कोकण किनारपट्टीवर आजपासून मासेमारी बंदी

57

अमित खोत, मालवण

कोकण किनारपट्टीसह देशाच्या संपूर्ण पश्चिम किनारापट्टीवर १ जूनपासून मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. मासेमारी बंदीचा कालावधी १ जून ते ३१ जुलै असा एकूण ६१ दिवसांचा असणार आहे. दोन महिने मासेमारी बंद राहणार असल्याने समुद्रातील ट्रॉलर्स व मासेमारी नौका मच्छिमार बांधवानी किनाऱ्यावर आणून ठेवल्या आहेत. मासेमारी बंदीच्या कालावधीमध्ये फक्त यांत्रिक मासेमारी बंद राहणार आहे मात्र बिगर यांत्रिक बोट मासेमारीला खाडीपात्र हवामान शांत असताना परवानगी आहे असे मत्स्य विभागाने स्पष्ट केले आहे.

पर्ससीन मासेमारीवर निर्बंध, एलईडी लाईट मासेमारी बंदी या शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे यावर्षीचा मत्स्य हंगाम मच्छीमारांसाठी काहीसा समाधानकारक गेला. मात्र मत्स्य विभाग अनधिकृत मासेमारीवर अपेक्षित कारवाई करण्यात अपयशी ठरली असा आरोपी काही मच्छीमारांनी केला आहे. त्यामुळे बंदीचे उल्लंघन करून यांत्रिक मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मत्स्य विभागाने दिला आहे. घटते मत्स्योत्पादन आणि राज्या-राज्यातील सागरी हद्दीमध्ये घुसखोरीच्या वाढत्या तक्रारी यामुळे केंद्र सरकारने पश्चिम किनाऱ्यावर १ जून ते ३१ जुलैपर्यन्त मासेमारी बंदी कालावधी लागू केला आहे. पावसाळ्यात मासे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यालगत येतात. या काळात मासेमारी केल्यास मोठ्या प्रमाणात मत्स्यबीजांचा नाश होतो. हे सर्व टाळण्यासाठी शासनाकडून बंदी कालावधी लागू करण्यात येतो. कोकण कोणारपट्टीवर अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसले तरी मच्छीमारांना १ जून पासून मासेमारी बंदी पाळणे बंधनकारक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या