अण्णा हजारेंच्या भावाने केली महिलेला मारहाण

51

सामना वृत्तसेवा । पंढरपूर

प्रति महात्मा गांधी म्हणून ख्याती असलेल्या अण्णा हजारे यांच्या लहान बंधूनी विठ्ठल मंदिरामध्ये दबंगगिरी केली. निमित्त होते, दर्शन रांगेतून पुढे चला रांगेत थांबू नका पाठीमागील भाविकांना देवाचे दर्शन होत नाही अशी सूचना केल्याचे. या सूचनेमुळे राग अनावर झालेल्या राम हजारे या उर्मट भक्ताने महिला सुरक्षा रक्षक अलका पवार यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत सदर सुरक्षा रक्षक महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.

जखमी झालेल्या महिला सुरक्षा रक्षकाने पोलिस ठाण्यात जाऊन राम हजारे यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी कारवाई सुरू करताच राम हजारे यांनी आपण अण्णा हजारे यांचे बंधू असल्याचे सांगितले. अण्णांशी राम हजारे यांचे असलेले नाते कळताच प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू झाले. गुन्हा दाखल करण्याचे टाळून औषधोपचारांचा खर्च देऊन अलका पवार यांनी घरी पाठवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र सीसीटीव्ही फूटेजमध्ये राम हजारे यांनी केलेली कृती स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, घडलेल्या प्रकाराबाबत मंदिर समिती व्यवस्थापनाने प्रसिद्धी पत्रक काढले आहे. राम हजारे हे श्रींचे दर्शन करून बाहेर पडल्यानंतर साष्टांग दंडवत घालत होते. त्यावेळी सुरक्षा रक्षक अलका पवार यांचा हजारे यांना चुकून धक्का लागला आणि त्यांचे डोके भिंतीवर जाऊन आपटले या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. उपचार करुन त्यांना घरी सोडले आहे, असे प्रसिद्धीपत्रक मंदिर समितीने काढले आहे.

राम हजारे हे महिला सुरक्षा रक्षक अलका पवार यांना लाथ मारत असल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत असूनही त्यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही. मंदिर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. तर मंदिर समितीने अण्णांच्या भावाला वाचवण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या