा वापर करावा व त्यातून प्रचार-प्रसिद्धीची जबाबदारी हाती घ्यावी, कोण मोठा, कोण लहान हे बाजूला ठेवावे, एकमेकांना सहकार्य करावे, आपल्या पश्चातही आंदोलन सुरू राहिले पाहिजे, चारित्र्यशील लोकांचे संघटन तयार झाले, तर कोणत्याही सरकारचे नाक दाबले की तोंड उघडेल, असा दबावगट तयार करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

आंदोलनामध्ये काही दिवस सत्याग्रह करावा, मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा अवंलब करावा, अशी काही सदस्यांनी मागणी केली. अण्णा हजारे यांच्या जीवनावरील चित्रफीत दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनातील शेतकऱयांचा पेन्शनचा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे, त्याबाबत शेतकरी वर्गात जागृती करणे महत्त्वाचे आहे. आंदोलनात भूमिअधिग्रहणाचा मुद्दा घेण्यात यावा, तसेच खासदारांना घेराव घालण्यासंदर्भात रणनीती आखण्यात यावी, याबाबत चर्चा करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या