
रोजगार आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा… मामाच्या गावाला जाऊया… कायमस्वरूपी रोजगार मिळवू या… अशा घोषणा देत सरकारने फसवलेल्या हजारो बेरोजगार तरुणांनी आज काळी दिवाळी साजरी केली. युवा प्रशिक्षण योजनेतील तरुण तरुणींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पुन्हा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जोपर्यंत लाडक्या भावाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार तरुणांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील १० लाख तरुण-तरुणींना लाडका भाऊ योजनेंतर्गत (युवा कार्य प्रशिक्षणार्थी) रोजगार देण्याची घोषणा सरकारने केली होती. आता मात्र या तरुणांना सरकारने वाऱ्यावर सोडले असून हे तरुण आता पुन्हा बेरोजगार झाले आहेत. गेल्या ४ महिन्यांपासून त्यांना मानधनाची फुटकी कवडीही मिळाली नसल्याने हजारो बेरोजगार आज पुन्हा ठाण्यात धडकले.
‘त्या’ आश्वासनाचे काय झाले?
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत ११ महिने काम केल्यानंतर बेरोजगार झालेल्या शेकडो युवकांनी आठवडाभरापूर्वी ठाण्यात आंदोलन करून सरकारला जाब विचारला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आठ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्या चर्चाचे काय झाले, असा सवाल तरुणांनी उपस्थित केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात राज्यातील बेरोजगारांना आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात ११ महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतरही हजारो युवकांच्या हाताला अद्याप काम मिळालेले नाही.
१० लाख युवकांना सेवेत कायम करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. मात्र १३ आंदोलने करूनही तब्बल १ लाख ७५ हजार प्रक्षिणार्थीच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.





























































