मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांची जबाबदारी घ्या!

19
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । नागपूर

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे उद्घाटन झाल्यानंतरही प्रत्यक्षात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे या महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात घडत आहेत. या अपघातांची राज्य सरकारने जबाबदारी घेऊन अपघातग्रस्त मृत व जखमींना तत्काळ नुकसानभरपाई जाहीर करा, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदारांनी आज सभागृहात लावून धरली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याबाबत शिवसेना आमदार मनोहर भोईर यांनी लक्षवेधी उपस्थित केली. चंद्रकांत पाटील यांच्याकडून हा महामार्ग जून २०१८ पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात येत असले तरी या डेडलाइनवर विश्वास नाही. यामध्ये झालेल्या अपघातांत ६५१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना सरकार नुकसानभरपाई देणार का, असा सवाल भोईर यांनी केला.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम धीम्या गतीने चंद्रकांत पाटील यांची कबुली

मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते झाराप या रस्त्यासाठी ११ हजार कोटी पॅकेज देण्यात आले. इंदापूर-पळस्पेदरम्यानचे काम धीम्या गतीने सुरू असून हे काम जून २०१८ पर्यंत पूर्ण होईल असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात कंत्राटदार दिवाळखोरीत गेल्याने त्याला ५४० कोटींची सीसी लिमिट मदत म्हणून देण्यात आली. त्यानंतरही काम धीम्या गतीने सुरू करण्यात आले. या कंत्राटदाराचे काम थांबवून दुसरा कंत्राटदार नेमण्यात आला असल्याचे सांगितले. अपघातातील मृत्यूसंदर्भात नुकसानभरपाईबाबत मदत देता येईल का हे तपासून पाहिले जाईल. कोकणातील आमदारांची बैठक घेऊन मुंबई-गोवा महामार्गातील दुरुस्तीबाबत सूचना घेतल्या जातील असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

अपघातांना चालक नव्हे खराब रस्तेच जबाबदार

अपघात चालकाच्या चुकीमुळे होत नाहीत. या अपघातांना सरकारच जबाबदार आहे. वर्षानुवर्षे रस्त्याची कामे होऊनही अजून रस्त्यांवर खड्डेच आहेत असा हल्ला प्रकाश सुर्वे यांनी केला. तर काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी या रस्त्याचा आढावा घेऊन काम करण्याचे आश्वासन दिले त्याचे काय झाले, असा सवाल सुनील शिंदे यांनी केला.

किती जिवांशी खेळणार कोकणात जायला लाज वाटते! – सुनील प्रभू

पनवेलपासून इंदापूरपर्यंत ८४ कि.मी.चा रस्ता आहे. येथील कंत्राटदार जर बँकक्रप्ट झाला असेल तर त्याच्याकडून कंत्राट काढून घ्यायला हवे. यासाठी सरकारने हायकोर्टात जाऊन याविरोधात खटला भरायला हवा, पण कंत्राटदाराला पाठीशी घातले जातेय. आणखी किती जिवांशी खेळणार, किती लोकांचे प्राण घेणार, असा सवाल शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केला. कोकणात आमची गावे असल्याने आम्ही आमदार तिथे जातो तेव्हा तिथले लोक आम्हाला प्रश्न करतात. रस्त्यांवर पडलेले खड्डे पाहिल्यानंतर आम्हाला कोकणात जायला लाज वाटते अशी खंत व्यक्त करतानाच गगनबावडा ते वैभववाडी या रस्त्याची परिस्थिती मृत्यूच्या खाईतून चाललोय अशी झाली असल्याकडे सुनील प्रभू यांनी लक्ष वेधले. कोकणात जाण्यासाठी पर्याय असलेलले एक्प्रेस वे तसेच अन्य रस्ते तरी चांगले करा अशी मागणी त्यांनी केली.

अपघातग्रस्त मृत, जखमींना नुकसानभरपाई जाहीर करा! शिवसेना आमदार आक्रमक

सार्वजनिक बांधकाम खात्याने १६-१७ सालची दिलेली मुदत संपली. आता २०१८ ची डेडलाइन दिली जात आहे. या डेडलाइनमध्ये कामे होतील का? इंदापूर-पळस्पेपर्यंत किती तरी अपूर्ण कामे आहेत. अजूनही वडखळ ते इंदापूर काम झालेले नाही. अशा सुप्रीम कंत्राटदारालाच ५४० कोटींची मदत दिली जाते. त्याने काय काम केले ते सांगा. या कंत्राटदाराला काळय़ा यादीत टाका? जे काम पाच वर्षांत करू शकले नाहीत ते काम पाच वर्षांत कसे पूर्ण होणार, असा सवाल भरत गोगावले यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या